नेपाळ राजघराणं हत्याकांड : राजकुमार दीपेंद्र यांनी जेव्हा नेपाळच्या राजा-राणीची हत्या केली होती...

  • रेहान फजल
  • बीबीसी प्रतिनिधी
नेपाळ शाही परिवार

फोटो स्रोत, Getty Images

1 जून, 2001 च्या सायंकाळी नेपाळच्या राजाचं निवासस्थान असलेल्या नारायणहिती महालाच्या त्रिभुवन सदनामध्ये एक पार्टी होणार होती आणि या पार्टीचे आयोजक होते युवराज दीपेंद्र.

प्रत्येक नेपाळी महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी होणाऱ्या या पार्टीची सुरुवात महाराज वीरेंद्र यांनी 1972 मध्ये राजकारभार सांभाळल्यानंतर केली होती.

एका महिन्यापूर्वी झालेली पार्टी महेंद्र मंजिलमध्ये झाली होती. त्याठिकाणी महाराज वीरेंद्र यांच्या सावत्र आई आणि माजी नेपाळ नरेश महेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी रत्नादेवी राहायच्या. शर्ट आणि पायजमा परिधान केलेले युवराज दीपेंद्र त्यांचे एडीसी मेजर गजेंद्र बोहरा यांच्याबरोबर सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी बिलियर्ड्स रूममध्ये पोहोचले होते. त्यांनी मेजर बोहरा यांच्याबरोबर काही वेळ बिलियर्ड्सच्या काही शॉट्सचा सरावही केला होता.

पार्टीमध्ये सर्वांत आधी महाराज वीरेंद्र यांचे भाऊजी आणि भारतातील सरगुजा प्रांताचे राजकुमार राहिलेले महेश्वर कुमार सिंह हे पोहोचले होते. ते बिलियर्ड्स रूममध्ये घुसले तर युवराज दीपेंद्रने त्यांचं स्वागत केलं. आपल्याला काय प्यायला आवडेल असं त्यांना विचारलं? त्यावर महेश्वर सिंह यांनी फेमस ग्राऊस असं उत्तर दिलं.

थोड्या वेळात लाल साडी परिधान केलेल्या महाराणी ऐश्वर्य आणि महाराज वीरेंद्र यांच्या तिन्ही बहिणी राजकुमारी शोभा, शांती आणि शारदाही पोहोचल्या. सुमारे 7 वाजून 40 मिनिटांनी दीपेंद्रचे चुलत भाऊ पारस त्यांची आई राजकुमारी कोमल, बहीण प्रेरणा आणि पत्नी हिमानीबरोबर पोहोचले.

नेपाळ शाही परिवार

फोटो स्रोत, TALK MIRAMAX BOOKS

महाराज वीरेंद्र यांना यायला थोडा उशीर झाला कारण ते एका वृत्तपत्राचे संपादक माधव रिमाल यांना मुलाखत देत होते. यादरम्यानच महाराजांच्या आई त्यांच्या मर्सिडीजमध्ये पोहोचल्या. एका हातात त्यांची पर्स आणि दुसऱ्या हातामध्ये हाताने हवा घेण्याचा पंखा होता. त्या बिलियर्ड्स रूमला लागून असलेल्या एका छोट्याशा खोलीत जाऊन बसल्या.

काही मिनिटांनी बिलियर्ड्स रूमचे दार उघडले आणि महाराजा वीरेंद्र यांनी आत प्रवेश केला. कारने येण्याऐवजी ते कार्यालयातून पायी तिथे आले होते. त्यांचे एडीसी सुंदर प्रताप राणा त्यांना दरवाजापर्यंत सोडून निघून गेले, कारण त्यांना एका खासगी पार्टीला जायचं होतं शिवाय त्याठिकाणी कुटुंबाबाहेरील लोकांना थांबण्याची परवानगी नव्हती. ते सरळ त्यांच्या आईकडे गेले.

