जग्गा गुर्जर : ज्याच्या नावानंच लाहोरचे लोक थरथरायचे आणि 'जग्गा टॅक्स' द्यायचे...

  • अकील अब्बास जाफरी
  • संशोधक आणि इतिहासकार, कराची
जग्गा गुर्जर

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

फोटो कॅप्शन,

जग्गा गुर्जर

ही 1968 सालची घटना आहे. पोलीस चकमकीत जग्गा गुर्जरचा मृत्यू झाला आणि पाकिस्तानातील सर्व वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर बातमी छापली.

हे तेच जग्गा गुर्जर होते, ज्यांच्या नावानं 'जग्गा टॅक्स' प्रसिद्ध होता. शिवाय, त्यांच्यावर पंजाबीमध्ये अनेक सिनेमे बनवले गेले.

त्यावेळचे वृत्तपत्र आणि त्यानंतर लिहिलेल्या पुस्तकांनुसार, जग्गा गुर्जरचं खरं नाव मोहम्मद शरीफ होतं. तो लाहोरच्या इस्लामिया पार्क परिसरात राहत असे.

तिथं एक जत्रा भरत असे. या जत्रेत जग्गा गुर्जरचा भाऊ माखन गुर्जरचा लाहोरमधील कुख्यात गुंड अच्छा शोकरवालाशी वाद झाला. या वादानंतर 1954 साली माखनची हत्या झाली.

जग्गा गुर्जर भावाच्या हत्येवेळी अवघ्या 14 वर्षांचा होता. भावाच्या हत्येनंतर आठच दिवसात जग्गानं बदला घेतला. माखन गुर्जरला मारणाऱ्यांची जग्गानं हत्या केली. या हत्येनंतर जग्गाला तुरुंगात जावं लागलं.

तुरुंगात गेल्यावर जग्गाला कळलं की, भावाचा खरा मारेकरी अच्छा शोकरवाला आहे. शोकरवालानंच मारेकरऱ्यांना माखन गुर्जरच्या हत्येसाठी तयार केलं होतं.

त्यामुळे जग्गानं तुरुंगात असतानाच अच्छा शोकरवालाच्या हत्येची योजना आखली आणि त्यानुसार शोकरवालावर हल्लाही केला. या हल्ल्यात शोकरवालाचे दोन साथीदार मारले गेले आणि शोकरवाला जखमी झाला.

फोटो स्रोत, JANG NEWSPAPER

फोटो कॅप्शन,

जंग वृत्तपत्रातील जग्गा गुर्जरबाबतचं वृत्त

जग्गा जेव्हा तुरुंगातून बाहेर आला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. या काळात अच्छा शोकरवालाला पश्चिम पाकिस्तानाचे गव्हर्नर 'नवाब ऑफ काला बाग' मलिक अमीर मोहम्मद खान यांचं कथितरित्या संरक्षण मिळत होतं.

सरकारविरोधी एखादी घटना असो किंवा अशांततेची एखादी घटना, 'नवाब ऑफ काला बाग'च्या आदेशानं अच्छा शोकरवाला अशा घटनांना नियंत्रणात आणायचा.

पश्चिम पाकिस्तानचा 'छोटा गव्हर्नर'

लेखक अहमद अकील रुबी यांनी 'खरे खोटे' या पुस्तकात अच्छा शोकरवालाबद्दल लिहिलंय, "जोपर्यंत मलिक अमीर मोहम्मद खान (नवाब ऑफ काला बाग) पश्चिम पाकिस्तानचे गव्हर्नर होते, तोपर्यंत लोक अच्छा शोकरवालाला 'छोटा गव्हर्नर' म्हणत असत."

गव्हर्नर हाऊसमध्ये शोकरवालाचं स्वत:चंच घर असल्यासारखं येणं-जाणं होतं. अमीर मोहम्मद खान यांच्या काळात पाकिस्तान सरकारकडून शोकरवालाला 'मेडल ऑफ ऑनर'ही मिळालं होतं.

