तालिबान विरोधकांची अफगाणिस्तानात जमवाजमव, पण ते लढा देऊ शकतील?

  • खुदा-ए-नूर नासीर
  • बीबीसी प्रतिनिधी
अफगाणिस्तान- तालिबान

फोटो स्रोत, Reuters/GettyImages

अफगाणिस्तानातील तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी अफगाणिस्तानातलं युद्ध संपल्याची घोषणा केली आहे.

त्याचवेळी अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी अज्ञात स्थळावरून वेगळाच संदेश दिला. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून गेल्यानंतर आता तेच म्हणजे सालेह अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असून, "अद्याप युद्ध संपलेलं नाही," असं ते म्हणाले.

काबूलमध्ये देशावर ताबा मिळाल्यानंतर मंगळवारी अफगाण तालिबानच्या प्रवक्त्यांनी प्रथमच लाईव्ह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जबीहुल्लाह यांनी माफ करण्याबाबत, महिलांचे अधिकार आणि नव्या सरकारबाबत मत मांडलं.

पण पत्रकार परिषदेच्या काही वेळापूर्वीच, अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी एक घोषणा केली. अफगाणिस्तानच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षांची अनुपस्थिती, राजीनामा किंवा मृत्यू अशा परिस्थितीत उपराष्ट्राध्यक्ष हेच राष्ट्राध्यक्ष बनतात, असं ते म्हणाले.

"मी सध्या देशात आहे आणि कायदेशीरदृष्ट्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहे. मी सर्व नेत्यांचा पाठिंबा आणि सर्वांची संमती मिळवण्यासाठी त्यांच्या संपर्कात आहे," असं अमरुल्लाह सालेह यांनी ट्विटरवर म्हटलं.

फोटो स्रोत, Twitter

एकीकडं अशरफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडलं आहे. तर अमरुल्लाह सालेह हे तालिबानच्या विरोधात आंदोलन सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या काही अफगाण नेत्यांपैकी एक आहेत. तालिबानच्या सशस्त्र योद्ध्यांनी देशावर मिळवलेला ताबा अवैध असल्याचं ते म्हणतात.

सध्याची स्थिती पाहता, तालिबाननं देशाच्या सर्व महत्त्वाच्या सीमा आणि मार्गांवर ताबा मिळवला आहे. देशात तालिबाननं ताबा मिळवल्याचा दावा न केलेली अगदी मोजकी अशी काही ठिकाणं आहेत.

मसूदच्या मुलाची युद्धाची घोषणा

दरम्यान एका दिवसापूर्वीच फ्रान्सच्या एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या एका लेखात, "शेर-ए-पंजशीर" च्या नावानं प्रसिद्ध अफगाण नेते अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तालिबानच्या विरोधात 'युद्ध छेडण्याची घोषणा' केली आहे.

अहमद मसूद यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केला असून त्यात त्यांनी अफगाणिस्तान सोडलं नसून ते पंजशीरमध्येच त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर असल्याचं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

काबूलपासून जवळपास तीन तासांच्या अंतरावर असलेला पंजशीर प्रांत हा तालिबानविरोधी संघर्षासाठी ओळखला जातो. 1996 पासून 2001 पर्यंत तालिबानच्या शासन काळादरम्यानही हा प्रांत त्यांच्या ताब्यात नव्हता. त्याठिकाणी नॉर्दर्न अलायन्सनं तालिबानशी दोन हात केले होते.

पंजशीरमधील सुत्रांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, अमरुल्लाह सालेह आणि अहमद मसूद यांनी पूर्व उत्तर आघाडीचे प्रमुख कमांडर आणि सहकाऱ्यांशी पुन्हा संपर्क केला असून त्या सर्वांनाही संघर्षात सहभागी होण्यासाठी तयार केलं आहे.

