बांगलादेशात हिंदूंची दुकानं आणि मंदिरांवर हल्ला, 10 जणांना अटक

फोटो स्रोत, CHITTARANJAN SEN
बांगलादेशातल्या खुलना जिल्ह्यातल्या रुपसामध्ये हिंदुंची दुकानं आणि मंदिरं फोडण्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (7 ऑगस्ट) रुपसा गावातल्या शियालीमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी 10 लोकांना अटक केली आहे.
हिंदू समुदायातल्या लोकांचं म्हणणं आहे की, हल्लेखोरांनी चार मंदिरांची तोडफोड केली आणि मूर्तींचंही नुकसान केलं.
किती मंदिरांमध्ये तोडफोड झाली किंवा मूर्तींची विटंबना झाली की नाही, याबद्दल पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती अजूनपर्यंत दिलेली नाही.
पण ही घटना घडल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की शनिवारी रात्री केस दाखल करून घेतली होती ज्यानंतर काही लोकांना अटकही केली आहे.
पण कोणाला अटक केली आहे तसंच कोणत्या कलमांखाली या व्यक्तींना अटक झालीये ही माहिती पोलिसांनी दिलेली नाही.
रुपसा पोलीस ठाण्याचे ऑफिसर इंचार्ज सरदार मुशर्रफ हुसेन यांनी म्हटलं की, "या भागात परिस्थिती आता निवळली आहे."
नमाजच्या वेळी गाण्यामुळे झाली हिंसा?
रुपसाच्या उपजिल्हा निर्बाही अधिकारी (उपजिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि पोलीस ठाण्याचे प्रमुख दोघांनी म्हटलं की दोन्ही समुदायांत वाद झाला होता.
हिंदू समुदायाचे लोक शुक्रवारी (6 ऑगस्ट) संध्याकाळी झालेल्या नमाजदरम्यान कथितरित्या गात होते यावरून वादावादी झाली.
दोन्ही अधिकाऱ्यांनी या प्रकाराला 'गैरसमज' म्हटलंय. रुपसाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या वादावर त्याच दिवशी पडदा पडला आणि शनिवारी झालेल्या हल्ल्याचा या वादाशी काहीही संबंध नाही.
रुपसाच्या उपजिल्हा निर्बाही अधिकारी रुबैया तसनीम म्हणतात की शुक्रवारी घडलेल्या प्रकारानंतर त्यांनी स्थानिक हिंदू आणि मुस्लीम समुदायांच्या नेत्यांची भेट घेतली होती.
त्यांनी म्हटलं की, जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांसह आम्ही तातडीने तिथे गेलो आणि वादावर उत्तर शोधण्यासाठी स्थानिक नेत्यांची भेट घेतली."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)