म्युनिक ऑलिम्पिकमधली 'ती' रक्तरंजित रात्र जेव्हा 11 इस्रायली खेळाडूंची हत्या झाली होती...

  • रेहान फजल
  • बीबीसी प्रतिनिधी
ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये खेळाडूंच्या इमारतीवरून डोकावून पाहणारा कट्टरतावादी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये खेळाडूंच्या इमारतीवरून डोकावून पाहणारा कट्टरतावादी हल्लेखोर

कॅलश्निकॉव्ह असॉल्ट रायफलचा शोध सैबेरियातल्या एका शेतकऱ्याने लावला होता. या रायफलमध्ये 7.62मिमीच्या गोळ्यांचे 30 राऊंड्स असतात.

ऑटोमॅटिक मोडवर असताना या रायफलमधून मिनिटाला 100 गोळ्या झाडल्या जाऊ शकतात आणि यांचा वेग असतो एका सेकंदाला 2330 फूट म्हणजेच 1600 मैल प्रति तास.

अशाच काही कॅलश्निकॉव्ह रायफल्स 5 सप्टेंबर 1972 रोजी काही कट्टरवाद्यांच्या हाती पडल्या. 'ब्लॅक सप्टेंबर'साठी कारणीभूत ठरलेले हेच ते आठजण होते.

या रायफली घेऊन हे 8 जण '31 कॉनोलीस्ट्रॉस' या ऑलिम्पिक व्हिलेजकडे गेले तेव्हा इस्रायलच्या खेळाडूंचं पथक गाढ झोपेत होतं.

हा फिदाईन म्हणजे आत्मघातकी हल्ला करणाऱ्यांपैकी जिवंत राहिलेल्या एकमेव व्यक्तीला - जमाल अल् गाशी यांना आजही तो दिवस आठवतोय.

गाशी सांगतात, "त्या रात्री आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. तिथे पहिल्यांदा आम्ही आमच्या प्रमुखांना भेटलो. आम्हाला काय करायचंय, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. पहिल्यांदाच इस्रायलींचा सामना करायला मिळणार म्हणून मला स्वतःचा अभिमान वाटत होता. आम्ही कोण आहोत, याचे पुरावे मिळू नयेत म्हणून आमच्याकडून आमचे पासपोर्ट्स काढून घेण्यात आले. यानंतर आम्ही ऑलिम्पिक व्हिलेजकडे रवाना झालो."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ओलिस असणाऱ्या खोलीच्या बाल्कनीत उभा असलेला कट्टरतावादी गटाचा सदस्य

अमेरिकन खेळाडूंची भेट

ऑलिम्पिक व्हिलेजभोवती असणारं तारांचं 6 फुटी कुंपण ओलांडून पहाटे 4 वाजता आत शिरताना या लोकांना काहींनी पाहिलं. जमाल अल् गाशी आठवून सांगतात, "आम्ही कुंपणावरून उडी मारत असतानाच काही अमेरिकन अॅथलीट्स आमच्यासमोर आले. रात्रभर मजामस्ती केल्यानंतर हे अॅथलीट्स त्यांच्या फ्लॅटवर परतत होते. मला वाटतं ते कदाचित दारूच्या नशेत असावेत. रंजक गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकांना तारेच्या त्या कुंपणावर चढायला मदत केली. मी हात पुढे करत त्यांच्यापैकी एकाच्या हाताला धरून ओढत आत घेतलं. एकमेकांचे आभार मानून आम्ही पुढे निघालो."

