मोसाद : ‘आम्ही जे करतो ते सामान्य माणूस करू शकत नाही, फक्त गुन्हेगार करू शकतो’

  • अनघा पाठक
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक फोटो

"त्यांना इमानदार गुंड हवेत. ते माझ्यासारख्या माणसांची भरती करतात - मी गुंड नाही. इस्रायलचा आज्ञाधारक नागरिक आहे. ते तुम्हाला शिकवतात चोरी कशी करायची, अनेक लोकांना ठार कसं करायचं. ते तुम्हाला अशा गोष्टी शिकवतात ज्या कोणताही सामान्य माणूस करू शकत नाही. एक गुन्हेगारच हे करू शकतो..." 2010 साली मोसादचे माजी एजंट गॅड शिरमन यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत उच्चारलेले हे शब्द.

इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचे अनेक किस्से आहेत. यातल्या काही गोष्टी खरंच घडल्यात आणि काही फक्त दंतकथा आहेत. पण हे मात्र खरं की जगभरात मोसादची भीती आहे आणि कुतूहलही.

हिब्रू भाषेत मोसादचा अर्थ आहे संस्था. जगातल्या सगळ्यांत शक्तीशाली गुप्तचर संस्थांपैकी एक म्हणून मोसादचं नाव घेतलं जातं.

इस्रायलसारख्या एका छोट्याशा देशाची गुप्तचर संस्था मोठमोठ्या देशांना घाम फोडण्याइतकी ताकदवान झाली कशी?

गुप्तहेरांसाठी कोणतेही कायदे नसतात'

दुबईच्या एका हॉटेलमध्ये एक मृतदेह पडलाय. खोलीचा दरवाजा आतून बंद आहे. मृत्यू झालेल्या माणसाचं नाव आहे महमुद अल महाबुह, पॅलेस्टाईनची कट्टरतावादी संघटना हमासचा मोठा नेता आहे. खोलीच्या दारावर 'डू नॉट डिस्टर्बचा' बोर्ड लावला होता. सगळ्यांना वाटतंय की या माणसाचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झालाय.

कोणी खोलीत आलं नाही, गेलं नाही, खोलीचा दरवाजा आतून बंद, आतला माणूस मेला कसा?

2010 साली घडलेल्या या घटनेत मोसादचा हात होता असा संशय व्यक्त केला गेला, अर्थात मोसादने हे जाहीरपणे कधी मान्य केलं नाही.

पण मोसादच्या हे ऑपरेशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं.

महाबुह दुबईच्या विमानतळावरून हॉटेलपर्यंत आले तेवढा सगळा वेळ त्यांच्यावर कोणीतरी लक्ष ठेवून होतं आणि पाठलाग करत होतं.

ते हॉटेलच्या लिफ्टमध्ये शिरले आणि दुसऱ्या मजलावर बाहेर पडले तेव्हा त्यांच्यामागे टेनिस खेळण्यासाठी असतो तशा वेशात दोन माणसं होती. महाबुह यांच्या पत्नीनी नंतर हॉटेलला फोन केला बराच काळापासून महाबुह यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

दुबई पोलिसांच्या डॉ साईद हमिरी यांनी बीबीसीच्या गॉर्डन कोरेरा यांना सांगितलं, "शवविच्छेदकांनी पोलिसांच्या समोर त्या खोलीची तपासणी केली तेव्हा हे लक्षात आलं की खोलीचा दरवाजा खरंच आतून बंद होता. पण खून झाला असण्याची शक्यता होती कारण काही खूणा दिसत होत्या. भिंतीवर थोडं रक्त उडालं होतं, महाबुह यांच्या शरीरावर जखमा होत्या. इथे झटापट झाल्याची चिन्हं होती."

टेनिस खेळाच्या वेशात महाबुह यांच्या पाठीमागे असणाऱ्या त्या दोन व्यक्तींचे पासपोर्ट तपासले गेले. दुबई पोलिसांचं ठाम मत होतं की या हल्ल्यामागे मोसाद आहे.

