आरोग्य आणि आनंदासाठीचा भूतानी लोकांचा 350 वर्षे जुना 'सुगंधी फॉर्म्युला' माहितीये?

  • सिमॉन उर्विन,
  • बीबीसी फ्यूचर
भूतानी धूप

फोटो स्रोत, Simon urvin

फुलांच्या शेतात एक स्त्री स्तन उघडे ठेवून एका पायावर उभी होती. तिने सोनेरी मुकुट घातला होता आणि माणिक व पाचूंचा हार घातला होता. तिच्या उजव्या हातात एक धुपाची कांडी होती.

"ही दुग्पोएमा- धूप देणारी बौद्ध देवता," नादो म्हणाले. भूतानची राजधानी थिम्फू इथल्या कार्यालयातील त्यांच्या भिंतीवर या देवतेची प्रतिमा आहे. "भगवान बुद्धाने पहिल्यांदा धुपाची निर्मिती केली, मग दुग्पोएमासारख्या त्यांच्या अनुयायांनी जगभर या धुपाचा प्रसार केला. अनेक अर्थांनी मी स्वतःलादेखील त्यांचा अनुयायी मानतो. मी तेच कार्य करतो आहे."

भूतानमध्ये आडनाव न वापरण्याची परंपरा असल्यामुळे नादो यांचं नाव एका शब्दाचंच आहे. तर, त्यांनी मला 'नादो पोइझोखांग' हा त्यांचा धूपनिर्मितीचा कारखाना दाखवायला नेलं. देशातला हा सर्वांत जुना व सर्वांत मोठा धूपनिर्मितीचा कारखाना आहे, इथे उदबत्त्या आणि पूड तयार केली जाते. हिमालयाच्या कुशीतील या देशात सर्व घरांमध्ये व मठांमध्ये या सामग्रीला मागणी असते. अगदी राजासुद्धा व्यक्तीशः नादो पोइझोखांगमधून धूप मागवतो आणि शाही महालामध्ये तो लावला जातो.

"माझ्या कारखान्यातला धूप चांगला मानला जातो आणि त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो, त्याचं एक कारण बहुधा हे असेल की, आम्ही वापरतो ते घटक पदार्थ पूर्णतः शुद्ध असतात," नादो म्हणाले. त्यांनी स्टोअररूमचा दरवाजा उघडला तेव्हा आत कोरडे मसाले व सदाहरित वनस्पतींचे ढीग होते.

"हे सगळं 100 टक्के सेंद्रिय आहे- जुनिपरच्या (सर्व भूतानी धुपांमध्ये हा प्राथमिक घटक असतो) मोठ्या फांद्यांपासून सुगंधी तेलासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यंत नाजूक जटांमासीच्या फुलांपर्यंत सगळं इथे आहे. इतर धूपनिर्माते कदाचित खर्च कमी करण्यासाठी रसायनं आणि कमी प्रतीची सामग्री वापरत असतील, त्यातून धुपाचे रोगमुक्तीकारक गुण कमी होतात आणि असा धूप लावल्यावर आपल्याला डोकेदुखी किंवा त्रासच अनुभवावा लागू शकतो. आमच्या इथे मात्र गुणवत्तेला मध्यवर्ती स्थान आहे."

फोटो स्रोत, Simon Urwin

नादो वापरतात त्यातील अनेक औषधी वनस्पती व पानांची लागवड उंच डोंगराळ भागांमध्ये याक पाळणाऱ्या भटक्या समूहांनी केलेली असते. या वनस्पती विषारी घटकांपासून मुक्त असतात. "ती माणसं खडतर आयुष्य जगतात, पण या लागवडीतून त्यांना जास्तीचं उत्पन्न मिळतं," नादो सांगतात. "म्हणजे उदबत्तीची एक काडी पेटवण्याआधीच चांगल्या कृतीमुळे सत्कर्माला गती मिळालेली असते."

