अफगाणिस्तानात काबुलमध्ये राष्ट्रपती भवनाजवळ मोठा स्फोट

अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहराच्या मध्यवर्ती भागात एक मोठा स्फोट झाल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

शहराच्या अत्यंत वर्दळीच्या भागामध्ये हा स्फोट झाला आहे. स्फोट झाला त्याच्या आसपास अनेक शासकीय इमारती आणि विदेशी राजदुतांच्या रहिवासी वस्ती आहेत.

राष्ट्रपती भवनासह या परिसरात अनेक देशांचे दुतावास आणि आंतरराष्ट्रीय माध्यम संस्था आणि सहकारी संस्थांची कार्यलयंही आहेत.

अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही. मात्र, अफगाणिस्तानच्या विविध भागांमध्ये तालिबान आणि सरकारी लष्कर यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचं वृत्तही समोर येत आहे.

फोटो स्रोत, Social Media

अद्याप घटनेबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

काबूलचया शिरपूरमध्ये अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या घराजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील टोलो न्यूजनं दिलं आहे.

बीबीसीच्या पर्शियन सर्व्हिसनं दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळाजवळ गोळीबार आणि अॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज ऐकायला मिळत असून आकाशात धुराचे लोटही दिसत आहेत.

कंदाहार विमानतळावर रॉकेट हल्ले

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार विमानतळावर किमान तीन रॉकेट हल्ले झाले होते. एएफपी या वृत्तसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात तालिबानने हल्ले तीव्र केले होते.

कंदाहार एअरपोर्टचे प्रमुख मसूद पश्तून यांनी एएफपीशी बोलताना म्हटलं की, गेल्या रात्री एअरपोर्टवर रॉकटने हल्ले करण्यात आले. दोन रॉकेट रनवेवर कोसळले असल्यामुळे कंदाहार विमानतळावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.

अफगाणिस्तानातील दक्षिण आणि पश्चिम भागातील तीन मोठ्या शहरांमध्ये तालिबान विरुद्ध अफगाणिस्तान संघर्ष चांगलाच पेटला आहे. अफगाण सैन्याच्या ताब्यातून ही शहरं मिळवण्याच्या प्रयत्नांत तालिबान आहे.

तालिबानचे सैनिक हेरात, लश्कर गाह आणि कंदाहार शहरांमध्ये घुसले आहेत.

सप्टेंबर महिन्यापर्यंत जवळपास सर्व विदेशी सैनिक अफगाणिस्तानातून माघार घेणार अशी घोषणा झाल्यानंतर, त्यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आघाडी मिळवली आहे.

अफगाणिस्तानचं लष्कर किती काळ तग धरू शकतं, यावर या प्रमुख शहरांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तसंच मानवाधिकारांचं संकट निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

कंदाहारमध्ये तालिबान आणि अफगाण सैन्यात सुरू असणाऱ्या धुमश्चक्रीमुळे हजारो नागरिकांना स्थलांतर करावं लागलंय.

कट्टरतावादी इस्लामिक गटानं अफगाणिस्तानचा जवळपास अर्धा भाग आधीच काबीज केल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये इराण आणि पाकिस्तानबरोबरच्या सीमा असलेल्या महत्त्वाच्या भागाचा समावेशही आहे.

कंदाहार शहर तालिबानींच्या ताब्यात जाण्याचा गंभीर धोका असल्याचं एका खासदारांनी बीबीसी बरोबर बोलताना म्हटलं. येथील हजारो लोक आधीच बेघर झाले असून आता इथं मानवाधिकारांचं संकट निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

प्रत्येक तासाला परिस्थिती अधिक वाईट होत चालली आहे, शहरात गेल्या 20 वर्षात झालेलं हे सर्वात गंभीर युद्ध असल्याचं गुल अहमद कमिन म्हणाले.

तालिबानचं लक्ष्य हे आता प्रामुख्यानं कंदहारवर असणार आहे, त्यांना या शहराला तात्पुरती राजधानी बनवायचं आहे, असंही ते म्हणाले. जर हे शहर त्यांच्या हाती गेलं तर, या भागात असलेले आणखी पाच ते सहा प्रांत हातून जाण्याची शक्यता असल्याचंही कमिन म्हणाले.

तालिबानचे सैनिक शहराच्या काही बाजूंनी उपस्थित आहेत. तसंच शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित आहेत. त्यामुळं जर तालिबानच्या जवानांनी शहरात प्रवेश केला, तर अफगाणिस्तानच्या लष्कराला मोठ्या शस्त्रांचा वापर करणंही शक्य होणार नाही, असंही ते म्हणाले.