अहमद अकील रुबी पुढे लिहितात, "अमीर मोहम्मद खान यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शोकरवालाला 'गुंडा टॅक्स' वसुलीप्रकरणी अटक करण्यात आली. त्यावेळी शोकरवालानं हसत हसत पोलीस स्टेशन प्रमुखाला म्हटलं, 'इक ते तुहाड्डे क़ानून दा पता नई लग दा, कदी मेनू शराफत दा तमगा देंदे ओ, कदी गुंडा कह के गिरफ़्तार कर लेंदे ओ' (एक तर मला तुमच्या कायद्याचं नेमकं काय कळत नाही, कधी मला पदक देता, तर कधी गुंड म्हणून अटक करता.)"

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

फोटो कॅप्शन,

जग्गा गुर्जर

गव्हर्नर मुसा खान हे सत्तेत असताना जग्गा गुर्जरला तुरुंगातून सोडण्यात आलं होतं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यानं आपली टोळी तयार केली आणि लाहोरमधील खाटिक समाजाकडून जबरदस्तीनं टॅक्स वसुली सुरू केली. जग्गाच्या या गुंडगिरीचं केंद्र बकर बाजाराचा परिसर होता. प्रत्येक बकऱ्यामागे एक रुपया जग्गा वसूल करत असे.

'जग्गा टॅक्स'ची सुरुवात

जग्गाला टॅक्स देण्यास नकार देण्याची कुणाची हिंमत नव्हती. त्यामुळे काही दिवसातच जग्गाच्या या वसुलीला 'जग्गा टॅक्स' असं नाव पडलं. आजही पाकिस्तानात अशाप्रकारे जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या वसुलीला 'जग्गा टॅक्स' म्हटलं जातं.

हसन निसार आपल्या एका लेखात लिहिलंय की, "जग्गा गुंड होताच, मात्र इतर गुंडांपासून त्याला वेगळं दर्शवणारी त्याची एक खासियत होती. ती खासियत म्हणजे, वसूल केलेला जो टॅक्स त्याच्या घरी जात असे, त्यात गरीब आणि विधवा महिलांसाठी सुद्धा वाटा असे."

लाहोरच्या तत्कालीन एसएसपी हाजी हबीब-उर-रहमान यांनी मुनीर अहमद मुनीर यांना एक सविस्तर मुलाखत दिली होती. ही मुलाखत 'क्या क्या न देखा' नावानं प्रसिद्ध झाली होती.

हाजी हबीब-उर-रहमान यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, "लाहोरचे उपायुक्त फतेह मोहम्मद खान बांदियाल यांच्याशी जग्गाला मोजांगमध्ये फळांच्या दुकानावर तोंड द्यावं लागलं आणि तेव्हापासून जग्गाचे वाईट दिवस सुरू झाले.

फतेह मोहम्मद खान बंदियाल यांनी पाहिलं की फळांच्या दुकानाजवळ एक कार येऊन थांबली आणि त्या कारमधून एक व्यक्ती उतरली, सोबत सहा-सात सशस्त्र लोक होते. ती व्यक्ती फळांच्या दुकानाकडे जात होती."

"दुकानदाराने फतेह मोहम्मद खान बंदियाल यांच्याकडे दुर्लक्ष करत कारमधून उतरलेल्या व्यक्तीला सलाम केला. जग्गाने आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. आपल्या कारमध्ये फळांच्या काही टोपल्या आणि सरबताच्या तीन-चार बाटल्या ठेवल्या. त्यानंतर पैसे न देताच निघून गेला. फतेह मोहम्मद खान यांच्यासाठी हे दृश्य अविश्वसनीय होतं."

"त्यांनी दुकानदाराला विचारलं की, ती व्यक्ती कोण होती? दुकानदारानं म्हटलं की, तुम्ही लाहोरचे दिसत नाहीत. तो जग्गा बादशाह होता, लाहोरचा खरा बादशाह. संपूर्ण लाहोरमध्ये त्याचंच चालतं."

लाहोरचे उपायुक्त हैराण

फतेह मोहम्मद खान हैराण झाले. स्वत:शीच म्हणाले, लाहोरचा उपायुक्त तर मी आहे, हा बादशाह कुठून आला?

ते घरी जाण्याऐवजी थेट मोजांग पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिसांना आपला परिचय दिला आणि पाहिलेला सर्व घटनाक्रम सांगितला. पोलीसही गप्प राहिले. काही वेळानंतर एसएचओने म्हटलं की, "मला वाटतंय, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय."

