टोकियो ऑलिम्पिक डायरी : सगळं जग एकत्र येतं, तेव्हा...

  • जान्हवी मुळे
  • बीबीसी प्रतिनिधी
पोर्तुगाल संघाची खेळाडू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक फोटो

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

रँकिंग

आज काही लिहावं की नाही? अशा विचारांत होते. मी इथे भारतापासून हजारो किलोमीटर दूर टोकियोमध्ये आहे. पण गेल्या दोन दिवसांत मन सारखं घराकडे धावत होतं.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर आला आहे, दरड कोसळल्याच्या, नुकसान झाल्याच्या बातम्या येतायत. आमचं सगळं लक्ष कामात असल्यानं यातल्या अनेक गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत थोडा वेळही लागला.

एकीकडे जगात एवढं सगळं होत असताना आपण इथे काय करतो आहोत? खेळाविषयी बोलण्याची ही वेळ आहे का? मुळात कोव्हिडची साथ असताना ऑलिम्पिकचं आयोजनच का करावं, असे प्रश्नही पडणं स्वाभाविक आहे.

पण आज उदघाटन सोहळा सुरू झाला, परेडदरम्यान खेळाडू आपापल्या देशांचे झेंडे घेऊन अवतरले आणि या प्रश्नांचं उत्तर मिळत गेलं.

मला उद्घाटन सोहळ्याचं तिकिट मिळू शकलं नाही. माझे काही सहकारी मात्र तिथे उपस्थित होते.

प्रेक्षकांची उणीव जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच स्टेडियमबाहेर काहींनी निदर्शनं केल्याचीही बातमी येत होती.

मी आणि सेलेस्टिननं मीडिया सेंटरमध्येच थांबून वेगवेगळ्या देशांतल्या पत्रकारांसोबत एकत्र हा सोहळा पाहायचं ठरवलं. रात्रीची वेळ असल्यानं एरवीपेक्षा इथे गर्दी कमी होती. बातम्या लिहिता लिहिता, दुसऱ्या दिवशीची तयारी करता करता आम्ही उद्घाटन सोहळा पाहात होतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा

नेहमी असे सोहळे म्हणजे मोठा जामानिमा आणि मिरवण्याची गोष्ट. पण हा सोहळा वेगळा ठरला. त्यात सुरुवातीलाच गेलं वर्षभर जगभरातील खेळाडूंनी जे भोगलं आहे, त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं.

ऑलिम्पिकच्या रिंग्ज एकत्र आल्या तेव्हा अख्खा हॉल संगीतानं भरून गेला. तो क्षण असा होता, की माझ्यासह आसपास बसलेल्या अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं. गेल्या वर्षी हा क्षण कधी येईल असं वाटलंही नव्हतं, असं एका व्हॉलेंटियरनं सांगितलं.

मग देशांच्या पथकांची परेड सुरू झाली, तेव्हा ऑलिम्पिक का महत्त्वाचं आहे, हे प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचे भावच सांगत होते.

आपापल्या देशाची टीम किंवा आवडते खेळाडू आले की लोक कधीकधी उठून चीअर करत होते. या हॉलमध्ये तेव्हा मी बहुदा एकटीच दक्षिण आशियाई असावे असं वाटल्यानं, भारताशिवाय पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या.

अर्थातच सर्वाधिक टाळ्या जपानसाठी वाजल्या. युनायटेड बाय इमोशन ही उदघाटन सोहळ्याची थीम इथे सार्थ ठरल्यासारखं वाटलं.

हो नाही, म्हणता म्हणता ऑलिम्पिक सुरू झालं. म्हणजे त्यावर विश्वास बसत नाही. आता या क्षणी नेमकं काय वाटतंय, हे सांगण्यासाठी शब्द पुरेसे ठरणार नाहीत. पुढे काय होणार आहे, माहिती नाही. जागतिक साथीदरम्यान जगभरातल्या लोकांना एकत्र आणणाऱ्या या आयोजनाचे नेमके परिणाम काय होणार आहेत, हेही सांगता येणार नाही.

मात्र कोव्हिडच्या काळात असं काही घडू शकलं आणि त्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सगळं जग एकवटलं, हे वास्तव आहे. एक सकारात्मक वास्तव, ज्याची कदाचित या क्षणी अनेकांना गरज आहे.

भारताच्या कोणत्या खेळाडूंच्या स्पर्धा कधी आहेत? पाहाण्यासाठी क्लिक करा..

Please wait...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)