दीपेंद्र यांना त्यांच्या बेडरूममध्ये नेले

यादरम्यान दीपेंद्र यांना नशा चढल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. त्यांना नीट बोलता येत नव्हतं आणि उभंही राहता येत नव्हतं. काही मिनिटांमध्येच ते खाली पडले. त्यावेळी रात्रीचे साडेआठ वाजले होते. त्यापूर्वी दीपेंद्र कधीही जास्त दारु प्यायले असले तरी एवढे नशेत दिसले नव्हते. त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता यायचं.

युवराज दीपेंद्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

युवराज दीपेंद्र

महाराज वीरेंद्र शेजारच्या खोलीतून बिलियर्ड्स रूममध्ये पोहोचण्याआधी पारस, राजकुमार निराजन आणि डॉक्टर राजीव शाही यांनी दीपेंद्र यांना हात आणि पायाने पकडून उचललं आणि त्यांच्या बेडरूममध्ये नेऊन जमिनीवर अंथरलेल्या गादीवर झोपवलं होतं. त्यानंतर बेडरूमचे दिवे बंद करून ते पार्टीत परत पोहोचले.

जोनाथन ग्रेगसन यांनी त्यांच्या 'मॅसेकर अॅट द पॅलेस' मध्ये लिहिलं आहे की, "खोलीत सोडल्यानंतर दीपेंद्र बाथरूममध्ये गेले आणि त्याठिकाणी उलटी केली. त्यानंतर त्यांनी एक लष्करी गणवेश परिधान केला. त्यावर त्यांनी काळे मोजे, एक जॅकेट, लष्करी बूट आणि काळे लेदरचे हातमोजे परिधान केले. त्यानंतर त्यांनी त्यांची आवडती 9 एमएम पिस्टल आणि MP5K सबमशीन गन आणि कोल्ट एम- 16 रायफल उचलली आणि ते बिलियर्ड्स रूमकडे निघाले."

दीपेंद्रने लष्करी वेशात बिलियर्ड्स रूममध्ये प्रवेश केला

बिलियर्ड्स रूमच्या मध्यभागी काही महिला बोलत होत्या. अचानक त्यांची नजर लष्करी गणवेश परिधान केलेल्या दीपेंद्रवर पडली.

दीपेंद्र

फोटो स्रोत, Getty Images

महाराज वीरेंद्र यांची चुलत बहीण केतकी चेस्टर यांनी बीबीसी बरोबर बोलताना सांगितलं की, "जेव्हा ते आल आले तेव्हा त्यांच्या दोन्ही हातात बंदुका होत्या. ते पूर्ण लष्करी गणवेशात होते. त्यांनी काळा चष्माही परिधान केला होता. मी माझ्याजवळ उभ्या असलेल्या महिलेला म्हटलं की, युवराज दीपेंद्र त्यांची शस्त्रं घेऊन शो ऑफ करायला (फुशारकी मारायला) आले आहेत."

तोपर्यंत नेपाळ नरेश बिलियर्ड्स रूममध्ये आलेले होते. त्यांच्या हातात कोकचा एक ग्लास होता. कारण डॉक्टरांनी त्यांच्या मद्यपानावर बंदी घातलेली होती. दीपेंद्रने वडिलांकडं पाहिलं. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते.

पुस्तक कव्हर पेज

फोटो स्रोत, JONATHAN GREGSON

पुढच्याच सेकंदाला त्यांनी उजव्या हाताने जर्मनीमध्ये तयार झालेल्या त्यांच्या MP5-K सबमशीन गनचे ट्रिगर दाबले. त्याच्या अनेक गोळ्या छताला लागल्या आणि त्याठिकाणचं प्लास्टर उखडलं गेलं.

नेपाळ नरेश म्हणाले 'के कारदेको'

काही सेकंदांपर्यंत सर्व पाहुणे जिथं होते तिथंच स्तब्ध झाले जणू ते दीपेंद्र पुढे काय करतो याची वाट पाहत होते. सर्वांना वाटलं की, दीपेंद्र काहीतरी खेळत असेल आणि चुकून त्यांच्या बंदुकीतून गोळी झाडली गेली असावी.