त्या दोन व्यक्तींचे पासपोर्ट इतर देशांचे होते. ज्या देशांचे पासपोर्ट वापरले गेले त्यांनी या गोष्टीचा निषेध केला. लंडनच्या मोसाद प्रमुखाला काढून टाकलं होतं.

डॉ साईद हमिरींचं म्हणणं होतं की त्या दोन व्यक्तीपैकी एक इस्रायलचे माजी राजनैतिक अधिकारी होते.

पण मोसादचे माजी अधिकारी गॅड शिरमन म्हणाले होते, "अशा गोष्टी होतंच राहातात. आर्यलंड, ऑस्ट्रेलिया आणि इतर देश बोंबलतातच. तुमची हिंमत कशी झाली आमचे पासपोर्ट वापरायची, आमच्या नागरिकांचा जीव तुम्ही धोक्यात घालताय वगैरे वगैरे. पण हे समजून घ्या की त्यांना जाहीरपणे असं म्हणावंच लागतं. बंद दाराआड मात्र ते म्हणतात, की ठीक आहे... आम्हालाही समजतंय. पण पुढच्या वेळेस इतका तमाशा होणार नाही याची काळजी घ्या."

गुप्तहेरांच्या जगात नियम वाकवणं किंवा मोडणं कायम घडतंच असतं. पण इस्रायल अति करतो का?

याचं उत्तर देताना मोसादचे माजी प्रमुख एफ्रिम हलेवी म्हणतात, "अनेक गोष्टी कायदेशीर नसतात. मला आजवर कधीही कोणी विचारलं नाही तुम्ही मला जे करायला सांगताय ती गोष्ट कायद्याने गुन्हा नाही ना? एकदाही नाही! कारण मी आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय हे नीट कळेल याची काळजी घेतली होती. लक्षात घ्या, गुप्तहेरांसाठी कोणते कायदे नसतात."

मोसादची स्थापना

मोसादचं सगळ्यांत मोठ वैशिष्ट्य म्हणजे बीबीसीचे गॉर्डन कोरेरा अधोरेखित करतात, "त्यांची वाट्टेल तो धोका पत्कारण्याची तयारी."

टोकाचे धोके पत्कारण्याची तयारी ही मोसादची संस्कृती आहे आणि ही संस्कृती त्यांच्या स्थापनेच्या वेळी असणाऱ्या अस्थिर परिस्थितीतून येते.

इस्रायलच्या इतिहासात तो देश कायमच एकतर अरब देशांशी युद्ध करतोय किंवा युद्धजन्य परिस्थितीत जगलाय. आज इस्रायल सुपरपॉवर आहे पण मोसादची संस्कृती कायम आहे.

बीबीसीची सीरिज 'टेरर थ्रू टाईम'मधल्या एका भागात बीबीसीचे प्रतिनिधी फर्गल कीन मोसादच्या जडणघडणीवर आणखी प्रकाश टाकतात.

फोटो स्रोत, Getty Images

मोसादची स्थापना इस्रायलच्या स्थापनेनंतर वर्षभराने 1949 साली झाली. इस्रायल पाच अरब राष्ट्रांच्या मधोमध वसलेला ज्यू देश आहे. साहजिकच आहे आपल्या सीमेवरच्या शत्रूंवर नजर ठेवायला त्यांना मोसादसारख्या संस्थेची गरज होतीच.

1960 मध्ये पार पाडलेल्या एका मोहिमेमुळे मोसादचं जगभरात नाव घेतलं जाऊ लागलं. लाखो ज्यूंची हत्या करणाऱ्या अॅडॉल्फ आइखमन या नाझी अधिकाऱ्याला अर्जेंटिनात जाऊन जिवंत पकडून आणणं ही ती मोहीम.

1957 साली मोसादला कळलं की आइखमन नाव बदलून अर्जेंटिनामध्ये राहतोय. 1960 च्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस मोसादच्या चार गुप्तहेरांची एक टीम वेगवेगळ्या मार्गांनी अर्जेंटिनामध्ये दाखल झाली.