फतेह मोहम्मद खान यांनी म्हटलं, "गैरसमज होण्याचा काय प्रश्न येतो? मी सर्वकाही माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. खरे एसएचओ तुम्ही आहात. खरा अधिकारी एसएसपी किंवा डीसी असतो. इथं तर गुंडांची सत्ता आहे. मी आतापर्यंत हे ऐकत आलो होतो. आज डोळ्यांनी पाहिलं की, इथं खरा सत्ताधारी कुणी वेगळाच आहे."

फोटो स्रोत, AATISH FISHAN PUBLISHERS

फोटो कॅप्शन,

लाहोरचे तत्कालीन उपायुक्त फतेह मोहम्मद खान बंदियाल

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

त्याचवेळी एसएचओ फतेह मोहम्मद खान यांना फळांच्या दुकानात घेऊन गेले. एसएचओ आल्याचं पाहून दुकानदार उठून उभा राहिला. एसएचओने दुकानादाराल फतेह मोहम्मद खान यांचा परिचय करून दिला आणि विचारलं की, इथून कुणी जग्गा नावाची व्यक्ती मोफत फळं घेऊन गेला का?

दुकानदारानं म्हटलं की, "अशा नावाची कुणीच व्यक्ती इथं आली नाही आणि आम्ही कुणाला मोफत फळं का देऊ?"

दुकानदाराचं बोलणं ऐकून फतेह मोहम्मद खान हैराण झाले. त्यांना लक्षात आलं की, एसएचओसमोर दुकानदार खरं सांगणार नाही.

हाजी हबीब-उर-रहमान सांगतात, "फतेह मोहम्मद खान यांनी मला बोलावलं आणि संपूर्ण घटना सांगितली. मी म्हटलं, बरं झालं हे दृश्य तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंत. एसएचओ म्हणतायेत की, तुमचा गैरसमज झालाय आणि दुकानदार जग्गा नावाची व्यक्ती दुकानात आल्याचं नाकारतोय, हीच तर त्या गुंडांची दहशत आहे. फतेह मोहम्मद खान यांनी म्हटलं की, असं चालणार नाही, या गुडांशी आपल्याला लढावंच लागेल."

आपल्या खबऱ्यांच्या मार्फत जग्गा गुर्जरपर्यंत बातमी पोहोचली की, लाहोर प्रशासन त्याच्याविरोधात कारवाई करणार आहे. एक दिवस जग्गा गुर्जर हाजी हबीब-उर-रहमान यांच्या कार्यालयात पोहोचला, मोहम्मद शरीफ उर्फ जग्गाच्या नावानं एक चिठ्ठी आत पाठवली. त्याच्यासोबत त्याचा 'राईट हँड' रियाज उर्फ राजू गुर्जरही होता.

जग्गाने म्हटलं की, आपण पोलिसांसाठी काम करण्यास तयार आहोत, फक्त माझ्या जीवाला काही धोका पोहोचायला नको.

यावेळी जग्गानं लाच आणि इतर आमिषंही दाखवली. मात्र, हाजी हबीब-उर-रहमान यांनी त्याची मदत करण्यास नकार दिला. त्यावेळी जामिनावर तो बाहेर असल्यानं त्याला अटकही केली जाऊ शकत नव्हती.

हबीब-उर-रहमान यांच्या माहितीनुसार, परिस्थिती लक्षात घेऊन जग्गा गुर्जर पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये पळून गेला. त्यानंतर एकेदिवशी पोलिसांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, आईला भेटण्यासाठी जग्गा आतुर झालाय आणि लाहोरमध्ये येण्यासाठी निमित्त शोधतोय. हाजी हबीब-उर-रहमान यांनी जग्गाला लाहोरमध्ये बोलावण्याची एक योजना बनवली.

फोटो स्रोत, AATISH FISHAN PUBLISHERS

फोटो कॅप्शन,

लाहोरचे तत्कालीन एसएसपी हबीब-उर-रहमान

त्यांनी फतेह मोहम्मद खान आणि सिव्हिल डिफेन्सच्या अध्यक्षाशी चर्चा केली. लाहोरमध्ये मोठ्या कालावधीपासून सिव्हिल डिफेन्सच्या ब्लॅकआऊटचा सराव झाला नव्हता. सिव्हिल डिफेन्सच्या अध्यक्षांनी दोन दिवसांपर्यंत हा सराव करण्याची घोषणा केली.