पुस्तक कव्हर पेज

फोटो स्रोत, MIRAMAX BOOKS

Skip podcast promotion and continue reading
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of podcast promotion

जोनाथन ग्रेगसन त्यांच्या 'मसॅकर अॅट द पॅलेस' मध्ये लिहिलात की, "सुरुवातीला नेपाळ नरेश बिलियर्ड्स टेबलच्या शेजारी शांतपणे उभे राहिले. पण नंतर त्यांनी दीपेंद्रच्या दिशेनं एक पाऊल टाकलं. त्यानंतर दीपेंद्रनं काहीही न बोलता त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या, त्यानंतर ते काहीवेळ तिथ उभे होते, स्लो मोशनमध्ये त्यांनी हातातला ग्लासही टेबलवर ठेवला."

तेवढ्यात दीपेंद्र वळले आणि बिलियर्ड्स रूममधून गार्डनकडे गेले. तीन सेकंदांनंतर लोकांच्या लक्षात आलं की, दीपेंद्रची गोळी महाराज वीरेंद्र यांच्या मानेच्या उजव्या बाजुला लागली आहे.

केतकी चेस्टर सांगतात की, "महाराज प्रचंड धक्क्यात होते, हे आम्हाला जाणवत होतं. जे अगदी हळूवारपणे खाली पडले होते."

दरम्यान, नेपाळ नरेश यांचे जावई कॅप्टन राजीव शाही यांनी त्यांचा ग्रे रंगाचा कोट काढला आणि महाराजांच्या मानेवर रक्त थांबावं म्हणून त्या कोटानं दाबून धरलं. तोपर्यंत वीरेंद्र बेशुद्ध झाले नव्हते. त्यांनी दुसऱ्या जखमेकडं इशारा करत म्हटलं, "राजीव पोटातही."

त्याचवेळी महाराज वीरेंद्र यांनी डोकं वर उचलण्याचा प्रयत्न केला आणि नेपाळीमध्ये बडबडले "के कारदेको" म्हणजे "तू हे काय केलंस?" हेच त्यांचे अंतिम शब्द होते.

त्याचवेळी दीपेंद्र यांनी खोलीत पुन्हा प्रवेश केला. तोपर्यंत त्यांनी इटलीमध्ये तयार झालेली गन खाली टाकली होती. आता त्यांच्या हातामध्ये एम- 16 रायफल होती.

राजघराण्याला अमान्य असलेल्या मुलीशी जवळीक

अखेर दीपेंद्र यांनी महाराज वीरेंद्र यांना गोळ्या का घातल्या? बीबीसीने हाच प्रश्न दीपेंद्र यांच्या आत्या केतकी चेस्टर यांना विचारला.

महाराज बीरेंद्र

फोटो स्रोत, PENGUIN BOOKS

फोटो कॅप्शन,

महाराज वीरेंद्र

केतकी म्हणाल्या की, "त्यांना एका मुलीशी लग्न करायचं होतं. त्यांची आजी आणि आईला हे मान्य नव्हतं. त्यांना खर्च करण्यासाठी हवे तेवढे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे त्यांना राग अनावर झाला होता."

दीपेंद्र या सर्वामुळं प्रचंड निराश होते. त्यांची मानसिक अवस्थाही फारशी चांगली नव्हती. लंडनपर्यंत या सर्वाबाबत माहिती पसरली होती. मे 2001 च्या सुरुवातीला लंडनमधील त्यांचे पालक राहिलेल्या लॉर्ड केमॉएज यांनी महाराज वीरेंद्र यांना एक फॅक्स करून याबाबत इशारा दिला होता. युवराज त्यांची भूमिका आणि त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न न करण्याच्या अधिकारामुळे नाराज असल्याचं त्यांनी लिहिलं होतं.

महाराणी ऐश्वर्य यांना जाणीव झाली होती की, त्यांना दीपेंद्रला त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न करण्यापासून रोखणं त्यांच्यासाठी अत्यंत कठीण ठरणार आहे. त्यासाठी त्यांनी दीपेंद्रला हे स्पष्ट केलं होतं की, जर त्यांनी या प्रकरणात आई वडिलांचं म्हणणं ऐकलं नाही तर त्यांना राजघराण्यातली पदवी मिळणार नाही.

काकावर चालवली गोळी

दीपेंद्र गोळीबार करत असताना दीपेंद्र यांचे आवडते काका धीरेंद्र यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.

