अफगाणिस्तानः पंजशीर खोरं तालिबानला का जिंकता आलं नाही?

  • पॉल केर्ली आणि ल्युसिया ब्लास्को
  • बीबीसी न्यूज
पंजशीर खोरं

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन,

पंजशीर खोरं

अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून सुमारे 30 मैल अंतरावर दुर्गम भागात आणि अरुंद प्रवेशद्वार असलेला एक प्रांत (खोरं) आहे. याठिकाणी हजारो योद्धे तालिबान विरोधात लढण्यासाठी एकत्र जमल्याचं वृत्त आहे.

अफगाणिस्तानात सध्या अशांतता पसरली आहे. पण यापूर्वीही अशा परिस्थितीत नाट्यमयरित्या आणि तेवढ्याच प्रभावीपणे पंजशीर खोरं शत्रूंच्या विरोधात उभं ठाकलं होतं. 1980 च्या दशकात सोव्हिएत सेना आणि 90 च्या दशकात तालिबानच्या विरोधात हा बालेकिल्ला ठरला.

याठिकाणच्या नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगणिस्तान (एनआरएफ) नं जगाला या भागाच्या सामर्थ्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे.

"अत्यंत शक्तीशाली असूनही रशियाची लाल सेना आम्हाला पराभूत करू शकली नव्हती. तसंच 25 वर्षांपूर्वी तालिबानलाही आम्हाला पराभूत करता आलं नव्हतं.

सर्वांनी या भागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. त्यांना याठिकाणी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला," असं एनआरएफचे परराष्ट्र विषयाचे प्रमुख अली नझारी यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

पंजशीरची भौगोलिक स्थिती

लांब, खोल आणि प्रचंड धूळ असलेलं हे खोरं राजधानी काबूलच्या उत्तरेला दक्षिण-पश्चिम ते उत्तर-पूर्वपर्यंत 75 मैल (120 किमी) पसरलेलं आहे.

याच्या चारही बाजूंनी समुद्रसपाटीपासून अंदाजे 9,800 फूट (3,000 मीटर) ऊंच डोंगर रांगा आहे. याठिकाणच्या लोकांसाठी हे डोंगर नैसर्गिक सुरक्षाकवच आहे.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन,

पंजशीर खोरं

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

या खोऱ्यात केवळ एक आणि तोही अत्यंत अरुंद असा मार्ग आहे. तोही मोठे डोंगर आणि वळणं घेत गेलेल्या नदीच्या मधून जातो.

तालिबाननं ताबा मिळवण्याच्या पूर्वीपर्यंत अफगाणिस्तानात राहणारे शाकीब शरीफी यांचं बालपण याच खोऱ्यात गेलं.

"हे केवळ एक खोरं नाही. तर या संपूर्ण भागासंदर्भातलं गूढ आहे. तुम्ही याठिकाणी प्रवेश करता त्यानंतर याठिकाणी किमान 21 इतर लहान खोरे एकमेकांना जोडलेले आढळतात," असं ते म्हणाले.

मुख्य खोऱ्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत 4,430 मीटर (14,534 फूट) लांबीची एक पाऊलवाट आहे. ती अंजुमन दर्रा या ठिकाणापर्यंत जाते. तिथून पुढं हिंदुकुश पर्वतरागांपर्यंत जाते. अलेक्झांडर आणि तैमूरलंग यांचं सैन्यही याच मार्गानं गेलं होतं.

"इतिहासात पंजशीर खोऱ्याला अर्ध-मौल्यवान रत्नांसाठीही ओळखलं जात होतं," असं लीड्स विद्यापीठात इतिहासाच्या सहायक प्राध्यापिका असलेल्या एलिझाबेथ लीक यांनी सांगितलं.

सध्या पंजशीर खोऱ्यात जलविद्युत बंधारे आणि शेतीही आहे. अमेरिकेनं याठिकाणी रस्त्यांबरोबरच काबूलहून सिग्नल मिळवण्यासाठी एका रेडिओ टॉवरच्या निर्मितीसाठीही मदत केली होती.

