राजकन्या लतिफा: दुबईच्या बेपत्ता राजकन्येचा फोटो आला समोर

लतिफा, दुबई, राजकन्या

फोटो स्रोत, Instagram

फोटो कॅप्शन,

मध्यवर्ती बसलेल्या राजकन्या आहेत.

दुबईच्या राजकन्या लतिफा गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहेत. मात्र, या आठवड्यात दोन इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या फोटोंमध्ये दिसलेली तरुणी कथितरीत्या राजकन्या लतिफा असल्याचं बोललं जातंय.

गेल्या अनेक महिन्यांपासून राजकन्या लतिफा कुणालाही दिसलेल्या नाहीत किंवा कुणाला त्यांच्याविषयी माहितीही नाही.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बीबीसी पॅनोरामाने राजकन्या लतिफा यांचा एक व्हिडियो प्रसारित केला होता. त्यात आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचं आणि आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी स्वतः लपून-छपून तो व्हिडियो बनवला होता.

या आठवड्यात इन्स्टाग्रामवर पोस्ट झालेल्या फोटोंची सत्यता बीबीसीने तपासलेली नाही आणि बीबीसीला या फोटोंविषयीची अधिक माहितीही नाही.

मात्र, फोटोत दिसणारी तरुणी राजकन्या लतिफाच असल्याचं त्यांच्या एका मैत्रिणीचं म्हणणं आहे.

राजकन्या लतिफा यांचा फोटो समोर येणं हे अचानक किंवा अपघाताने घडलेलं नाही तर अज्ञात घटनांशी याचा संबंध असल्याचं बीबीसीचं मत आहे.

फ्री लतिफा मोहिमेचे सह-संस्थापक डेव्हिड हेग यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत म्हटलं आहे, "या मोहिमेत बरीच सकारात्मक आणि महत्त्वाची प्रगती झाली, असं आम्ही म्हणू शकतो. सध्या या मुद्द्यावर आम्हाला काही बोलायचं नाही. योग्य वेळी आम्ही प्रतिक्रिया देऊ."

बीबीसीने लंडन येथील सौदी अरब अमिरातीच्या दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बातमी पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही.

संयुक्त राष्ट्रांनी या फोटोवर कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार देत म्हटलं आहे, आम्ही "राजकन्या लतिफा जिवंत असल्याचे ठोस पुरावे मिळण्याच्या" प्रतिक्षेत आहोत. सौदी अरब अमिरातीने यासंदर्भातली माहिती देण्याचं आश्वासन दिल्याचं संयुक्त राष्ट्रांचा म्हणणं आहे.

फोटोमध्ये काय दिसतं?

फोटोमध्ये राजकन्या लतिफा दुबईतील एका शॉपिंग मॉलमध्ये (मॉल ऑफ अमिरात, एमओई) असल्याचं दिसतं. त्यांच्यासोबत आणखी दोन महिला आहेत.

फोटोमधल्या दोन्ही महिलांना आपण ओळखत असल्याचं आणि राजकन्या लतिफाही त्यांना ओळखत असल्याचं लतिफा यांच्या मैत्रिणींचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, PRINCESS LATIFA

फोटो कॅप्शन,

राजकन्या लतिफा

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो अपलोड केला आहे. त्यामुळे या फोटोचा मेटाडेटा काढता येत नाही. मेटाडेटावरून फोटो कुठल्या तारखेला आणि किती वाजता काढला तसंच कुठे (स्थळ) काढला, याची अचूक माहिती मिळते.

हा फोटो उलट (रिव्हर्स) केलेला आहे. फोटोमध्ये मागे 'डेमन स्लेयर : मुगेन ट्रेन' नावाच्या एका चित्रपटाची जाहिरात दिसते. दुबईत यावर्षी 13 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

फोटोमध्ये राजकन्या लतिफा यांच्यासोबत असलेल्या दोन महिलांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याच आठवड्यात गुरुवारी हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. यापैकीने एकीने फोटोसोबत लिहिलं आहे, "मैत्रिणींसोबत एमओई मॉलमध्ये एक सुंदर संध्याकाळ".

राजकन्या लतिफा यांची प्रकृती आणि फोटोंसाठी बीबीसीने या दोन्ही महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींनीही बीबीसीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं नाही.

ह्युमन राईट्स वॉच अॅडव्होकसी ग्रुपचे केनेथ रॉस यांनी बीबीसीला सांगितलं, "हा फोटो खरा आहे, असं मानलं तरी यावरून राजकन्या लतिफा जिवंत असल्याचं दिसत असलं तरी त्यांना बंदी बनवलेलं आहे का किंवा त्यांच्या स्वातंत्र्याविषयी कुठलीही माहिती मिळत नाही."

दुबईतील राजघराण्यानेही या फोटोवर अजून कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही, "राजकन्या लतिफा घरीच आहेत आणि त्यांची काळजी घेतली जात असल्याचं" याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात बीबीसीला सांगण्यात आलं होतं.

यूएईने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करत म्हटलं होतं, "त्यांच्या प्रकृतीची सगळी काळजी घेतली जात आहे आणि त्या लवकरच सार्वजनिक जीवनात परत येतील, अशी आशा आहे."

नेमकं काय घडलं?

राजकन्या लतिफा दुबईचे शासक शेख मुहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या 25 अपत्यांपैकी एक आहेत. फेब्रुवारी 2018 मध्ये लतिफा यांनी दुबईतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताच्या सागरी हद्दीजवळ त्यांना पकडण्यात आलं.

पळून जाण्याआधी राजकन्या लतिफा यांनी एक व्हिडियो रेकॉर्ड केला होता. त्यात "मला गाडी चालवण्याची परवानगी नाही. मला प्रवास करण्याची किंवा दुबईतून बाहेर पडण्याचीही परवानगी नाही," असं त्या म्हणाल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

राजकन्या लतिफा आणि त्यांचे वडील शेख मुहम्मद बिन राशीद अल मकतूम

"2000 सालापासून मी दुबईबाहेर गेलेले नाही. मी फक्त प्रवास करणे, शिक्षण किंवा इतर सामान्य गोष्टींसाठीची परवानगी मागत असते. मात्र, माझ्या सर्व मागण्या फेटाळण्यात आल्या. मला बाहेर पडायचं आहे," असंही त्यांनी म्हटलं होतं.

मात्र, देश सोडून जाण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. भारताच्या सागरी हद्दीजवळ कमांडोजने त्यांना अटक केली आणि दुबईला परत पाठलं.

आपल्यासाठी ही मोहीम 'एखाद्या बचाव मोहिमेसारखी' होती, असं लतिफा यांनी आपल्या वडिलांना म्हटलं होतं.

यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये बीबीसी पॅनोरामाने राजकन्या लतिफा यांनी लपून-छपून बनवलेले व्हिडियो प्रसारित केले होते. दुबईत परतल्यापासून आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचं त्यांनी या व्हिडियोमध्ये म्हटलं आहे.

खिडक्या नसलेल्या एका महालात दरवाजे बंद करून कडक पोलीस बंदोबस्तात आपल्याला ठेवण्यात आल्याचं लतिफा यांनी म्हटलं होतं. या महालात वैद्यकीय किंवा कायदेशीर मदत मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)