लागवडीची वेळ अत्यंत महत्त्वाची असते. 'थ्रू-बाब' म्हणजे ईश्वरी कृपेच्या वर्षादिवसानंतरच्या महिन्यात या पिकांची लागवड केली तर सर्वाधिक उपज मिळते. या काळात मान्सून संपलेला असतो. "काही महिने पावसाने जोपासना झालेली पानं व पाकळ्या उन्हामुळे उबदार राहतात. यातून मला उत्तम पर्फ्यूम बनवायला मदत होते. हा पर्फ्यूम उदबत्त्या व पूड बनवायला मूल्यवान असतो, तरच धूप, उदबत्त्या यातून पूर्वापार दिसत आलेली जादू दिसू शकते."

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

सुगंध व धूर यांना भूतानमध्ये प्रदीर्घ इतिहास व खोलवरचं सांस्कृतिक महत्त्व आहे. या देशात परंपरेने दिवसातून दोनदा धूप लावला जातो. "इतर देशांमध्ये धूप वा उदबत्त्या केवळ समारंभांमध्येच वापरल्या जात असतील कदाचित, पण भूतानमध्ये आमच्या दिवसाची सुरुवातच यापासून होते," असं नादो सांगता. "इथे हा एक अनिवार्य विधी आहे."

कित्येक शतकं धूप ज्या रितीने वापरला गेला, त्याच रितीने अजूनही वापरला जातो. पूड किंवा उदबत्ती यांपैकी एका रूपात धूप वापरला जातो. पूड अधिक धूर निर्माण करते आणि घरं, मठ व मंदिरांमध्ये निखाऱ्यावर ही पावडर जाळली जाते. देवासमोर लावण्यासाठी आणि पवित्र खोल्या साफ करताना, दुष्टात्म्यांना पळवून लावण्यासाठी व नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी याचा वापर होतो. उदबत्त्यांचा वापरही देवासमोर लावण्यासाठी होतो, पण त्यातून उपचारी गुणही मिळतात.

"सुगंधी धूर संथपणे येत राहिला, तर त्यातून मनाची मशागत होते व संवेदना उत्तेजित होतात," असं नादो सांगतात. "यातून आनंद मिळतो आणि मनःशांती लाभते. धूपनिर्मितीसाठी मी वापरतो ती पद्धत हे सर्व साधणारी आहे, पण त्याचसोबत कुंठीत ऊर्जा मुक्त करणं आणि अनेक प्रकारजे आजार बरे करणं, हे उपायही त्यातून होतात."

सुदृढ आरोग्यासाठी व आनंदासाठी पूर्ण नैसर्गिक पदार्थांनी बनलेल नादो यांचं सूत्र अत्यंत गोपनीय आहे. केवळ त्यांना स्वतःला व त्यांची मुलगी लामदोन या दोघांनाच हे सूत्र माहीत आहे. भारतामधील 350 वर्षांहून जुन्या माइंडरोलिंग तिबेटी बौद्ध मठामध्ये प्रचलित असणाऱ्या धूपनिर्मितीच्या पद्धतीवर हे सूत्र आधारलेलं आहे, असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

"मूळच्या पद्धतीमध्ये केशराचं प्रमाण इतकं जास्त होतं की त्यानुसार आज धूप केला तर तो खूप महागडा होईल आणि सर्वसामान्य लोकांना ते परवडणार नाही, त्यामुळे मी या पद्धतीत काही बदल केले," असं नादो म्हणाले. "सुगंध व उपचाराचे गुण वाढवण्यासाठी मी बौद्ध धर्मातील द्रुक्पा काग्यू पंथातील दुसऱ्या एका धूपनिर्मितीच्या पद्धतीशी या पद्धतीचा संयोग केला. माझ्या नेहमीच्या धुपामध्ये मी 30 घटक वापरतो, आणि महत्त्वाच्या धार्मिक समारंभांवेळी राखीव असलेल्या धुपामध्ये 108 घटक असतात. बौद्ध लोक 108 ही संख्या शुभ मानतात आणि बौद्ध ज्योतिषी वेळापत्रकानुसार केवळ पवित्र दिवशीच हा विशेष प्रकारचा धूप करता येतो."