केतकी चेस्टर

फोटो स्रोत, NEPAL TIMES

केतकी चेस्टर यांच्या मते, "अचानक महाराज वीरेंद्र यांचे छोटे भाऊ धीरेंद्र शाह यांनी दीपेंद्र यांना अडवत म्हटले की, 'बाबा आता खूप झालं. तुझी बंदुक मला दे.' दीपेंद्रनं अगदी जवळून त्यांच्यावर गोळी झाडली आणि ते उडून दूर जाऊन पडले. त्यानंतर दीपेंद्रनं स्वतःवरचं पूर्ण नियंत्रण गमावलं होतं, ते प्रत्येकावर गोळी झाडायला लागले. राजकुमार पारस ओरडून म्हणाले, सगळे सोफ्याच्या मागे लपा."

केतकी यांनाही गोळी लागली होती. दीपेंद्रला वाटलं की केतकीदेखील मेली आहे, कारण त्यांचं डोकं आणि केस रक्ताने माखलेले होते. एक गोळी महाराज ज्ञानेंद्र यांच्या पत्नी आणि पारस यांच्या आईला लागली आणि त्यांच्या फुफ्फुसांतून आरपार गेली. दीपेंद्र यांनी वडिलांवर पुन्हा गोळी झाडली. यावेळी गोळी महाराजांच्या डोक्यातून आरपार गेली. त्यांची रक्ताने माखलेली टोपी आणि चष्मा खाली पडला. ते पालथे खाली पडले आणि त्यांचे पाय बारच्या दिशेने होते.

महाराज बीरेंद्र यांचे धाकटे भाऊ धीरेंद्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

महाराज बीरेंद्र यांचे धाकटे भाऊ धीरेंद्र

दीपेंद्र यांनी त्यांच्या वडिलांना पायाने लाथाडलं होतं, ते दृश्य केतकी अजूनही विसरलेल्या नाहीत.

केतकी सांगतात की, "दीपेंद्रने जवळपास प्राण गेलेल्या वडिलांना तेव्हा लाथ मारली. ते मेले की जिवंत आहे हे दीपेंद्र पाहत होते. ते दृश्य कायमस्वरुपी माझ्या डोळ्यांमध्ये कैद झालं. प्रत्येक संस्कृतीमध्ये मृताचा सन्मान केला जातो. गोळी मारण्यापेक्षाही एका हिंदुने वडिलांना लाथाडल्याचं दृश्य माझ्यासाठी धक्कादायक होतं."

एडीसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं

नारायणहिती महलात त्रिभुवन भवनमध्ये नेपाळ नरेश आणि राजघराण्याती बारा लोक एकतर मारले गेले होते किंवा जखमी होते. तीन ते चार मिनिटांनी गोळीबार संपला.

नेपाळमधील या सर्वांत कठीण काळामध्ये गोळ्यांचा आवाज ऐकूणही क्रॅक कमांडो ट्रेनिंग घेतलेल्या एकाही एडीसीने धावत घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न केला नाही. ते त्यांच्या खोलीमध्येच बसून होते. त्यांच्या खोल्या बिलियर्ड्स रूमपासून केवळ 150 फुटांवर होत्य.

त्यांनी प्रयत्न केला असता तर ते बिलियर्ड्स रूममध्ये 10 सेकंदात पोहोचू शकले असते. नंतर तपास करणाऱ्या समितीच्या रिपोर्टच्या आधारे सर्व चारही एडीसीना नोकरीवरून बरखास्त केलं होतं.

महाराणी ऐश्वर्य यांच्यावर मागून झाडली गोळी

या दरम्यान दीपेंद्र पुन्हा बिलियर्ड्स रूममधून बाहेर गार्डनमध्ये गेले. महाराणी ऐश्वर्य त्यांच्या मागे पळाल्या. राजकुमार निराजनही त्यांच्या मागे गेले. थोड्या वेळानं दोन गोळ्यांचा आवाज आला.