त्यावेळी ही सर्वसाधारण गोष्ट होती. वर्तमान पत्रांमध्येही सरावाची माहिती प्रकाशित झाली. सरावाचा पहिला दिवस संपला होता. पोलिसांना कळलं की, जग्गा गुर्जर त्यांच्या जाळ्यात अडकलाय आणि सरावाचा फायदा घेत आईला भेटण्यासाठी जग्गा लाहोरमध्ये येत आहे.

जुलै 1998 ची गोष्ट आहे. जग्गाचं घर नवांकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत बकर बाजार परिसरात होतं. ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले. जग्गा जेव्हा घराजवळ पोहोचला, तेव्हा पोलिसांनी इशारा दिला आणि विचारलं कोण आहे. राजू गुर्जरही त्यावेळी जग्गासोबत होता.

जग्गा पोलिसांना काही उत्तर देण्याच्या आधीच राजू गुर्जरनं पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी पुन्हा एकदा जग्गाला आवाहन केलं की, शस्त्र बाजूला टाकून दे, तरच जीव वाचेल. मात्र, जेव्हा पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला नाही आणि राजू गुर्जरने पुन्हा पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यावेळी मग पोलिसांनी केलेल्या गोळीबारात राजू गुर्जर आणि जग्गा गुर्जर दोघेही मारले गेले.

जग्गाचा मृतदेह पाहण्यासाठी उसळली प्रचंड गर्दी

पोलिसांच्या पथकात डीआयजी साहबजादा रऊफ अली यांच्यासह उपनिरीक्षक मियाँ सुल्तान अन्वर आणि राजा मोहम्मद इकबाल हेही सहभागी होते.

विचारवंत आणि लेखक बाकिर अली शाह यांनी एका चर्चेत म्हटलं की, "जग्गा आणि रियाज गुर्जर डीआयजी चौधरी मोहम्मद अल्ताफ यांच्या गोळीबारात मारले गेले होते. स्वत: डीआयजीही या मोहिमेदरम्यान जखमी झाले होते. या डीआयजींनाच नंतर लोक अल्ताफ जग्गा म्हणू लागले होते.

चौधरी मोहम्मद अल्ताफ यांनी मियाँ नवाज शरीफ यांच्या सत्ताकाळात अहमद मोहम्मद मुख्तार आणि बेनझीर भुट्टो यांच्या सत्ताकाळात मियाँ मोहम्मदलाही अटक केली होती. त्यामुळे ते दोन्ही सरकारांच्या नाराजीचे कारण बनले होते. चौधरी मोहम्मद अल्ताफ सध्या लाहोरमध्ये राहतात."

फोटो स्रोत, JAGGA GUJJAR FILM POSTER

फोटो कॅप्शन,

जग्गा गुर्जरवरील एका सिनेमाचं पोस्टर

जग्गाच्या चकमकीच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानातील सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर जग्गाच्या मृत्यूची बातमी छापून आली होती. हाजी हबीब-उर-रहमान सांगतात की, लोकांना विश्वास होत नव्हता की, जग्गा मारला गेलाय. जग्गाचा मृतदेह पाहण्यासाठी बकर बाजारापासून लाहोर शहरापर्यंत लोकांची गर्दी जमली होती.

जग्गाला मारणाऱ्या पोलिसांच्या पथकाला सरकारनं रोख रकमेचा पुरस्कार दिला आणि त्यांना पदकही दिलं. मात्र, लाहोरवासियांच्या मनातून जग्गा गुर्जर आणि तो वसूल करत असलेला 'जग्गा टॅक्स' कुणीही मिटवू शकला नाही.

1980 आणि 1990 च्या दशकात लाहोरच्या सिनेजगतानं जग्गा गुर्जरवर अनेक सिनेमे बनवले. यातील बहुतांश सिनेमात जग्गाची व्यक्तिरेखा सुल्तान राही यांनीच साकारली. जग्गा, वहशी गुर्जर, जग्गा गुर्जर, पुत्तर जग्गे दा आणि जग्गा टॅक्स असे अनेक सिनेमे जग्गा गुर्जरवर बनवण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)