जमाल गाशी पुढे सांगतात, "आम्ही फ्लॅट्सच्या दिशेने निघालो. आमच्या प्रत्येकाकडे एक स्पोर्टस बॅग होती. यात कपड्यांच्या खाली हत्यारं लपवलेली होती. प्रत्येकाला एक विशेष जबाबदारी देण्यात आली होती. माझे सगळे साथीदार आत गेले. मला बाहेर थांबून पहारा द्यायला सांगण्यात आलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

इस्रायली खेळाडूंच्या खोलची अवस्था

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

इस्रायलचे अॅथलिट्स या खोल्यांमध्ये गाढ झोपलेले होते. जागे होते फक्त कुस्तीचे पंच असणारे जोसेफ गतफ्रायंद. त्यांना कसला तरी आवाज आला. कुणीतरी दरवाजापाशी होतं. अगदी अपुऱ्या प्रकाशात आणि डोळ्यांवर झोप असूनही त्यांना एक कट्टरवादी आणि त्याच्या कॅलश्निकॉव्ह रायफलची नळी दिसली.

क्षणात त्यांच्या डोळ्यांवरची झोप उडली आणि 6 फूट 3 इंच उंचीचे आणि 140 किलो वजनाचे धिप्पाड योसेफ हिब्रूमध्ये किंचाळले, "चेवरेतिसतात्रू..." (मुलांनो शत्रूपासून बचाव करा.)

आपल्या धिप्पाड शरीराने दाबत त्यांनी दरवाजा रोखून धरला. हल्लेखोरांनी दरवाजाची चावी जमिनीवर टाकली आणि सातही जण एकत्र दरवाजाला धडका देऊ लागले. 10 सेकंद योसेफनी दरवाजा रोखून धरला.

खोलीतील दुसरे एक अॅथलीट - तुविया सोकोलोस्कींसाठी इतका वेळ खिडक तोडत बाहेर पडण्यासाठी पुरेसा होता. खिडकीतून खाली उडी मारत ते वेगाने पळू लागले. अरब कट्टरवादी त्यांच्या मागे पळू लागला. सोकोलोस्कींनी नंतर पीटर टेलरना सांगितलं, "तो माझ्यावर गोळ्या झाडू लागला. माझ्या कानाच्या जवळून जाणाऱ्या गोळ्या मला जाणवत होत्या. पण मी मागे वळून पाहिलं नाही."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ऑलिम्पिक व्हिलेजबाहेर उभे फोटोग्राफर्स

तोवर इथे अरब कट्टरवाद्यांनी जोसेफ गतफ्रायंद आणि इतर आणखी चार इस्रायली - केहेर शोर, लिओ अमित्झर शपीरा, आंद्रे स्पिटझर आणि याकोव्ह स्प्रिंगर यांना बंदुकीच्या धाक दाखवत ताब्यात घेतलं होतं. पुढच्या 2, 4 आणि 5 क्रमांकाच्या खोल्यांपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. पण 3 नंबरच्या फ्लॅटमधल्या इलायझर हालिफन, मार्क स्लॅविन, गाद झोबारी आणि डेव्हिड मार्क बर्गर, झिव्ह फ्रीडमन, योसेफ रोमाना हे देखील त्यांच्या तावडीत सापडले.

या कट्टरवाद्यांचा नेता ईसा दुसरा बेडरूममध्ये घुसला पण मोशे वेनबर्ग नावाच्या खेळाडूने फळं कापण्याच्या सुरीने त्याच्यावर हल्ला केला.

ईसा जमिनीवर पडला, पण त्याच्या मागच्या हल्लेखोराने वेनबर्गच्या डोक्यावर गोळी झाडली.

जमाल गाशी सांगतात, "आमचा नेता खोलीत गेला पण आपल्यामागे एक इस्रायली उभा असल्याचं त्याला कळलं नाही. त्या खेळाडूने पूर्ण ताकदीनिशी हल्ला केला आणि कॅलश्निकॉव्ह खाली पाडली. पण आमच्या पथकातल्या एकाने घाबरून गोळीबार करत या इस्रायली खेळाडूला उडवलं."