सोव्हिएत रशियानं 1950 च्या दशकात तयार केलेलं बागराममधील पूर्वीचं अमेरिकेचं हवाईतळ खोऱ्याच्या तोंडाशी काही अंतरावरच आहे.

पंजशीरचे शूर योद्धे

एका अंदाजानुसार पंजशीर खोऱ्यात 1.5 ते 2 लाख लोक राहतात. येथील बहुतांश लोक 'दारी' भाषा बोलतात. मूळची ताझिकिस्तानची असलेली ही भाषा अफगाणिस्तानातील प्रमुख भाषांपैकी एक आहे.

अफगाणिस्तानातील 3.8 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास एक चतुर्थांश भाग ताजिकींचा आहे. मात्र पंजशिरी लोक हे अफगाणिस्तानच्या शेजारी असलेल्या ताजिकिस्तानचा फार विचार करत नाहीत. कारण त्यांची स्वतंत्र अशी स्थानिक ओळख आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पंजशीर खोऱ्यात 1.5 ते 2 लाख लोक राहतात. येथील बहुतांश लोक 'दारी' भाषा बोलतात.

काही दिवसांपूर्वीपर्यंत अफगाणिस्तानच्या कृषी मंत्रालयात योजनांचे महासंचालक असलेले शाकीब शरीफी, पंजशिरी शूर असल्याचं सांगतात.

कदाचित हे अफगाणिस्तानातील सर्वात शूर लोक असावेत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते स्थानिक लोक तालिबानबरोबर आनंदी नाहीत. त्यांच्यामध्ये सकारात्मक आक्रमकता आहे. ब्रिटन, सोव्हिएत संघ आणि तालिबान विरोधात मिळालेल्या ऐतिहासिक विजयानं लोकांचा आत्मविश्वास वाढवला आहे.

प्रांताचा दर्जा

2001 मध्ये तालिबानच्या पराभवानंतर पंजशीर खोऱ्याला जिल्ह्याऐवजी प्रांत म्हणून मान्यता देण्यात आली. हा अफगाणिस्तानातील सर्वात लहान प्रांतांपैकी एक आहे.

"याला प्रांताचा दर्जा देण्याचा निर्णय वादग्रस्त होता," असं रॉयल युनायटेड सव्हिसेस इन्स्टिट्यूट (आरयूएसआय) मधील वरि्ष्ठ असलेले डॉक्टर अँटोनियो गिऊस्टोजी म्हणाले.

2000 च्या दशकाच्या सुरुवातीला पंजशिरी योद्ध्यांकडे प्रचंड शक्ती होती. त्यांनी काबूलवर ताबा मिळवून देण्यात मदत केली होती. त्यानंतर ते सर्वात महत्त्वाचा भाग बनले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अहमद मसूद

पंजशिरी नेत्यांना सरकार आणि लष्करामध्ये प्रमुख स्थान देण्यात आलं. खोऱ्याला स्वायत्तता प्रदान करण्यात आली. हा देशातील एकमेव असा प्रांत होता ज्याठिकाणी तिथल्याच गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली. इतर प्रांतांमध्ये स्थानिकांना गव्हर्नर बनवलं जात नव्हतं.

"गव्हर्नरनं स्थानिक नागरिकांच्या तुलनेत सरकारशी अधिक प्रामाणिक राहणं अपेक्षित असतं. पण पंजशीरचा विषय या सर्वापेक्षा वेगळा होता," असं डॉक्टर गिउस्टोजी सांगतात.

सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग

डॉक्टर गिउस्तोजी यांच्या मते, कदाचित अफगाणिस्तानात अशी अनेक खोरी आहेत. पण या खोऱ्यापासून काबूलकडून उत्तरेला जाणारा मुख्य मार्ग जवळ आहे. त्यामुळं हे खोरं राजकीय आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरतं.