त्यांनी ब्युनोस आयर्समध्ये एक घर भाड्याने घेतलं. या घराला 'कासिल' हे कोडनाव देण्यात आलं. योजनेत थोडा गोंधळ झाला त्यामुळे ठरल्याच्या एक दिवस उशिरा आईखमन यांचं अपहण करून मोसादने त्यांना दहा दिवस अर्जेंटिनामध्येच ठेवलं. दहा दिवस एका देशाच्या गुप्तहेरांनी दुसऱ्या देशात तिसऱ्या माणसाचं अपहरण करून वेगळ्याच ठिकाणी राहणं सोपं नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images

एखादी जरी चूक झाली असती तर पकडले गेले असते आणि आंतरराष्ट्रीय तणाव वाढला असता.

दहाव्या दिवशी इस्रायलच्या मंत्र्यांचं विमान सरकारी कार्यक्रमासाठी अर्जेंटिनाच्या राजधानीत दाखलं झालं. त्याच मध्यरात्री ते विमान आइखमनला घेऊन इस्रायलकडे रवाना झालं. मोसादने पार पाडलेली ही पहिली मोठी कामगिरी होती.

तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, ना परकीय भूमीवर आपल्या मोहिमा तडीस न्यायला कचरले. एक गुप्तचर संस्था म्हणून ते किती महत्त्वाकांक्षी आहेत हे त्यांनी जगाला दाखवून दिलं होतं.

आइखमनला इस्रायलने फाशी दिली

पुढच्या दशकात मोसादचा दरारा वाढला तो पॅलेस्टिनी बंडखोरांच्या विरोधात फत्ते केलेल्या मोहिमांमुळे.

'न्यू हिस्टरी ऑफ मोसाद' या पुस्तकाचे लेखक आणि इस्रायलमधले पत्रकार रोमन बर्गमन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं का, "मोसादच्या पहिल्या दिवसापासून ते ठरावीक लोकांच्या हत्या करण्यापासून कधीच कचरले नाहीत. इस्रायलच्या छोट्याशा आकारामुळे असेल कदाचित पण त्यांनी इतर देशांच्या सार्वभौमत्वाला अजिबात महत्त्व दिलं नाही. आंतरराष्ट्रीय कायदे मोडताना ते मागेपुढे पाहात नाहीत. कधी कधी ते गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर करतात, ते क्रुर आहेत, निष्ठूर आहेत पण ते लक्ष्य साध्य करतात."

पहिल्या यशस्वी आंतरराष्ट्रीय मोहिमेनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय भूमीवर अजून आक्रमक मोहिमा राबवायला सुरूवात केली. त्यांनी आपला एक एजंट, इलाय कोहेन, सीरियन नागरिक म्हणून सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये पाठवला. या एजंटने अनेक महत्त्वाच्या खबरा मोसादपर्यंत पोहोचवल्या. शेवटी तो पकडला गेला आणि त्याची हत्या करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

लेफ्टनंट कर्नल अॅडोल्फ आइकमन

1960 च्या दशकात मोसादने रशियाचं नवकोरं मिग विमान पळवलं, इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांना एकतर धमक्या देऊन घाबरवलं नाहीतर लाच दिली.

मोसादच्या सुरुवातीच्या दिवसात ते इतर गुप्तहेर संस्थापेक्षा जास्त धोका पत्कारत होते आणि बाहेरचं जग काय म्हणेल याची त्यांना यत्किंचितही काळजी नव्हती.

योसी मेलमन इस्रायलमध्ये संरक्षण पत्रकार आहेत. त्यांनी 'हिस्टरी ऑफ मोसाद' हे पुस्तकही लिहिलं आहे.

बीबीसीच्या फर्गल कीन यांच्याशी बोलताना म्हटलं होतं, "त्यांच्यात हिंमत होती. हाती आलेली मोहीम फत्ते करायचीच असं भारवलेपण होतं. मग भूसुरूंगांवर पाय ठेवणं असो, मित्र राष्ट्रांना चिथावणी देणं असो, त्यांच्या देशात गुन्हे करणं असो, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असो, मोसादला वाटायचं की हे त्यांनी केलंच पाहिजे.