हेरात हे आर्थिकदृष्ट्या अफगाणिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. या शहराच्या दक्षिण भागात तालिबानचे योद्धे घुसले असल्यानं येथील संघर्ष तीव्र बनला आहे, असं टोलो न्यूजच्या पत्रकारांनी म्हटलं आहे.

जवळपास पाच वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही बाजूंच्या सैन्यात संघर्ष सुरू असल्याचं वृत्त आहे.

अफगाणिस्ताननं विमानतळच्या जवळ असलेल्या जिल्ह्यावर पुन्हा ताबा मिळवला आहे. अमेरिका अजूनही त्यांच्या (अफगाणिस्तान) समर्थनार्थ हवाई हल्ले करत आहे.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

हेरात शहरात अनेक ठिकाणी युद्ध सुरू असल्याचं वृत्त आहे.

विमानतळाजवळ असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या कंपाऊंडबाहेरच्या सुरक्षारक्षकाचा शुक्रवारी मृत्यू झाला. तालिबाननं हा हल्ला जाणीवपूर्वक केल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

शहरातील काही ठिकाणं ही सुरक्षित आहेत, तर काही लोकांनी स्वतःचं स्वतःचं रक्षण करण्यासाठी शस्त्र हाती घेतली असल्याचं, रहिवाशांनी सांगितलं.

सोव्हिएत संघाच्या लष्कराविरोधात 1980 मध्ये लढलेले माजी कमांडर इस्माईल खान यांनी शहराचं रक्षण करण्यासाठी सशस्त्र मोहीम हाती घेतली आहे.

दक्षिण हेलमंद प्रांताची राजधानी असलेल्या लश्कर गाहमध्ये घुसखोर शनिवारी राज्यपालांच्या कार्यालयापासून अगदी थोड्या अंतरावर (हजार मीटरपेक्षा कमी) होते, असं स्थानिक सूत्रांनी सांगितलं.

'इस्लामिक अमिरात'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

आंतरराष्ट्रीय सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडू लागल्यानंतर देशातलं युद्ध गेल्या काही महिन्यांत वाढलं.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

हे युद्ध आगामी काळामध्ये आणखी भडकणार असल्याचं मत, युरोपियन युनियनचे अफगाणिस्तानातील विशेष दूत टॉमस निकलसन यांनी म्हटलं.

तालिबानच्या विचार करण्याच्या पद्धतीची भीती वाटत असल्याचं निकलसन यांनी बीबीसीचे मुख्य आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लाइस डॉसेट यांच्याशी बोलताना सांगितलं. पूर्वी त्यांच्याकडं होतं ते परत मिळवण्यासारखा म्हणजे 'इस्लामिक अमिराती' सारखं काहीतरी ते विचार करत असतील, असंही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सैन्यांनी माघार घेतल्यामुळं अफगाणिस्ताच्या लष्कराचं मनोबल खचून तालिबानचं वर्चस्व वाढू शकतं असा इशारा, ब्रिटनचे माजी लष्कर प्रमुख जेन डेवीड रिचर्ड्स यांनी दिला. तसंच यातून नव्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

तालिबानचं आक्रमण सुरुच राहणार असल्यानं आगामी काळात अन्न, पाणी आणि इतर गोष्टींचा तुटवडा आणि सोबतच निर्वासितांच्या छावणीत गर्दी होऊ शकते. त्यामुळं आगामी महिन्यांमध्ये मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल असा इशारा मानवाधिकार संघटनांनी दिला आहे.

अमेरिकेचं लष्कर आणि त्यांच्या नाटो तसंच इतर सहकारी सैन्यांनी नोव्हेंबर 2001 मध्ये तालिबानला सत्तेपासून दूर केलं होतं.

तालिबानचा हा गट 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेत झालेल्या हल्ल्याशी संबंधित ओसामा बिन लादेन आणि इतरांना आश्रय देत होता.

मात्र सातत्यानं आंतरराष्ट्रीय सैन्यांची उपस्थिती, अब्जावधी डॉलरचं सहकार्य आणि अफगाणिस्तानच्या लष्कराला प्रशिक्षण देऊनही, अफगाणिस्तानात तालिबानचे कट्टरतावादी पुन्हा एकवटले आणि त्यांनी पुन्हा शक्ती प्राप्त केली.

फेब्रुवारी 2020 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर सहकाऱ्यांनी तालिबानबरोबर एक करार केला. त्यात अफगाणिस्तानातून आंतरराष्ट्रीय सैन्य मागं घेण्यावर सहमती झाली होती.

यावर्षी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सप्टेंबरपर्यंत सैन्य पूर्णपणे परत येईल, असं जाहीर केलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)