इस्रायल-पॅलेस्टाईन वाद : इस्त्रायल आणि हमास यांनी मान्य केलेली शस्त्रसंधी काय आहे?

पॅलेस्टिनी नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी गट हमास यांच्यातील संघर्षाला 11 दिवसांनंतरच्या शस्त्रसंधीमुळे पूर्णविराम मिळाला आहे.

या रणधुमाळीत इस्रायलच्या भूमीवर 4,000 रॉकेट्स दागण्यात आली तर गाझा पट्टीत इस्रायलच्या लष्कराने 1,500 ठिकाणांना लक्ष्य केलं.

या संघर्षात गाझामध्ये 243 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये शंभरहून अधिक महिला आणि बालकांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

या काळात 225 कट्टरतावाद्यांना मारल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. इस्रायलमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे.

शस्त्रसंधीचे तपशील

दोन्ही बाजूंकडून ठरावीक काळासाठी किंवा अनिश्चित काळासाठी आक्रमण केलं जाणार नाही अशी घोषणा म्हणजे शस्त्रसंधी.

इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाचा इतिहास बघता ही धुमश्चक्री केव्हाही पुन्हा सुरू होऊ शकते.

दोन्ही बाजूंनी शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार दोन वाजता आक्रमण थांबवण्याचा निर्णय घेतला.

इस्रायलतर्फे गाझात हवाई हल्ले आणि इस्रायलमध्ये रॉकेट्स दागण्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

गाझा शहरातील हल्ल्यादरम्यानची दृश्यं

शस्त्रसंधीच्या अटी

शस्त्रसंधीसाठी दोन्ही बाजूंतर्फे कोणत्या अटी मान्य करण्यात आल्या याविषयी जुजबी माहिती देण्यात आली, कारण वाटाघाटी पडद्यामागे झाल्या.

इजिप्त, कतार यांच्यासह अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रयत्नांमुळे शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली.

परस्पर सामंजस्याने संघर्ष थांबवण्याचा निर्णय घेत असल्याचं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

हमासच्या नेत्याने बीबीसीला गाझा इथे सांगितलं की, इस्रायल जेरुसलेम शहरातील मुस्लीम धर्मीयांसाठी अतिशय पवित्र अशा अल-अक्सा मशिदीवरील ताबा सोडणार आहे. तसंच शेख जराह या जिल्ह्यात पॅलेस्टाईन नागरिकांना घरातून बाहेर काढलं जात आहे. इथून माघार घेतली जाणार आहे.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

इस्रायलची रॉकेट यंत्रणा

दरम्यान इस्रायलने या म्हणण्याचं खंडन केलं आहे.

हेच दोन मुद्दे इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाचं कारण ठरले होते.

गाझा पट्टीत हवाई हल्ल्यांनी निर्णायक यश मिळवलं असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं. या हल्ल्यांमुळे हमासने भूमिकेत बदल केला असंही त्यांनी सांगितलं.

मानवतेच्या दृष्टीकोनातून केली जाणारी मदत पोहोचावी यासाठी गाझा पट्टीत जाण्यासाठीचा मार्ग खुला करणार असल्याचं इस्रायलने म्हटलं आहे.

इस्रायलमध्ये आणीबाणीसदृश परिस्थितीत जाण्यायेण्यावरील निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. लवकरच विमानसेवा सुरू होईल.

फोटो स्रोत, Getty Images

शस्त्रसंधी कधीपर्यंत लागू असेल?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

शस्त्रसंधी किती काळासाठी असेल अशी वेळेची सीमा ठरलेली नाही मात्र ही शस्त्रसंधी अनिश्चित काळ चालेल, असं दोन्ही बाजूच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

शस्त्रसंधीचा आढावा घेण्यासाठी इजिप्त एक शिष्टमंडळ तेल अविवला तर दुसरं गाझा येथे पाठवणार आहे. ही शिष्टमंडळ कायमस्वरुपी तिथेच तैनात करण्याचा इजिप्तचा मानस आहे.

शस्त्रसंधीमुळे खऱ्या अर्थाने विकासाची दारं खुली झाली आहेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे.

इजिप्त, संयुक्त राष्ट्र संघटना, अमेरिका आणि अन्य देशांनी शस्त्रसंधीसाठी केलेल्या प्रयत्नांची युरोपियन युनियनने प्रशंसा केली आहे.

शस्त्रसंधी लवकरात लवकर लागू व्हावी असं चीनने म्हटलं आहे.

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शस्त्रसंधीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दोन्ही बाजू या संघर्षावर कायमस्वरुपी तोडगा काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेले काही वर्ष या संघर्षावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र या प्रयत्नांना यश मिळू शकलेलं नाही.

जेरुसलेमचं भविष्यातील स्थान, वेस्ट बँक परिसरातील ज्यू रहिवाशांचा मुद्दा, पॅलेस्टाईन निर्वासितांचा प्रश्न, पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता मिळणार का असे मुद्दे आहेत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

इस्रायली मुली आश्रयगृह सोडताना

आधीच्या शस्त्रसंधीवेळी काय घडलं?

2014 संघर्षावेळी, इस्रायली फौजा गाझात घुसल्या. संघर्ष पेटल्यानंतर शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती.

2008 मध्ये इजिप्तमुळे शस्त्रसंधी लागू झाली. मात्र नोव्हेंबरमध्ये पुन्हा संघर्ष भडकला आणि इस्रायलने गाझामध्ये जोरदार आक्रमण केलं.

प्रत्यक्ष परिस्थिती इस्रायल आणि हमास यांच्यात काय होईल ते ठरवेल, असं इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गन्झ म्हणाले होते.

इस्रायली नागरिकांची सुरक्षा हे इस्रायलचं प्राधान्य असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)