धूप तयार करण्यासाठी विविध घटक-पदार्थांची (साली, मसाले, लाकडाच्या चकत्या, फुलं व पानं यांची) कारखान्यात पूड केली जाते. धूप तयार करताना काय वापरलं जातं याचा साधारण अंदाज या टप्प्यावर काम करणाऱ्या माणसांना असतो, पण त्यांना अचूक प्रमाण माहीत नाही, असं नादो सांगतात. "आणि मी शेवटी कपातून जे काही टाकतो त्याबद्दल तर त्यांना नक्कीच काही माहीत नाही."

थेट पेटवण्यासाठी तयार केलेली पूड अधिक धूर निघावा यासाठी अधिकच्या औषधी वनस्पतींमध्ये मिसळली जाते, मगच त्याचं पॅकेजिंग होतं, असं मात्र ते सांगतात. उदबत्त्यांसाठीची पूड पाणी, मध व नैसर्गिक जांभळ्या रंगात मिसळली जाते, त्यातून पिठूळ पदार्थ तयार होतो, तो आंबण्यासाठी एका मोठ्या कुंडात आठवडाभर ठेवला जातो.

"ती खजिन्याची पेटी असल्याप्रमाणे मी तिचा विचार करतो," नादो सांगतात. आंबट सुगंध येण्यासाठी मी हळूच झाकण उघडून आत बघतो. "अनेक लोकांना आतल्या खजिन्यावर डल्ला मारायला आवडेल."

ती पूड आंबल्यानंतर नादो व त्यांचे सहकारी त्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवतात, कारण या टप्प्यावर पदार्थ वाया जाण्याची सहज शक्यता असते. "इथलं बरंच काम हाताने होतं. हा कारागिरीचा भाग आहे, सार्वत्रिक उत्पादन म्हणून इते काही केलं जात नाही."

मग नादो मला शेजारच्या खोलीत घेऊन गेले, तिथे धूपनिर्मितीचा पुढचा टप्पा पार पडतो. नादो यांच्या 12 महिला सहकाऱ्यांपैकी एक असणाऱ्या ग्येनझांग ती आंबलेली मातीसारखी पूड एका यंत्राच्या भांड्यात टाकत असतात, या यंत्रातून काही सेकंदांमध्ये त्या पिठूळ लगद्याचं रूपांतर मऊ धुपाच्या रिळांमध्ये होतं.

फोटो स्रोत, Simon urvin

"धूपनिर्मितीच्या प्रक्रियेत मनापासून काम करावं लागतं," त्या म्हणाल्या. यंत्रातून बाहेर पडणारी मनुकेच्या आकाराची ती गुंडाळी त्यांनी एका ट्रेमध्ये घेतली. "आम्ही अत्यंत प्रेमाने हे काम करतो. आमच्यातल्या कोणालाही चांगलं शिक्षण मिळालेलं नाही. नादोंनी इथे काम दिलं नसतं, तर आम्हाला उपजीविकेसाठी खूप संघर्ष करावा लागला असता," असं सांगत ते त्यांच्या हातातला ट्रे येशे या सहकारी महिलेकडे देतात. आता त्या गुंडाळीला सरळ केलं जाईल.

गुंडाळी सरळ करण्याचं काम झाल्यावर उदबत्तीसारख्या काड्या एका कापडावर ठेवून वाऱ्यावर सुकवल्या जातात, मग ठरलेल्या आकारामध्ये आणून बाजारात पाठवण्यासाठी त्यांचे गठ्ठे केले जातात. "आम्ही महिन्याला सुमारे 20 हजार उदबत्त्या तयार करतो आणि 350 किलो पूड तयार करतो," असं नादो म्हणाले.

"आता आम्ही चीन, अमेरिका व युनायटेड किंगडमपर्यंत निर्यातही करतो. मला या व्यवसायामध्ये उपजीविका कमावता येत असली, तरी माझ्या कमाचं अध्यात्मिक महत्त्व जास्त आहे, पैसा त्यानंतर येतो. गेली 50 वर्षं धूप तयार करणं हा माझ्या बौद्ध भक्तिमार्गाचा बाग आहे. हे माझं ध्येय आहे. यातून मला व्यक्तीशः खूप समाधान मिळतं, कारण लोकांना धुपाचा किती लाभ होतो हे मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येतं. इकडे या, दाखवतो."

