कोरोना व्हायरस : चीनच्या वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार, 10 दिवसांत 300 पेक्षा जास्त रुग्ण

चीन कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

चीनच्या वुहान शहरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाच्या संक्रमणाची नवी प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळं सरकारनं शहरातील सर्व नागरिकांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. वुहानची लोकसंख्या जवळपास 1.1 कोटी आहे.

वुहानमध्ये जवळपास वर्षभरापेक्षा जास्त कालावधीनंतर स्थानिक पातळीवर कोरोनाचा फैलाव झाला आहे. जगभरातील कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण हा वुहान शहरात 2019 मध्ये आढळला होता.

चीनमध्ये अनेक महिन्यांनंतर पुन्हा एकदा कोरोना संसर्ग पसरत असल्याचं समोर आलं आहे. याठिकाणी 10 दिवसांत 300 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सध्या चीनमधील जवळपास 15 प्रांतांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव असल्याचं, सांगितलं जात आहे.

त्यामुळं सरकारनं लॉकडाऊन बरोबरच जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

'डेल्टा व्हेरिएंट जबाबदार'

यावेळी पसरत असलेल्या संसर्गासाठी वेगानं संसर्ग पसरणारा डेल्टा व्हेरिएंट आणि पर्यटनाचा हंगाम जबाबदार असल्याचं चीनच्या सरकारी संस्थांनी म्हटलं आहे.

चीनमध्ये मंगळवारीच कोरोना संक्रमणाची 90 नवी प्रकरणं समोर आली आहेत. त्याचवेळी वुहानमध्येही स्थानिक पातळीवर कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग पसरत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

यापैकी 61 जणांना स्थानिक पातळीवर कोरोनची लागण झाली असल्याची माहिती, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य मिशननं दिली आहे. तर त्याच्या एक दिवस आधी 55 जणांना स्थानिक पातळीवर कोरोनाची लागण झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images

देशामध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्याच अंशी यश आलं आहे.

मात्र मोठी वर्दळ असलेल्या नानजिंग एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्यानं प्रशासनासमोरील चिंता वाढल्या आहेत.

नान्जिंगमध्ये पुन्हा लॉकडाऊन

सरकारी संस्थांनी नानजिंगमध्ये राहणाऱ्या 92 लाख नागरिकांच्या तीन वेळा टेस्टिंग केल्यानंतर लॉकडाऊन जाहीर केलं आहे.

दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांत हुनान प्रांतातील चांगजियाजी या लोकप्रिय पर्यटन स्थळाच्या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाची नवी प्रकरणं समोर आली. त्यानंतर हा भाग चर्चेत आला होता.

नानजिंगमधील काही प्रवाशांनी नुकतीच याठिकाणी भेट दिली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

कोरोना रुग्णांची ट्रेसिंग करताना आरोग्य कर्मचारी चांगजियाजीमधील एका थिएटरपर्यंत पोहोचले आहेत. त्याठिकाणी आलेल्या जवळपास 5000 जणांना ट्रॅक केलं जात आहे. या सर्वांनी थिएटरमध्ये एक कार्यक्रम पाहिला. त्यानंतर पुन्हा ते त्यांच्या शहरांमध्ये परतले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

शी जिनपिंक यांचं तापमान पाहताना वैद्यकीय कर्मचारी

चीनमधीले आता चांगजियाजी हे कोरोना संसर्गाचं नवं केंद्र बनलं असल्याचं, चीनच्या श्वसनरोग तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर कोरोना विषाणू चीनची राजधानी बीजिंगपर्यंतही पोहोचला आहे. याठिकाणीही स्थानिक पातळीवर कोरोना संसर्गाची अनेक प्रकरणं समोर येत आहेत.

नान्जिंग प्रांतातला संसर्ग वुहानपेक्षाही भयंकर, चीनच्या सरकारी माध्यमांचा दावा

चीनच्या नान्जिंग शहरामधून सुरू झालेल्या कोव्हिड-19ची साथ 5 प्रांतांमध्ये आणि बीजिंगमध्ये पसरली असून वुहाननंतरचं हे सर्वांत मोठं संक्रमण असल्याचं चीनच्या सरकारी माध्यमांनी म्हटलंय.

20 जुलैला नान्जिंग शहरातल्या विमानतळावर पहिल्यांदा हा व्हायरस आढळला आणि त्यानंतर आतापर्यंत जवळपास 200 जणांना याची लागण झालेली आहे.

आता नान्जिंग विमानतळावरची सगळी उड्डाणं 11 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

असा संसर्ग पसरणं हे यंत्रणेचं अपयश असल्याची टीका होत असतानाच आता संपूर्ण शहरात टेस्टिंग करण्यात येतंय.

या शहरामध्ये राहणाऱ्या 93 लाख लोकांच्या चाचण्या करून घेण्यात येणार आहेत. यामध्ये काही दिवसांसाठी या शहरात आलेल्यांचाही समावेश असेल, असं सरकारी मालकीच्या शिनहुआ न्यूजने म्हटलंय.

लांबच लांब रांगांमध्ये उभे लोक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या मेसेजेसमध्ये पाहायला मिळतात. अधिकाऱ्यांनी या लोकांना मास्क घालण्याची, 1 मीटर अंतर ठेवून उभं राहण्याची आणि रांगेत उभं असताना एकमेकांशी बोलणं टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या संसर्गासाठी डेल्टा व्हेरियंट कारणीभूत असून विमानतळ जास्त गजबजलेला असल्याने रुग्णसंख्या वाढली असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

10 जुलैला रशियाहून शहरात आलेल्या विमानातील सफाई कर्मचाऱ्याशी या रुग्णांचा संबंध असल्याचं नान्जिंगचे आरोग्य अधिकारी डिंग जी यांनी सांगितलं.

या सफाई कर्मचाऱ्यांनी सफाईसाठीचे कठोर नियम पाळले नसल्याचं शिनहुआ न्यूजने म्हटलंय.

याबद्दल विमानतळाच्या मॅनेजमेंटला कानपिचक्या देण्यात आल्या असून या प्रकरणी योग्य देखरख ठेवण्यात आली नसून मॅनेजमेंट 'अनप्रोफेशनल' वागल्याचं कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नियामकांनी म्हटलंय.

हा व्हायरस चेंगडू आणि राजधानी बीजिंगसह किमान 13 शहरांमध्ये पसरल्याचं चाचण्यांमधून आढळलंय.

पण असं असलं तरी हा संसर्ग अजूनही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असून नियंत्रणात आणला जाऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत असल्याचं ग्लोबल टाईम्सने म्हटलंय.

नान्जिंगमध्ये संसर्ग झालेल्यांपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या लशी डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी आहेत का, याविषयीची चर्चा या संसर्गामुळे चीनमधल्या सोशल मीडियावर सुरू झालेली आहे.

पण ज्यांना हा संसर्ग झालाय, त्यांनी लस घेतली होती का हे अजून स्पष्ट नाही.

चीनच्या लशी वापरणाऱ्या काही दक्षिण आशियाई देशांनी आपण इतर लशी वापरणार असल्याचं नुकतंच जाहीर केलं होतं.

आतापर्यंत चीनने आपल्या सीमा बाहेरच्या प्रवाशांसाठी बंद ठेवत आणि स्थानिक संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने पावलं उचलत एकूणच साथ आटोक्यात ठेवलेली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)