अफगाणिस्तान: तालिबानचं राज्य अल कायदा आणि इस्लामिक स्टेटचं माहेरघर बनू शकतं का?

  • फ्रँक गार्डनर
  • बीबीसी सुरक्षा प्रतिनिधी
तालिबान

फोटो स्रोत, Reuters

अफगाणिस्तानातल्या कुनार प्रांतातील दुर्गम भागात एका ऑनलाईन जिहादी चॅट फोरमवर कट्टरतावादी संघटना अल-कायदाचे समर्थक आंनदोत्सव साजरा करत आहेत.

या लोकांच्या मते तालिबानची अफगाणिस्तानात झालेली सरशी हा 'ऐतिहासिक विजय' आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकेतल्या फौजांनी माघार घेतल्यानंतर जगभरातल्या पाश्चिमात्य देशांच्या विरोधात असणाऱ्या जिहादी समूहांना उत्साहाचं भरतं आलं आहे.

याच पाश्चिमात्य देशांच्या सैन्यांनी अफगाणिस्तानातून तालिबान आणि अल-कायदाला पळवून लावलं होतं.

या पार्श्वभूमीवर आता इराक आणि सीरियामध्ये हार पत्कारावी लागल्यानंतर कथित इस्लामिक स्टेटसारख्या कट्टरतावादी संघटनांसाठी अफगाणिस्तानात पोषक भूमी मिळू शकते. या भागात तालिबान अनेक दशकं घालवली आहेत.

पाश्चिमात्य देशांचे सैन्यअधिकारी आणि राजकीय नेते इशारा देतायत की अफगाणिस्तानात अल-कायदा आधीपेक्षा शक्तिशाली होऊन परत येऊ शकते.

अफगाणिस्तानातील संकटाबद्दल झालेल्या एका आपातकालीन बैठकीनंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इशारा दिला की अफगाणिस्तान पुन्हा कट्टरतावाद्यांचा अड्डा बनू नये यासाठी पाश्चिमात्य देशांची एकजूट व्हायला हवी.

सोमवारी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषेदेला आवाहन केलं की, "अफगाणिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा धोका कमी करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करण्यात यावेत."

फोटो स्रोत, HAROON SABAWOON/ANADOLU AGENCY VIA GETTY IMAGES

अफगाणिस्तानात तालिबान परतल्यामुळे आता अल-कायदा जुने तळ कार्यन्वित होऊन पाश्चिमात्य देशांवर हल्ला करण्यासाठी तिथल्या भूमीचा वापर करण्यात येईल का? असं होइलच असं नाही.

वैधता आणि ओळख मिळवण्याची धडपड

याआधी 1996 पासून 2001 पर्यंत अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य होतं. त्यावेळी देशात बंदुकीचंच राज्य चालायचं.

तेव्हा तीन देश- सौदी अरब, पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीने अफगाणिस्तानातल्या तालिबानी सरकारची वैधता स्वीकारली होती.

तालिबानने या काळात ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अल कायदा या कट्टरतावादी संघटनेला आपल्या देशात हातपाय पसरू दिले. या संघटनेने 2001 साली अमेरिकेवर दहशतवादी हल्ला केला. यात जवळपास 3000 अमेरिकन लोकांचा जीव गेला होता.

एका अंदाजानुसार अल-कायदाने संपूर्ण जगभरात जवळपास 20,000 लोकांना आपल्या शिबिरांमध्ये ट्रेनिंग दिलं आणि आपल्या देशात परत जाऊन घातक कारवाया करण्यासाठी तयार केलं. त्यामुळेच अल-कायदाला 'दहशतवादाचं विद्यापीठ' असंही म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

लादेन

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

आजमितीला तालिबान स्वतःला खऱ्या अर्थाने 'अफगाणिस्तानचे इस्लामी शासक'समजतं. त्यांना नक्कीच इच्छा असेल की जगानेही त्यांची ही ओळख स्वीकारावी.

तालिबान आधीपासूनच म्हणतंय की भ्रष्टाचार, आंतरिक कलह आणि साधनसंपत्तीचा दुरुपयोग करणाऱ्या शासनाला संपवून देशात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्याचा त्यांचा हेतू आहे. पण 20 वर्षांपूर्वी असलेली तालिबानची सत्ता मात्र याच्या अगदीच विपरित होती.

कतारची राजधानी दोहामध्ये नुकतीच अफगाण शांतता परिषद झाली. पण या परिषदेतून काही हाती आलं नाही.

तालिबानकडून जे मध्यस्थ आले होते त्यांना स्पष्ट सांगितलं गेलं की जोवर ते अल-कायदापासून स्वतःला पूर्णपणे वेगळं काढत नाहीत तोवर त्यांना कोणत्याही प्रकारची मान्यता मिळणार नाही.