"दुसरं म्हणजे त्यांना खात्री होती की आम्ही काहीही केलं तरी त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार नाहीत. होलोकास्ट (नाझींनी केलेला ज्यूंचा नरसंहार) होऊन काहीच वर्षं लोटली होती. इस्रायलला सगळेच माया लावायचे. इस्रायल आणि ज्यूंविषयी सगळ्या जगाला सहानुभूती वाटत होती. एक देश म्हणून आम्ही लहान होतो आणि या सगळ्यांचा फायदा मोसादला झाला."

मोसाद अधिकाधिक धोकादायक बनत चालली होती

1970 च्या सुमारास बसान अबू शरीफ पॅलेस्टाईन चळवळीचा परिचित चेहरा बनले होते. बसान पॅलेस्टिनी कट्टरतावाद्यांच्या वर्तमानपत्राचे संपादकही होते. हेच बसान मोसादच्या पहिल्या काही हल्ल्यांपैकी एकाचं लक्ष्य बनले

त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, "माझं लक्ष त्या पुस्तकाने वेधून घेतलं. मोठं पुस्तकं होतं ते आणि मी पहिल्यांदाच चे गव्हेरावर इतकं मोठं पुस्तक पाहिलं होतं. तुम्हाला पुस्तकांचं वेड असले तर तुम्ही काय करता? हातात घेऊन उघडून पाहाता. मीही ते पुस्तक उघडलं आणि तेव्हा मला दिसलं...

"पुस्तकाच्या बांधणीतून दोन तारा गेल्या स्फोटकांना जोडलेल्या होत्या. क्लिक असा आवाज झाला, अर्ध्या क्षणाचा वेळ असेल, मी मागे सरकण्याचा प्रयत्न केला पण स्फोट झाला होता. माझा एक डोळा बाहेर आला, एका कानाने ऐकून येणं बंद झालं, मान चिरली गेली. काय म्हणाल तुम्ही याला? दहशतवाद की शौर्य?"

फोटो स्रोत, Getty Images

मोसाद एका गोष्टीवर भर देत होती. याच गोष्टीमुळे मोसाद जगभरात प्रसिद्ध होत होती - हत्या. बसान अबू शरीफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याने याची सुरुवात झाली होती.

1972 च्या म्युनिक प्रकरणानंतर मोसाद आणि हत्या हे समीकरण ठळकपणे समोर आलं. 1992 साली जर्मनीतल्या म्युनिकमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या 11 खेळाडूंची पॅलेस्टिनी कट्टरतावादी संघटना ब्लॅक सप्टेंबरने गोळ्या घालून हत्या केली.

मोसादची धोरणं इथून बदलली

"प्रश्न फक्त 11 इस्रायली नागरिक मारले जाण्याचा नव्हता. जर्मन सुरक्षा दलाने काही केलं नाही, इस्रायली फौजांना कारवाई करू देण्याची विनंतीही मान्य केली नाही. तेव्हा इस्रायल आणि मोसादने ठरवलं, आता युरोपियन देशांच्या सार्वभौमत्वाला भीक घालायची नाही," रोमन सांगतात.

पुढची अनेक वर्षं या हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या लोकांना मोसाद शोधून शोधून मारत राहिली. यात नॉर्वेत एका मोराक्कन निर्दोष व्यक्तीचीही हत्या मोसादने केली. मोसाद प्रचंड आक्रमक आहे आणि अनेकदा ब्लॅक सप्टेंबरच्या घटनेत सहभागी नसलेल्या लोकांचीही त्यांनी हत्या केली असेही आरोप मोसादवर झाले.

फोटो स्रोत, Alamy

मोसादचं ट्रेनिंग

प्रसंगी टोकाचा वाटणारी देशभक्ती आणि देशभक्ती मोसादच्या डीएनएमध्ये आहे.

"मोसादमधल्या प्रत्येक माणसाची प्रत्येक कृती ही देशभक्तीने प्रेरित असते," रोमन म्हणतात.

पण मोसादमध्ये दाखल होणं सोपं नाही. "तुम्हाला मानसिक, शारीरिक अशा अनेक चाचण्यांमधून जावं लागतं. तुमच्या भाषेची परीक्षा होते," मिश्का बेन डेव्हिड सांगतात. डेव्हिड आता कांदबरीकार असले तरी 1980 च्या दशकात त्यांनी मोसादमध्ये काम केलं आहे.