काबूलकडून येणारा प्रमुख महामार्ग सपाट भूप्रदेश सोडून डोंगरांमध्ये सालांग दर्रा असलेल्या भागाकडे उंच होत जातो, त्या भागापासून जवळच या खोऱ्याचं प्रवेशद्वारे आहे. सालांग दर्रा, उत्तरेकडील कुंदुज शहर आणि मजार-ए-शरीफला जाणारा एक बोगदा आहे.

अनेक शक्तीशाली घटक एकत्रित आल्यामुळं पंजशीर हे अधिक महत्त्वाचं ठरतं, असं शरीफी सांगतात.

त्यांच्या मते, "या भागाचं महत्त्व केवळ निगराणी करायला अनेक ठिकाणं किंवा डोंगराळ प्रदेश यामुळं नाही. किंवा पंजशीरमधील नागरिकांना असलेल्या अभिमानामुळंही नाही. तर हे सर्व घटक जुळून येणं, एकत्रित असणं हे त्यामागचं कारण आहे. अफगाणिस्तानात ही वैशिष्ट्य अनेक ठिकाणी आढळतात, पण ती वेगवेगळी एकाच ठिकाणी नव्हेत."

फोटो स्रोत, Getty Images

सध्याच्या संघर्षाच्या परिस्थितीत या प्रांतात शस्त्रांचा मोठा साठा आहे, असं मानलं जात आहे. 20 वर्षांपूर्वी तालिबान सत्तेतून बाहेर पडल्यानंतर येथील योद्ध्यांनी त्यांच्या तुकड्या बंद केल्या होत्या. तसंच शस्त्रही सरकारला सोपवली होती. ''मात्र तिथं अजूनही शस्त्रांचा साठा असल्याचं," डॉक्टर गिउस्टोजी सांगतात.

"पंजशीरशी संबंध असलेले अफगाणिस्तानचे अधिकारी त्याठिकाणी शस्त्र पाठवत होते. कारण ते राष्ट्राध्यक्ष करझई आणि गनी यांच्याबाबत सतर्क होते. पण अखेरीस त्यांना तालिबानबाबत काळजी करावी लागली," असं ते सांगतात.

पंजशीरच्या खोऱ्यात तालिबान विरोधी गटाचं नेतृत्व 32 वर्षीय अहमद मसूद करतच आहेत. 1980 आणि 90 च्या दशकातील प्रतिष्ठीत नेते अहमद शाह मसूद हे त्यांचे वडील होते.

मसूद यांनी त्यांच्या योद्ध्यांना अफगाणिस्तानचं लष्कर आणि विशेष दलांच्या सदस्यांच्या लष्कराचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

"आमच्याकडे दारु गोळा आणि शस्त्रांचा साठा आहे. आमच्या वडिलांच्या काळापासून अत्यंत काळजीपूर्वक आम्ही ही शस्त्रं जमवली आहेत. अशी वेळ कधीही येऊ शकते, हे आम्हाला माहिती होतं,'' असं त्यांनी वॉशिंग्टन पोस्टसाठी लिहिलेल्या लेखात नुकतंच म्हटलं होतं.

अहमद मसूद यांचे वडील अहमद शाह मसूद

अहमद मसूद यांचे वडील अहमद शाह मसूद यांना 'पंजशीर के शेर' असं म्हटलं जात होतं. ते मुजाहीदीन कमांडर होते. त्यांनी सोव्हिएत रशिया आणि तालिबान दोन्हींच्या लष्करांना पंजशीरवर ताबा मिळवण्यापासून रोखलं होतं. पंजशीरचा अर्थच पाच सिंह (पांच शेर) असा आहे.

अफगाणी लष्करातील जनरल यांच्या घरी अहमद शाह मसूद यांचा जन्म पंजशीर खोऱ्यातच झाला होता. पंजशीर आणि काबूलच्या स्मारकांपासून ते होर्डिंग आणि दुकानांच्या खिडक्यांपर्यंत सगळीकडं त्यांचे फोटो दिसतात.