तालिबानचं म्हणणं आहे की त्यांनी आधीच असं केलंय. अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या एका ताज्या अहवालात असा दावा केलाय की तालिबान आणि अल-कायदाचे संबंध अजूनही बळकट आहेत.

अहवालात म्हटलंय की दोन्ही संघटनांच्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये संबंध तर आहेतच पण त्याबरोबरीने दोन्ही संघटनांमध्ये रोटी-बेटी व्यवहारही होतात. दोन्ही संघटनांमध्ये आपआपसात लग्नं केली जातात.

फोटो स्रोत, WAKIL KOHSAR/AFP VIA GETTY IMAGES

आता जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानात पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली तेव्हा तालिबानकडून लढणाऱ्या अफगाण लोकांसोबत 'बिगर-अफगाण' लोकही लढताना दिसले.

हेही स्पष्ट आहे की एका बाजूला तालिबानचा चेहरा बनलेले प्रवक्ता आणि मध्यस्थ बोलतात तेव्हा त्यांच्या दृष्टीकोन नरमाईचा आणि व्यावहारिक असतो तर दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र सुडाची भावना धगधगतेय आणि क्रौर्य दिसतंय.

12 ऑगस्टला जेव्हा तालिबान राजधानी काबूलकडे कुच करत होतं तेव्हा अमेरिकेत असणाऱ्या काबूलच्या उपराजदूतांनी व्टीट करून म्हटलं होतं की, "दोह्यात तालिबानने जे म्हटलं होतं त्याचा आणि बदक्शा, गजनी, हेलमंद आणि कंदहारमध्ये घडलेल्या घटनांचा, तालिबानने जी जशी पावलं उचलली याच्याशी काही ताळमेळ नाही. हिंसा, भय आणि युद्धाने जी सत्ता त्यांना मिळालीये ती आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना एकटं पाडेल."

जिहाद्यांना थांबवणं पाश्चिमात्य देशांसाठी अवघड

तालिबान अतिशय कडक मानल्या जाणाऱ्या शरिया कायद्याचं पालन करतं. त्यांचा उद्देश अफगाणिस्तानच्या अंतर्गत सीमेमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करणं आहे, देशाबाहेर राज्य करणं नाही.

पण अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटचे हेतू तालिबान आणि अफगाणिस्तानच्या सीमांपेक्षा वेगळे आहेत. कदाचित येणारं तालिबान सरकार या संघटनांवर अंकुश लावण्याता प्रयत्न करेल. पण एक शक्यता अशीही आहे की त्यांच्या हालचाली सरकारच्या नजरेत येणार नाहीत.

एशिया पॅसिफिक फाउंडेशनचे डॉ. सज्जन गोहल म्हणतात, "कुनार प्रांतात अल-कायदा समर्थकांची संख्या येत्या काळात वाढू शकते. सध्या इथे 200 ते 500 अल कायदा समर्थक असतील असा अंदाज आहे."

ते म्हणतात, "कुनार प्रांत तालिबानच्या ताब्यात येण्याला फार मोठं सामरिक महत्त्व आहे. हा प्रांत अतिशय दुर्गम, डोंगर-दऱ्या जंगलांनी भरलेला आहे. अल-कायदाचं इथे आधीपासून अस्तित्व आहे आणि येत्या काळात ही संघटना आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार हे नक्की."

असं झालं तर पाश्चिमात्य देशांसाठी अल-कायदावर अंकुश लावणं फार अवघड ठरेल.

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या दोन दशकात पाश्चिमात्य देशांची मदार अफगाण गुप्तहेर सेवा नॅशनल डायरेक्टरेट ऑफ सिक्युरिटी आणि त्यांचं जाळं याव्यतिरिक्त आपले स्वतःचे खबरी आणि अमेरिका, ब्रिटन आणि अफगाणिस्तानच्या सैन्यदलांवर राहिलेली आहे.

पण अफगाणिस्तानात आता हे सगळं संपलंय. गुप्तहेरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर हा देश आता 'अत्यंत कठीण जागा'बनला आहे.

जर दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांची ओळख पटली आणि त्यांचा पक्का पत्ता कळला तर अमेरिकेकडे ड्रोन किंवा क्रुझ क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा पर्याय आहे.

1998 साली ओसामा बिन लादेनवर अशाचा प्रकारचा हल्ला केला होता पण तो त्यातून वाचला.

डॉ. गोहल म्हणतात की पाकिस्तानी अधिकारी परदेशातून जे कट्टरतावादी येतात त्यांना आपल्या भागातून अफगाणिस्तानात जाण्याची परवानगी देतात की त्यांना थांबवण्यात यशस्वी ठरतात यावरही बरंच काही अवलंबून आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)