अफगाणिस्तान: तालिबानची अर्थव्यवस्था आणि अफू यांचं नेमकं नातं काय?

  • रिअॅलिटी चेक टीम
  • बीबीसी न्यूज
अफू शेती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अफूची शेती

तलिबाननं गेल्यावेळी सत्तेवर असताना अफूच्या शेतीवर पूर्णपणे बंदी लावल्यामुळं बेकायदेशीर ड्रग्जचा व्यवसाय थांबला होता असा दावा केला आहे.

2001मध्ये अफगाणिस्तानात अफूचं उत्पादन घटल्याचं पाहायलाही मिळालं. पण त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये तालिबानचा ताबा असलेल्या भागांत अफूची शेती वाढल्याचं चित्र दिसलं.

अफगाणिस्तानात किती अफू पिकवली जाते?

खूप जास्त प्रमाणावर नशा आणणारे हेरॉईनसारखे ड्रग्ज तयार होतील अशी प्रक्रिया अफूवर केली जाते.

युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम्स (यूएनओडीसी) च्या मते, अफूचा सर्वात मोठा उत्पादक देश अफगाणिस्तान आहे.

जगभरात अफूच्या एकूण उत्पादनापैकी 80 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन हे अफगाणिस्तानात होतं.

यूएनओडीसीच्या 2018मधील माहितीनुसार अफगाणिस्तानातील अर्थव्यवस्थेत त्यावेळी अफूच्या उत्पादनाची भागीदारी 11 टक्के होती.

तालिबाननं अफूबाबत काय म्हटलं?

"आमचं सरकार होतं त्यावेळी ड्रग्जचं उत्पादन झालं नाही. आम्ही पुन्हा एकदा अफूच्या शेतीचं प्रमाण शून्यापर्यंत खाली आणू. कोणत्याही प्रकारची तस्करी होणार नाही," असं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी म्हटलं.

तालिबानचा इतिहास काय सांगतो?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, तालिबानच्या सरकारच्या काळात अफूच्या शेतीमध्ये वाढ झाली आहे. 1998 मध्ये 41 हजार हेक्टरवरून हे प्रमाण 2000मध्ये 64 हजार हेक्टरवर पोहोचलं होतं.

जगातील एकूण अफूच्या उत्पादनापैकी जवळपास 39% उत्पादन हे हेलमंद प्रांतात होतं. या प्रांतावर बहुतांश काळ तालिबानचाच ताबा राहिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अफूची शेती

पण जुलै 2000मध्ये तालिबाननं त्यांच्या ताब्यात असलेल्या भागात अफूच्या शेतीवर बंदी घातली होती.

मे 2001 मधील संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार 'तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागांमध्ये अफूच्या उत्पादनावरील बंदी पूर्णपणे यशस्वी ठरली.'

तालिबानच्या बंदीच्या काळात 2001 आणि 2002मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अफू आणि हेरॉईन जप्त करण्याची प्रकरणं समोर येण्याचं प्रमाणही कमीच होतं.

पण त्यानंतर परिस्थितीत बराच बदल पाहायला मिळाला आहे.

गेल्या वेळी सरकारकडून शेतीवर नियंत्रण ठेवूनही बहुतांश अफूचं उत्पादन हे तालिबानचा ताबा असलेल्या भागांमधूनच होत असल्याचं स्पष्ट आहे.

उदाहरण द्यायचं झाल्यासं हेलमंद हा दक्षिण अफगाणिस्तानातील प्रांत आहे. त्याठिकाणी बहुतांश जमिनीवर 2020 मध्ये अफूची शेती होत होती. विशेष म्हणजे त्याठिकाणी तेव्हा तालिबानचा ताबा होता.

अफूमधून तालिबानला मिळणारं उत्पन्न

अफगाणिस्तानात अफूची शेती हा रोजगाराचा प्रमुख स्त्रोत आहे. यूएनओडीसीच्या अफगाणिस्तानातील अफूच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे एक लाख 20 हजार लोक यावर अवलंबून होते.

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रमुखांच्या मते, तालिबानला अफूवर कर लावल्यानं उत्पन्न मिळतं. त्याशिवाय बेकायदेशीररित्या अफू बाळगणं आणि त्याच्या तस्करीतूनही अप्रत्यक्षरित्या उत्पन्न मिळतं. अफूचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 10 टक्के कर घेतला जातो.

अफूपासून हेरॉईन बनवणाऱ्या प्रोसेसिंग लॅबकडूनही कर वसुली केली जाते. तसेच त्याचा व्यापार करणारेही कर भरतात. एका माहितीनुसार बेकायदेशीर ड्रग्जच्या व्यवसायातून तालिबानला किमान 10 ते 40 कोटी डॉलर एवढं वार्षिक उत्पन्न मिळतं.

तालिबानच्या वार्षिक उत्पन्नातील 60% भाग हा बेकायदेशीर ड्रग्ज व्यवसायातून येत असल्याचं, अमेरिकेच्या वॉचडॉग स्पेशल इन्स्पेक्टर जनरल फॉर अफगान यांचं म्हणणं आहे.

कुठं होतो ड्रग्जचा वापर?

अफगाणिस्तानात पिकणाऱ्या अफूपासून जे हेरॉईन तयार केलं जातं, त्याचा 95% भाग हा युरोपात वापरला जातो.

अमेरिकेत केवळ एक टक्के हेरॉईन अफगाणिस्तानातून येतं, याठिकाणी बहुतांश हेरॉईन मेक्सिकोमधून येतं, असं अमेरिकेच्या ड्रग इन्फोर्समेंट एजन्सीनं म्हटलं आहे.

2017 ते 2020 दरम्यान अंमली पदार्थांची 90% पेक्षा अधिक तस्करी रस्त्याच्या मार्गे झाली आहे. पण सध्याच्या काळात हिंदी महासागर आणि युरोपच्या दरम्यान असलेल्या सागरी मार्गांवर अधिक ड्रग्ज जप्त केले जात आहेत.

अफूची शेती, उत्पादन आणि त्याच्या जप्तीच्या प्रकरणांचं प्रमाण पाहता गेल्या दोन दशकांत अफगाणिस्तान यात प्रचंड वाढ झाल्याचं स्पष्ट आहे.

अफू जप्त केल्यानं किंवा तस्करी करणाऱ्यांना अटक झाल्यानं अफगाणिस्तानात त्याच्या शेतीवर फारसा परिणाम होत नाही, असं अमेरिकेतील वॉचडॉग स्पेशल इन्स्पेक्टर जनरल फॉर अफगाण रिकन्स्ट्रक्शन यांनी म्हटलं आहे.

2008 पासून आतापर्यंत जेवढी अफू जप्त झाली आहे, त्याचं प्रमाणं 2019 च्या एका वर्षाच्या उत्पन्नाच्या केवळ 8 टक्के एवढं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)