अशरफ घनींच्या राजीनाम्याचा विरोध : 'आम्ही तालिबानशी लढा देऊ'

राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या एका नीकटवर्तीयानं रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये राष्ट्राध्यक्ष भवनात झालेल्या कार्यक्रमांबाबत माहिती दिली आहे.

गेल्या शुक्रवारी तालिबान काबूलवर हल्ला करण्यासाठी येत असताना, काही गटांनी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला होता. पण त्यांनी ऐकलं नाही, असंही त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मृत्यू येईपर्यंत तालिबानचा विरोध करणाऱ्या कमांडर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद

शनिवारी आणि रविवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकांमध्ये राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या अनेक नीकटवर्तीय सहकाऱ्यांनी त्यांना राजीनामा देण्याचा आणि देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. केवळ अमरुल्लाह सालेह हे एकमेव असे होते, ज्यांनी घनी यांना अखेरच्या क्षणापर्यंत राजीनामा न देण्याचा आणि देश न सोडण्याचा सल्ला दिला, असा दावा सुत्रांनी केला आहे.

त्यांच्या मते, यावेळी अमरुल्लाह सालेह यांनी "आपण तालिबानशी लढा देऊ," असं वारंवार म्हटलं होतं.

राष्ट्राध्यक्ष भवनातील या बैठकांबाबत आणखी एका सुत्रानं दुजोरा दिला आहे. अमरुल्लाह सालेह राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या राजीनाम्याच्या कट्टर विरोधात होते, असं ते म्हणाले.

पंजशीरमध्ये एकवटत आहेत तालिबान विरोधक

काबूलमध्ये तालिबान आल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष घनी यांनी देश सोडल्यानंतर, अमरुल्लाह पंजशीरला गेले आणि अजूनही ते तिथं आहेत, असं त्यांनी सांगितलं.

अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदीदेखील अमरुल्लाह यांच्याबरोबर असल्याचीही शक्यता आहे.

अमरुल्लाह सालेह यांचा एक ऑडिओ मॅसेजही समोर आला आहे. त्यात त्यांनी भविष्यातील कारवाईबाबत माहिती दिली आहे.

अमेरिकेतील अफगाण विश्लेषक हाशीम वाहदतयार यांच्या मते अमरुल्लाह सालेह यांच्या संदेशात दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. "त्यापैकी एक बाब म्हणजे तालिबाननं जर लोकशाही सरकारचा प्रस्ताव ठेवला तर कदाचित ते राजीही होतील. पण जर तालिबाननं त्यांच्या पद्धतीनं सरकार स्थापन्याची घोषणा केली तर, कदाचित अमरुल्लाह त्यांच्या विरोधात लढतील."

पण अमरुल्लाह यांना देशात किती पाठिंबा मिळेल हे अद्याप स्पष्ट नाही.

कसा वाढू शकतो तालिबान विरोध?

तालिबाननं अद्याप त्यांच्या नव्या सरकारबद्दल फारसं काही सांगितलेलं नाही. पण त्यांच्या सरकारमध्ये सर्व भागांतील आणि विचारांचे अफगाण लोक सहभागी असतील, असं जबीहुल्लाह मुजाहीद यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं. अफगाणिस्तानातील सर्व पक्षांचं प्रतिनिधित्व त्यांचं सरकार करेल, असंही ते म्हणाले.

तालिबानच्या मते, ''सध्या ते सत्तेमध्ये आहेत,'' त्यामुळं यानंतर आता जे काही घडेल त्यासाठी तालिबान जबाबदार असेल असं, विश्लेषक हाशीम वाहदतयार म्हणाले.

काही वृत्तांनुसार तालिबान अमरुल्लाह सालेह आणि अहमद मसूद यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांना सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी त्यांच्याकडं पथक पाठवण्याच्या विचारात असल्याचंही, वाहदतयार म्हणाले.