भारतीय खेळाडूंचा पाकवर संशय

या सगळ्याला आतापर्यंत 25 मिनिटं उलटली होती. पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांनी 2 इस्रायली खेळाडूंना ठार केलं होतं तर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. 8 इस्रायली अॅथलीट्सना बंदी बनवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

जोसेफ गतफ्रायंद

इस्रायली अपार्टमेंटच्या बरोबर समोरच्या इमारतीत राहणाऱ्या भारतीय धावपटू एडवर्ड सिक्वेरांनाही पहाटेच जाग आली होती. समोरच्या इमारतीमधून आरडाओरडा ऐकू आल्यावर त्यांनी त्यांच्याच खोलीतले अॅथलीट श्रीराम सिंह यांना उठवलं. सिक्वेरांना वाटलं की पाकिस्तानी कट्टरवाद्यांनी बहुतेक भारतीय खेळाडूंवर हल्ला केलाय. कारण भारत - पाक युद्ध संपुष्टात आल्याला काहीच महिने उलटले होते. तेव्हाच समोरच्या बाल्कनीत त्यांना बुरखा घातलेला हल्लेखोर दिसला.

हॉकीपटू अशोक कुमार प्रॅक्टिससाठी म्हणून अपार्टमेंटबाहेर आल्यावर त्यांना इस्रायली खेळाडूंच्या इमारतीच्या बाहेर मोठी गर्दी दिसली. वरून एक कट्टरवादी खाली उभ्या पोलिसांशी काही बोलत होता.

जीव वाचवून पळालेल्या इस्रायली खेळाडूंनी या हल्ल्याविषयी सर्वांना सांगितलं. अर्ध्या तासात कट्टरवाद्यांच्या मागण्यांची एक इंग्रजीत टाईप केलेली यादी जर्मन प्रशासनाला मिळाली.

याच दरम्यान हल्लेखोरांनी मोशे वेनबर्गरचा मृतदेह खाली फेकला. इस्रायल आणि जर्मनीच्या तुरुंगांत असणाऱ्या त्यांच्या 234 साथीदारांची सुटका करण्यात यावी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी 3 विमानं देण्यात यावी, अशी हल्लेखोरांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी सकाळी 9 वाजतापर्यंतचा वेळ दिला. नंतर हा कालावधी दुपारपर्यंत वाढवण्यात आला.

मागण्या मान्य करायला इस्रायलचा नकार

'व्हेंजेनन्स - अ ट्रू स्टोरी ऑफ इस्रायली काऊंटर टेररिस्ट टीम' या पुस्तकात जॉर्ज जोनस लिहितात, "जर्मनीचे चॅन्सलर विली ब्रांट यांनी इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांना फोन केला पण त्यातून ठोस काही निष्पन्न झालं नाही. या प्रकरणांबाबतचं इस्रायलचं धोरण स्पष्ट होतं. अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये कोणत्याही मागण्या कधीही मान्य करायच्या नाहीत."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मोशे वेनबर्ग

यादरम्यान ओलिसांना सोडण्यासाठीची मुदत रात्री 9 वाजेपर्यंत पुन्हा वाढवण्यात आली. 3 विमानांच्याऐवजी 1 विमान घेण्यासाठी कट्टरवादी राजी झाले. 8 वाजता अपार्टमेंटमध्ये जेवण पोहोचवण्यात आलं. मुद्दामच जर्मन प्रशासनाने भरपूर जेवण पाठवलं. जर्मन स्वयंसेवक जेवण घेऊन आता जातील आणि संधीचा फायदा घेत कट्टरवाद्यांवर काबू मिळवतील अशी अपेक्षा होती. पण त्यांना जेवण बाहेरच ठेवण्यास सांगण्यात आलं आणि त्यांचा नेता - ईसा एकेक डबा आत घेऊन गेला.

दरम्यान पॅलेस्टाईन कट्टरपंथीय आणि ओलीस इस्रायली खेळाडूंना इजिप्तला नेण्यासाठी आपलं विमान द्यायला जर्मन सरकार तयार झालं. हे लोक फर्सटनफेल्डबर्क विमानतळावर उड्डाणासाठीची तयारी करत असताना जर्मन कमांडोंनी हल्ला करत ओलिसांची सुटका करावी असा गुप्त बेत ठरला.

