टोकियो ऑलिम्पिक: पी. व्ही. सिंधूला कांस्यपदक, सलग दोन पदके पटकवणारी पहिली भारतीय महिला

पी. व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

पी. व्ही. सिंधूने कांस्य पदक मिळवले आहे. दोन ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आणि दुसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे. याआधी सुशिल कुमारने कुस्तीमध्ये दोन पदकं मिळवली होती.

सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकं पटकावणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.

याआधी 1900 मध्ये नॉर्मन प्रिचर्ड यांनी 200 मीटर आणि 200 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती. पिचर्ड हे ब्रिटिश वंशाचे होते पण त्यांनी भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. कुस्तीपटू सुशील कुमारने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तसंच 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकावर नाव कोरलं होतं. सिंधूने रिओ आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावत या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.कांस्यपदकासाठीच्या लढतीत सिंधूने 52 मिनिटाच चीनच्या हे बिंग जिआओवर 21-13, 21-15 असा विजय मिळवला.

पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली होती. शनिवारी उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत झाल्याने सिंधूला कांस्यपदकाच्या लढतीत खेळावं लागलं.

खणखणीत स्मॅशचे फटके हे सिंधूच्या खेळाचं वैशिष्ट्य होतं. डावखुऱ्या जिआओविरुद्ध खेळताना अचूक डावपेचांसह खेळताना सिंधूने तिला सतत निरुत्तर केलं.

फोटो स्रोत, Getty Images

पहिल्या गेममध्ये सिंधूने 4-0 अशी आघाडी घेतली. मात्र यानंतर बिंगने चांगलं प्रत्युत्तर देत 5-5 अशी बरोबरी केली. सिंधूने तडाखेबंद स्मॅशेसच्या बळावर 11-8 अशी आघाडी घेतली. चांगला खेळ कायम करत सिंधूने 15-9 अशी आघाडी वाढवली.

उत्तम बचावाचं प्रदर्शन करत सिंधूने 18-11 अशी बढत घेतली. नेटजवळून शिताफीने फटके लगावत, ड्रॉप शॉटचा हुशारीने उपयोग करत सिंधूने पहिला गेम 21-13 असा जिंकला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पी.व्ही.सिंधू

दुसऱ्या गेममध्येही सिंधूने 4-1 अशी खणखणीत आघाडी घेतली. क्रॉसकोर्ट स्मॅशच्या बळावर सिंधूने 11-8 अशी आघाडी वाढवली. बिंगने सिंधूवर जोरदार आक्रमण करत स्मॅशेसचा मारा केला. बिंगने ड्रॉप शॉट आणि नेटजवळून चांगला खेळ करत 11-11 अशी बरोबरी केली.

सिंधूने रॅलीचा वेग नियंत्रित करत बिंग आगेकूच करणार नाही याची काळजी घेतली. दुसरा गेम गमावल्यास सामना गमावण्याची भीती लक्षात घेऊन बिंगने पल्लेदार रॅली खेळण्यास सुरुवात केली.

मात्र सिंधूने फटक्यातली अचूकता वाढवत बिंगला निष्प्रभ करत बाजी मारली.

'लोकांच्या अपेक्षांचं ओझं असं पेललं'

"रिओ ऑलिम्पिकला मी रवाना झाले तेव्हा सिंधू ऑलिम्पिकला गेली आहे एवढंच लोकांना ठाऊक होतं. मात्र यावेळी माझ्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत कारण रिओत मी रौप्यपदकावर नाव कोरलं होतं. मला माझ्या खेळावर लक्ष एकाग्र करायचं आहे. मला पदकासाठी सर्वंकष प्रयत्न करायचे आहेत," असं सिंधूने ऑलिम्पिकला रवाना होण्यापूर्वी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.

रिओ ऑलिम्पिक पदकावेळी सिंधूचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद उपस्थित होते. रिओ ते टोकियो या पाच वर्षांच्या संक्रमणात सिंधूचे मार्गदर्शक बदलले आहेत.

दक्षिण कोरियाचे पार्क तेई-सांग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना सिंधूने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची कमाई केली.

'आठव्या वर्षीच हाती आले रॅकेट'

26 वर्षीय सिंधूची कहाणी युवा बॅडमिंटनपटूंसाठीच नव्हे तर देशातल्या कोणताही खेळ खेळणाऱ्या क्रीडापटूंसाठी प्रेरणादायी अशीच आहे.

ऑलिम्पिकची दोन पदकं आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पाच पदकं नावावर असणाऱ्या सिंधूने सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या बळावर हे यश कमावलं आहे. सहा फूटांपेक्षा जास्त उंचीचं वरदान लाभलेल्या सिंधूच्या भात्यात सर्वप्रकारचे फटके आहेत.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत, उपांत्य फेरीच्या सामन्याचा अपवाद वगळता सिंधूने प्रत्येक सामन्यात स्मॅशच्या फटक्याचा आत्मविश्वासाने उपयोग करत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं.

आईवडिलांकडून खेळाचा वारसा मिळालेल्या सिंधूने आठव्या वर्षी बॅडमिंटनची रॅकेट हातात घेतली. तिचे वडील व्हॉलीबॉल खेळत असताना सिंधूला बॅडमिंटनने भुरळ घातली. महबूब अली सिंधूचे पहिले प्रशिक्षक होते.

दहाव्या वर्षी सिंधूने गोपीचंद अकादमीत प्रवेश घेतला. तिथून ऑलिम्पिक पदकापर्यंतची वाटचाल गोपीचंद यांच्या कठोर मार्गदर्शनातच झाली. गोपीचंद यांनी आखून दिलेल्या अतिशय शिस्तबद्ध अशा योजनेचा भाग होत सिंधूने बॅडमिंटनप्रती स्वत:ला झोकून दिलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)