नीलेश मिस्रा त्यांच्या 'एंड ऑफ द लाइन' मध्ये लिहितात की, "स्वयंपाक खोलीतून सांता कुमार खडका या नोकरानं महाराणी ऐश्वर्य यांच्या जीवनातले हे अंतिम क्षण पाहिले होते. राणीने पायऱ्यावर जात दीपेंद्र यांच्या बेडरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्या नेपाळी भाषेत जोर जोरात ओरडत होत्या. त्यांनी सात पायऱ्याच चढल्या असतील तेवढ्यात एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली. त्या संगमरवरी पाऱ्यांवर पडल्या. त्यांना मागून गोळी मारली होती आणि त्या दीपेंद्र यांची अखेरची शिकार ठरल्या."

पुस्तक

फोटो स्रोत, PENGUIN BOOKS

त्यांना कदाचित गैरसमज होता की, त्यांचा मुलगा त्यांच्यावर गोळी झाडणार नाही. पण त्यांचा अंदाज खरा ठरला नाही.

त्यानंतर दीपेंद्र गार्डनमध्ये एका छोट्या तलावावर तयार करण्यात आलेल्या पुलावर गेले. त्याठिकाणी ते वेड्यासारखे एक दोन वेळा जोरात ओरडले आणि त्यानंतर अखेरच्या गोळीचा आवाज आला. ते पाठीवर पडले होते.

एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार केली होती. डोक्यावर डाव्या बाजूला कानाच्या मागे गोळी शिरल्याची जवळपास एक सेंटिमीटरची खूण होती, तर उजव्या बाजूने कानाच्या वरून गोळी बाहेर निघाल्याची खूण होती. दोन्हीकडून रक्त वाहत होतं, पण दीपेंद्र तरीही जिवंत होते.

जग्वार कारमधून महाराजांना रुग्णालयात नेलं

महाराज वीरेंद्र देखील एवढ्या गोळ्या लागल्यानंतरही जिवंत होते. जेव्हा त्यांना त्यांच्या एडीसीने रुग्णालयात नेण्यासाठी जग्वार कारच्या मागच्या सीटवर झोपवलं त्यावेळी त्यांच्या दोन्ही कानांमधून रक्त वाहत होतं. त्यांचे संपूर्ण कपडे रक्ताने माखले होते. त्यांची नाडी जवळपास थांबली होती, पण हात थोडे थोडे हलत होते. त्यांना किमान आठ गोळ्या लागल्या होत्या.

नेपाळच्या राजांची अंत्ययात्रा

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या कारच्या मागे टोयोटामध्ये महाराणी ऐश्वर्य यांना नेलं जात होतं. दोन्ही कार रुग्णालयात पोहोचल्या त्यावेळी रात्रीचे सव्वानऊ वाजले होते. थोड्यावेळात नेपाळचे सर्वोत्तम न्युरोसर्जन, प्लास्टिक सर्जन आणि हृदयरोगतज्ज्ञ रुग्णालयात पोहोचले होते.

महाराणींना कारमधून बाहेर काढताच मृत घोषित करण्यात आलं. त्याचवेळी एक हिरव्या रंगाची टोयोटा लँडक्रूजरही रुग्णालयात आली. त्यात राजकुमार पारस पुढच्या सीटवर बसलेले होते. मागच्या सीटवर दीपेंद्रचे एडीसी गजेंद्र बोहरा आणि राजू कार्की हे युवराज दीपेंद्र आणि राजकुमार निराजन यांना घेऊन बसले होते. ही एक विचित्र स्थिती होती. एकाच कारमधून मारेकरी आणि त्याने ज्याला मारलं त्यांना रुग्णालयात आणलं होतं.

ट्रॉमा सेंटरमध्ये बेड कमी पडले

ते साडेनऊ वाजता रुग्णालयात पोहोचले. काही मिनिटांनी राजकुमार निराजनलाही मृत घोषित करण्यात आलं.

राजकुमार निराजन

फोटो स्रोत, PENGUIN BOOKS

फोटो कॅप्शन,

राजकुमार निराजन

जोनाथन ग्रेगसन लिहितात की, "यादरम्यान नेपाळचे प्रमुख न्यूरो सर्जन डॉक्टर उपेंद्र देवकोटा एका ट्रॉलीजवळ जाऊन थांबले तिथं एक लष्करी डॉक्टर रक्ताने माखलेल्या राष्ट्रीय गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीवर उपचाराचा प्रयत्न करत होता. त्यांच्या गळ्यात एक लॉकेट लटकत होतं, त्यावर साईबाबाचं चित्र होतं. डॉक्टर खरं तर आधी महाराज वीरेंद्र यांना भेटले होते पण जखमी अवस्थेत ते त्यांना ओळखू शकले नाहीत."