"माझं एक वर्षांचं प्रशिक्षण झालं. चांगलच खडतर होतं ते. ट्रेनिंग संपलं की वेगवेगळ्या चाचण्या व्हायच्या आणि त्यात काही टास्क करायला सांगितले जायचे. काही तर फारच विचित्र असायचे. उदाहरणार्थ माझा ट्रेनर आणि मी रस्त्यावरून चालत होतो. एका रहिवाशी भागातल्या इमारतीतल्या बाल्कनीकडे बोट दाखवून ते म्हणाले... पुढच्या पाच मिनिटात मला तू त्या बाल्कनीत, त्या घरातल्या मालकाबरोबर गप्पा मारताना दिसला पाहिजेस," ही आठवण सांगतानाही डेव्हिड यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं.

"मला कळत नव्हतं काय करावं, मी तसाच इकडे-तिकडे बघत उभा होतो आणि माझे ट्रेनर म्हणाले साडेचार मिनिटं बाकी. मग मला लक्षात आलं की तिथल्या काही बाल्कन्यांचं रिनोव्हेशन झालेलं आहे. मला आयडिया सुचली. शेजारून ट्रेनर म्हणाले - चार मिनिट! मी वर गेलो, दार वाजवलं तर आतमध्ये एक वृद्ध जोडपं होतं. ते दार उघडायला तयार नव्हते.

"मी त्यांना म्हणालो की दुर्दैवाची गोष्ट आहे की तुम्ही दार उघडत नाही आहात. मी महानगरपालिकेकडून आलोय आणि तुमची बाल्कनी रिनोव्हेट करायला काही निधी उपलब्ध आहे. शेजारच्या तर झाल्याच आहेत. मग त्यांनी मला घरात घेतलं, आम्ही बाल्कनीत गेलो आणि पाच मिनिटं गप्पा मारल्या."

डेव्हिडच्या मते ही त्यांच्या प्रसंगावधानाची चाचणी होती. त्यांना वाटतं की यातून कळतं तुम्ही कसा विचार करता. पाईप चढून जाऊ वगैरे धोकादायक आणि मुर्ख आयडिया तुम्हाला सुचतात की परिस्थिती पाहून तुम्ही मार्ग काढता. तुमच्या कृतीने पोलीस येतात की तुम्ही यातून सुखरूप बाहेर पडता.

मोसाद अशाच लोकांनी बनली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

सध्याच्या गुप्तचर जगात मोसादचं स्थान

मोसादने कधी एकटं काम केलं, कधी मित्र बनवले, कधी मित्रदेशांमध्ये घुसून गुन्हे केले आणि कधी तर हुकुमशहांची साथही दिली. आपल्या देशासाठी जे जे करणं त्यांना योग्य वाटलं त्यांनी केलं.

पण 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेत झालेल्या हल्ल्यानंतर हे चित्र पालटलं. दहशतवाद एकट्या-दुकट्याने नाही तर सगळ्या देशांनी एकत्र येऊन लढण्याचा-संपवण्याचा विषय आहे असं अमेरिकेने घोषित केलं. दहशतवाद जागतिक समस्या बनल्यानंतर मोसादच्या गुप्तहेरांना युरोपमध्ये लपून-छपून फिरण्याची गरज संपली. जगभरातल्या गुप्तचर संस्थांना आता अशा लोकांची गरज होती जी या युद्धात अनुभवी होती.

ट्विन टॉवर पडल्यानंतर सगळ्यांत आधी अमेरिकेने बाहेरच्या कोणत्या गुप्तचर संस्थेची मदत घेतली असेल तर ती मोसाद. अमेरिकेचे अनेक दहशतवादविरोधी आराखडे जसेच्या तसे मोसादकडून उचलले आहेत.

धोकादायक, आक्रमक आणि धुर्त अशी त्यांची प्रतिमा जगभरात बनली आहे.

मोसादचे माजी प्रमुख शाबदाय शवित यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, "आमची प्रतिमा आमची ताकद आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)