मोहिमेची सुमार आखणी

बरोबर रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी ऑलिम्पिक व्हिलेजजवळच्या हेलिपॅडवरून दोन हेलिकॉप्टर्सनी उड्डाण केलं. एका बसममधून 9 ओलिस आणि 8 कट्टरवाद्यांना या हेलिपॅडला आणण्यात आलं होतं. 10 वाजून 35 मिनिटांनी ही दोन्ही हेलिकॉप्टर्स तिथे आधीपासून उभ्या असणाऱ्या बोईंग 727 विमानापासून 100 फुटांवर उतरली.

'वन डे इन सप्टेंबर' पुस्तकाचे लेख सायमन रीव्ह सांगतात, "हेलिकॉप्टर्स लँड होतानच परिस्थिती बिघडत गली. ही हेलिकॉप्टर्स लँडिंगसाठी आकाशात घिरट्या घालत असतानाच कैरोला जाण्यासाठी सज्ज करण्यात आलेल्या 727 बोइंग विमानात तैनात करण्यात आलेले 17 जर्मन सैनिक विमानातून बाहेर पडले. त्यांच्या जीवाला तिथे मोठा धोका असल्याचं त्यांना वाटलं. परिणामी 8 सशस्त्र कट्टरतावाद्यांशी लढण्यासाठी फक्त 5 जर्मन स्नायपर उरले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

बाल्कनीतून पाहणी करणारा हल्लेखोर

पण ते फक्त नावापुरते स्नायपर होते. अशा प्रकारच्या परिस्थितीत काय करायचं, याचं प्रशिक्षण त्यांच्याकडे नव्हतं किंवा त्यासाठी लागणारी हत्यारं आणि बुलेटप्रूफ जॅकेट्सही नव्हती. हे कमांडोज सगळ्या विमानतळभर पसरले होते. त्यांच्यापैकी दोन जण हे इतर स्नायपर्सच्या थेट फायरिंग रेंजमध्ये होतं.

या मोहिमेची आखणी अगदी सुमारपणे करण्यात आली होती.

हॅलिकॉप्टर उतरल्यानंतर दोन हल्लेखोर उतरून त्यांना कैरोला नेणाऱ्या विमानात चढले. त्या विमानात ना वैमानिक होते ना विमानातले इतर कोणी कर्मचारी. हा आपल्यासाठी रचण्यात आलेला सापळा असल्याचं त्यांच्या लगेच लक्षात आलं. विमानातून उतरून ते त्यांच्या हेलिकॉप्टर्सकडे जात असतानाच जर्मन कमांडोने गोळीबार केला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

इस्रायलच्या ऑलिम्पिक टीमच्या इमारतीबाहेर जमलेले पोलीस

पण झाडलेल्या या फैरी इतर जर्मन स्नायपर जिथे लपले आहेत, त्यांच्या दिशेने जात असल्याचं याचवेळी लक्षात आलं. जर्मन नेमबाजांचा नेम चुकला आणि एका कट्टरवाद्याच्या पायाला गोळी लागली. लंगडत लंगडत तो हेलिकॉप्टरपर्यंत गेला आणि त्याच्याखाली लपला. कबुतरांवर गोळ्या झाडाव्यात तशा प्रकारे जर्मन सैनिक फायरिंग करत होते. दुसरीकडे कट्टरपंथीय अगदी चवताळून गोळीबार करत होते आणि ग्रेनेड्स टाकत होते. एका जर्मन पोलिस अधिकाऱ्याच्या डोक्याला गोळी लागली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.

मोहीम यशस्वी झाल्याची चुकीची बातमी

ही मोहीम यशस्वी झाली आणि ओलिस धरण्यात आलेल्या सगळ्यांची जिवंत सुटका करण्यात आल्याची बातमी या दरम्यान पसरली. कशी, माहित नाही.

