DR कांगोत ज्वालामुखीचा विस्फोट, हजारो लोकांचे स्थलांतर

निरागोंगो ज्वालामुखी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

लाव्हारसाची धग लागून आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं घर

डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये (DR) ज्वालामुखीचा विस्फोट होऊन लाव्हारस बाहेर आल्याची घटना घडली आहे. विस्फोट होऊन सर्वत्र पसरलेला लाव्हा गोमा शहराजवळ येऊन थांबला आहे.

लाव्हारसाची धग लागून गोमा शहराच्या उत्तर भागात अनेक घरांचं नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

DR कांगो आणि रवांडा या देशाच्या सीमेवर वसलेल्या गोमा शहरात सुमारे 20 लाख नागरिक राहतात. गोमा शहराच्या उत्तरेला 10 किलोमीटरवर माऊंट निरागोंगो हा जिवंत ज्वालामुखी आहे.

शनिवारी (22 मे) निरागोंगो ज्वालामुखीचा विस्फोट झाला. या विस्फोटानंतर ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हारस आजूबाजूच्या परिसरात पसरू लागला आहे.

हे निदर्शनास येताच परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोक आपापलं सामान आणि अंथरूण-पांघरूण यांसारख्या वस्तू घेऊन या परिसरातून पळ काढू लागले.

पसरणाऱ्या लाव्हारसापासून स्वतःला वाचवण्यासाठी लोक बाजूच्या रवांडा देशाकडे पलायन करू लागले. त्याचप्रमाणे अनेक जण शहराच्या पश्चिमेकडे असलेल्या इतर शहरांकडे जाऊ लागले.

ज्वालामुखीच्या विस्फोटानंतर सीमा पार करून सुमारे 3 हजार नागरिक रवांडाच्या हद्दीत आले आहेत. या स्थलांतरितांची सोय आजूबाजूच्या शाळा आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात करण्यात येत आहे, अशी माहिती रवांडाच्या प्रशासनाने दिली आहे.

फोटो स्रोत, EPA

गोमा शहरात राहणारे रिचर्ड बहाती सांगतात, "मी त्यावेळी घरीच होतो. लोकांच्या ओरडण्याचा गोंधळ ऐकू येऊ लागला. ते ऐकून मी बाहेर आलो तर एक विदारक दृश्य मला पाहायला मिळालं. आकाश लालबुंद झालं होतं. आता काय होणार, अशी मला भीती वाटू लागली. 2002 मध्ये हा ज्वालामुखी फुटला होता, त्यावेळीही मी इथंच होतो. त्यावेळी माझं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं."

DR कांगो प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वालामुखी विस्फोटानंतर पळापळी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, EPA

सध्या तरी शहराच्या पूर्वेकडे असलेल्या विमानतळाकडे येऊन लाव्हारस थांबला आहे. या आपत्तीमुळे किती जिवितहानी झाली. किती घरांचं नुकसान झालं, याबाबत अधिक माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.

DR कांगोची राजधानी किन्शासा येथील बीबीसी प्रतिनिधी एमरी माकुनेनो यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

फोटो स्रोत, Reuters

त्यांनी सांगितलं, "बहुतांश लाव्हारस वाहून शहराच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या जंगलाच्या दिशेने गेला. तिथून जवळच असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ जाऊन हा लाव्हा सध्यातरी थांबलेला आहे. लाव्हारसाच्या कवेत आल्याने अनेक घरांना आग लागली. एका स्मशानभूमीवर पूर्णपणे लाव्हारसाच्या थर पांघरला गेला आहे.

माऊंट निरागोंगो जगातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो. सध्या गोमा व्होल्कॅनो ऑब्झर्व्हेटरी संस्थेकडे या ज्वालामुखीवर नजर ठेवण्याची जबाबदारी आहे. मात्र ते हे काम योग्य प्रकारे करत नसल्याचा आरोप केला जातो.

फोटो स्रोत, Reuters

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जागतिक बँकेने ऑब्झर्व्हेटरीला केली जाणारी आर्थिक मदत रोखली आहे.

ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर अनेक तास लाव्हा बाहेर पडत असल्याचा आवाज तिथून येत होता.

फोटो स्रोत, Reuters

यापूर्वी 2002 मध्ये निरागोंगो ज्वालामुखीचा विस्फोट झाला होता. त्यावेळी 250 नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला होता. हजारो घरं उद्ध्वस्त झाली तर 1 लाख 20 हजार नागरिक बेघर झाले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)