युवराज दीपेंद्र यांनी त्यादिवशी कुटुंबतील एवढ्या लोकांना मारलं होतं की रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमधले पलंग भरून गेले होते.

दीपेंद्र यांना जेव्हा स्ट्रेचरवर आत आणण्यात आलं तेव्हा त्यांच्यासाठी एकही बेड रिकामा शिल्लक नव्हता. त्यांना जमिनीवर अंथरलेल्या एका गादीवर झोपवण्यात आलं. त्यांच्या दोन्ही कानांच्या बाजूनं रक्त वाहत होतं. ते श्वास घेताना प्रचंड आवाज करत होते. पण त्यांचा रक्तदाब 100/ 60 होता जो फार चिंतेचं कारण नव्हता. त्यांच्या डोळयांवर प्रचंड उजेडानेही फरक पडत नव्हता. काही मिनिटांमध्ये दीपेंद्र यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं.

दीपेंद्र यांना राजा बनवण्यात आलं

दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये या घटनेचा उल्लेखही नव्हता. पण तरीही ही बातमी दाबून ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही.

ही घटना कव्हर करण्यासाठी मी 2 जून 2001 ला सकाळी 10 वाजता दिल्लीहून काठमांडूला पोहोचलो होतो. पण तोपर्यंत नेपाळच्या लोकांनाही याबाबत काही माहिती दिलेली नव्हती. पण नेपाळच्या रेडिओवर सकाळपासूनच दुःखद संगीत वाजत होतं.

अखेर हत्याकांडाच्या 14 तासांनंतर सकाळी 11 वाजता कार्यक्रम थांबवून घोषणा केली की, काल रात्री सव्वा नऊ वाजता महाराज वीरेंद्र वीर विक्रम शाह यांचं निधन झालं. त्यांच्या जागी त्यांचा मोठा मुलगा युवराज दीपेंद्रला पुढचा महाराजा घोषित केले जात आहे.

तेही सध्या राज्यकारभार सांभाळण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांच्या जागी राजकुमार ज्ञानेंद्र रीजेंट म्हणून काम करतील. पण महाराजांचा मृत्यू कसा झाला हे नेपाळवासीयांना सांगण्यात आलं नाही.

अंत्ययात्रेत लाखोंचा सहभाग

2 जून 2001 च्या दुपारी 4 वाजता शाही कुटुंबाची अंत्ययात्रा सुरू झाली तेव्हा संपूर्ण काठमांडू रस्त्यावर उतरलं होतं. देशातील हजारो नागरिकांनी महाराजांच्या सन्मानार्थ मुंडण केलं होतं.

न्हाव्यांनी या कामासाठी पैसेही आकारले नाहीत. सायंकाळी राजघराण्यातील सदस्य दीपक विक्रम यांनी आर्यघाटावर सर्व चितांना मुखाग्नी दिला.

युवराज ज्ञानेंद्र

फोटो स्रोत, Getty Images

युवराज दीपेंद्र हे परत कधीही शुद्धीवर आले नाही. 4 जून 2001 च्या पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी त्यांचाही मृत्यू झाला. जवळपास 54 तासांपर्यंत नेपाळवर अशा व्यक्तीचं राज्य होतं जो बेशुद्ध होता आणि ज्याच्यावर पित्याच्या हत्येचा आरोप होता.

त्यांच्या मृत्यूनंतर नेपाळ नरेश वीरेंद्र यांचे छोटे भाऊ ज्ञानेंद्र तीन दिवसांत नेपाळचे तिसरे राजा बनले. पण नेपाळची राजेशाही या धक्क्यातून सावरू शकली नाही, त्यांनी 2008 मध्ये राजेशाहीचा त्याग करत लोकशाहीचा मार्ग अवलंबला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)