पण तसं झालं तरी, गेल्या 20 वर्षांत घडलेल्या अनेक घटना या तालिबान आणि त्यांच्या विरोधकांना एकत्र येण्यामध्ये अडथळा ठरू शकतात.

नॉर्दन अलायन्स आणि बहुतांश लोक अहमद शाह मसूदला "नायक" म्हणतात. मग "तालिबानला ही उपमा स्वीकार्य असेल का?" असं वाहदतयार यांनी या घटनेचा उल्लेख करताना म्हटलं.

अहमद शाह मसूद यांची 9/11 हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी अल-कायदाच्या दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी हत्या केली होती. आतापर्यंत नॉर्दन अलायन्स आणि अहमद शाह मसूद यांना मानणारे त्यांच्या स्मृतीदिनी दरवर्षी संपूर्ण काबूल शहर बंद ठेवतात.

तालिबाननं दिलेली वचनं पाळली तर त्यांच्यासमोरची आव्हानं कमी होऊ शकतात, असं वाहदतयार यांनी जबीहुल्लाह मुजाहीद यांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत म्हटलं.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पण तालिबाननं सत्ता मिळवल्यानंतर त्यांच्या आधीच्या कार्यकाळाप्रमाणे कठोर निर्णय घेतले, तर त्यांच्या सरकारसमोरील अडचणी वाढू शकतात, असं ते म्हणाले.

तालिबानला संघटित विरोध करण्यासाठी एखादा गट समोर यायला कदाचित वेळ लागू शकतो. पण रस्त्यांवर त्यांना छोट्या-मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागत आहे.

लोकांनी तालिबानसमोर विरोध व्यक्त केल्याचे जवळपास तीन व्हीडिओ गेल्या दोन दिवसांत समोर आले आहेत. त्यात लोकांनी तालिबानसमोर विरोध नोंदवला आहे.

एका व्हीडिओमध्ये काबूलच्या रस्त्यांवर काही महिला हातानं लिहिलेले प्लेकार्ड दाखवून घोषणा देत असल्याचं पाहायला मिळालं होतं. या महिला तालिबानकडे त्यांना काम करू देण्याची मागणी करत होत्या, असं काही वृत्तांमध्ये समोर आलं आहे. त्यांच्या जवळ-पास सशस्त्र तालिबानीदेखील उभे असल्याचं दिसत आहे.

खोश्त प्रांतातून समोर आलेल्या आणखी एका व्हीडिओमध्ये काही तरुण एका चौकातून हातात अफगाणिस्तानचा झेंडा घेऊन घोषणा देत तिथून जात असल्याचं दिसत आहे. तालिबानचे योद्धे त्यांच्याकडं आश्चर्यानं पाहत आहेत.

18 ऑगस्टला आणखी एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्यात पाकिस्तानच्या सीमेच्या जवळ जलालाबाद या एका मोठ्या शहरात काही जण तालिबानचा झेंडा हटवून मागच्या सरकारचा हिरवा-लाल झेंडा लावत असल्याचं दिसत आहे.

दुसरीकडं, बामियानमध्ये तालिबाननं त्याठिकाणचे प्रसिद्ध हजारा नेते अब्दुल अली मजारी यांची मूर्ती तोडली आहे. तालिबाननं 1996 मध्ये मजारी यांची हत्या केली होती. मजारी हजारा शिया समुदायाचे प्रमुख नेते आणि तालिबानचे विरोधक होते.

याच बामियानमध्ये गौतम बुद्धांच्या दोन विशाल मूर्ती होत्या. सुमारे दोन दशकांपूर्वी तालिबाननं त्या नष्ट केल्या.

सहाव्या शतकातील बामियानमध्ये गौतम बुद्धांची मोठी मूर्ती 53 मीटर आणि लहान मूर्ती 35 मीटर उंचीची होती. तालिबानच्या प्रशासकांनी या मूर्ती इस्लाम विरोधी असल्याचं सांगत, तोफांनी उडवून त्या नष्ट केल्या होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)