नादो आणि मी वृक्षाच्छादित डोंगराळ भागातून थिम्पूच्या मध्यवर्ती भागाकडे जातो. आपल्याला जीवनाचा उद्देश सापडलेला आहे, असं त्यांनी वाटेत मला सांगितलं. "वयाच्या पंधराव्या वर्षी मी भिक्खू झालो आणि 10 वर्षं मठात होतो," ते म्हणाले. "सुलेखनात मी प्रवीण होतो. भूतानच्या तिसऱ्या राजांनी मला बौद्ध सूत्रं सोनेरी लिपीत लिहिण्याचं काम दिलं होतं. ते काम पूर्ण झाल्यावर मला असंच काहीतरी संतोष मिळणारं काम करायचं होतं. सर्जनशीलता आणि पवित्र कार्य यांचं मिश्रण असेल असं काहीतरी. यातून मग मी धप तयार करण्याच्या व्यवसायात आलो."

थिम्पूमध्ये आम्ही मोठ्या 'सेन्टेनरी फार्मर्स मार्केट'मध्ये आलो. तिथे तळमजल्यावर फक्त फळं व भाज्या होत्या, वरच्या मजल्यावर धूप, उदबत्त्या इत्यादी उत्पादनं होती. पोटदुखीतून मुक्तता देणारे, विश्रांती मिळवून देणारे आणि पिशाच्च उतरवणारेही धूप तिथे होते.

एका स्टॉलवर आम्ही शोदेन नावाच्या महिलेशी गप्पा मारल्या. त्या स्वतःच्या घराजवळच्या मंदिरात नादो यांचा धूप अनेकदा लावत असत. ताज्या उदबत्त्या विकत घेण्यासाठी त्या तिथे आल्या होत्या.

"मी सकाळी दात घासते, तसंच सकाळी तीन आणि रात्री तीन उदबत्त्या लावते," असं त्या म्हणाल्या. "हे केलं नाही तर मला काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. माझ्या पूर्वजांनी ही प्रथा माझ्या हाती सोपवलेली आहे आणि मी माझ्या मुलांपर्यंत ती पोचवलेय. आपण अन्न खातो, पाणी पितो, हवेत श्वास घेतो, तितकचं उदबत्ती लावणं महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना- श्रीमंतांना व गरिबांना एकत्र आणणारी ही प्रथा आहे."

नादो त्यांचा धूप ज्या मठाला पुरवतात तिकडे आम्ही गेलो. तिथ्या सूर्यप्रकाशाने भरलेल्या प्रार्थनाखोलीमध्ये एक भिक्खू धूपपात्र हलवत होते, त्यातून सुगंधी धूर हवेत पसरत होता. "मी पूजा करतो तेव्हा खोलीतली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मला अध्यात्मिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या स्वच्छ वाटतं," असं ते म्हणाले. "धुपामुळे मला प्रार्थनेवर लक्ष केंद्रित करायला मदत होते व माणूस म्हणून विकसित होता येतं. यातून मला स्वतःचं सर्वोत्तम रूप घडवायला मदत होते."

कॉरिडॉरच्या शेवटी एक अभ्यासखोली होती. तिथे काही भिक्खू मांड्या घालून बसले होते, त्यांची केस काढलेली डोकी समोरच्या प्रार्थनापुस्तकांमध्ये गढून गेली होती, प्रत्येक भिक्खूच्या शेजारी मोठी उदबत्ती लावलेली होती.

"निव्वळ एका उदबत्तीमध्येही प्रचंड ताकद असते, अशी माझी श्रद्धा आहे," असं वांगचुक नावाचे एक भिक्खू म्हणाले. नादो यांनी मान डोलावत त्यांना दुजोरा दिला.

"धुपामुळे आपल्या जीवनमार्गातील अपशकुन व अडथळे दूर होतात," वांगचुक पुढे म्हणाले. "लोकांनी एकमेकांशी अधिक दयाभावाने वागावं, यासाठीचा मार्ग त्यातून तयार होतो. धुपामुळे आनंदाची दारं खुली होतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)