या बातमीचा फ्लॅश सगळ्यात आधी रॉयटर्सवर आला. गोल्डा मेयरना याबद्दल समजल्यावर त्यांनी आनंदाच्या भरात शँम्पेनची बाटली उघडली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

हल्लेखोरांवर लक्ष ठेवून असलेला पश्चिम जर्मनीचा पोलीस अधिकारी

इस्रायलमधलं महत्त्वाचं वर्तमानपत्र असणाऱ्या 'जेरुसलेम पोस्ट'चा दुसऱ्या दिवशीचा मथळा होता - 'सगळ्या ओलिसांची सुटका.' ओलिस धरण्यात आलेल्या सगळ्यांच्या नातेवाईकांनाही ही बातमी सांगण्यात आली आणि त्यांनीही जल्लोष केला.

या दरम्यान दोन्ही हेलिकॉप्टर्सचे पायलट जीव वाचवण्यासाठी पळू लागले. पण दोन्ही बाजूंनी होत असलेल्या गोळीबारात - क्रॉसफायरमध्ये ते सापडले आणि गंभीर जखमी झाले. हात बांधून डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आल्याने ओलिस धरण्यात आलेल्या इस्रायली खेळाडूंना काहीच करता येत नव्हतं.

सायमन रीव्ह पुढे लिहितात, "गोळीबार सुरू झाल्याच्या बऱ्याच काळानंतर दोन सुसज्ज गाड्या हेलिकॉप्टर्सच्या दिशेने पाठवण्यात आल्या. या गाडीत असणाऱ्या जर्मन सैनिकांनी पॅलेस्टाईन हल्लेखोर समजून स्वतःच्याच एका साथीदारावर गोळी झाडली.

कट्टरवाद्यांना वाटलं आता सगळं संपलं, शेवट जवळ आला. ओलिस धरलेल्यांना संपवण्याची ही शेवटची संधी असल्याचं त्यांना वाटलं. त्यांनी आपल्या बंदुकांचा रोख हेलिकॉप्टरमध्येच मागे बसलेल्या इस्रायली ओलिसांकडे वळवला. दुसऱ्या एका हल्लेखोराने हेलिकॉप्टरच्या आतमध्येच एक हातबाँब टाकला आणि हेलिकॉप्टरमध्ये आग लागली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

गोल्डा मेयर

सर्वच्या सर्व 9 इस्रायली ओलिसांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यावेळी तिथे शेकडो जर्मन सैनिक हजर होते, पण त्यांना एकाही इस्रायली ओलिसाला वाचवता आलं नाही. 5 कट्टरवादी मारले गेले, तिघांना जिवंत पकडण्यात आलं तर एका जर्मन सैनिकाचाही मृत्यू झाला.

इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख ज्वी जमीर यांनी विमानतळाच्या इमारतीतून या सगळ्या घडामोडी पाहिल्या. पंतप्रधान गोल्डा मेयर यांना त्यांनी फोन केला. जमीर हळुच म्हणाले, "गोल्डा, माझ्याकडे वाईट बातमी आहे. मी विमानतळावरून बोलतोय. एकही इस्रायली खेळाडू जिवंत राहिलेला नाही."

गोल्डा मेयर यांचा कानांवर विश्वास बसेना. त्या म्हणू लागल्या, "पण रेडिओ आणि टीव्हीवर सांगतायत, की सगळेजण वाचले?" त्यांना थांबवत जमीर म्हणाले, "गोल्डा...मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय...कोणीही वाचू शकलं नाही."

मेयर यांच्याहातून फोन पडला. काही मिनिटांनी टीव्हीवर जिम मॅकेंचा आवाज दुमदुमला, "आताच मिळालेल्या माहितीनुसार एकूण 11 जण ओलिस होते. यापैकी 2 जण काल त्यांच्या खोलीमध्ये मारले गेले तर 9 जण आज रात्री विमानतळावर मारले गेले.... दे ऑल आर गॉन...कोणालाही वाचवता येऊ शकलं नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)