1978 मध्ये पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान (पीडीपीए) ची सत्ता आल्यानंतर आणि एका वर्षानंतर सोव्हिएत रशियाच्या लष्कराच्या प्रवेशानंतर अहमद शाह मसूद यांच्यामुळंच पंजशीर खोरं डाव्यांच्या विरोधाचं केंद्र बनलं होतं.

''सोव्हिएत-अफगाण युद्धामध्ये ते विरोधकांचा चेहरा बनले होते. त्यांच्याकडे काहीतरी जादू होती आणि पाश्चिमात्य माध्यमांमध्ये ते सक्रिय होते. सोव्हिएत संघ ज्यांच्याशी चर्चा करायला तयार होतं, त्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक होते. या सर्वांमुळंच त्यांना महत्त्व प्राप्त झालं होतं," असं लीड्स विद्यापीठाच्या प्राध्यापिका एलिझाबेथ लीक म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अहमदशाह मसूद फोटो

डॉक्टर गिउस्टोजी यांच्या मते, अहमद शाह मसूद त्या काळच्या इतर नेत्यांपेक्षा वेगळे होते. "ते सुशिक्षित होते, त्यांना फ्रेंच भाषा येत होती. मितभाषी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे होते. तर इतर कमांडरची प्रतिमा मात्र असभ्य, अशिक्षित आणि मोठ्यानं ओरडून बोलणारे अशी होती.''

2001 मध्ये 9/11 च्या घटनेच्या बरोबर दोन दिवसांपूर्वी 9 सप्टेंबरला अल-कायदाच्या अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली होती. नंतर राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी त्यांनी राष्ट्रपुरुष घोषित केलं होतं.

मात्र, काहींच्या मते, अहमद शाह मसूद हे युद्ध काळातील गुन्हेगार होते. 2005 च्या ह्युमन राइट्स वॉचच्या तपासानुसार, "अफगाणिस्तानात युद्धाच्या दरम्यान त्यांच्या तुकडीतील सैन्य दलांवर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे अनेक आरोप झाले होते.''

अजेय खोरं

1980 आणि 1985 दरम्यान सोव्हिएत संघानं जमिनीवरून आणि हवेद्वारे पंजशीर खोऱ्यावर जवळपास 6 वेळा हल्ले केले होते.

रशियाच्या सैनिकांना या भागाचा अत्यंत तोकडा अनुभव होता. त्यामुळं ते अनेकदा घातपाताचे शिकार ठरायचे.

शरीफी यांच्या मते, सोव्हिएत संघाला सगळ्या बाजुंनी हजारो जखमा सहन कराव्या लागल्या होत्या. सोव्हिएत रशियाची मशीनगन अशी ओळख असलेला 'मिस्टर डीएचएसके' म्हणून एक प्रसिद्ध व्यक्ती होता. तो टेकड्यांच्या मागे लपून गोळाबार करायचा, पण ते त्याला कधीही शोधू शकले नाही. त्यामुळं ते अक्षरश: वेडे झाले होते.

आजचे काही कमांडर त्याकाळीही होते, असं ते सांगतात. "त्यांना मुख्यालयाकडून योग्य संदेश मिळेपर्यंत चौकीवर एकट्यांना उभं राहायला सांगितलं जात होते. पण वाट कशी पाहायची आणि वेदना कशा द्यायच्या हे त्यांना माहिती होतं, असं ते सांगतात."

सोव्हिएत संघानं काही काळासाठी खोऱ्यात काही भाग ताब्यात घेतला होता, पण ते फार काळ तो सांभाळू शकले नाहीत, असं डॉक्टर गिउस्टोजी सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

"रशियाला त्याठिकाणी राहायला आणि लष्कराला थांबवण्यासाठी जागा सापडली नाही. त्यांना उत्तर-दक्षिण मार्ग ताब्यात हवा होता. पण आसपासच्या परिसरात युद्ध सुरू झालं होतं,'' असंही शरीफी म्हणाले.

पंजशीर खोऱ्यात शस्त्रं, टँक, विमानं तशीच सोडण्यात आली. सोव्हिएत संघाच्या अपयशी लढ्याचा हा वारसा आहे.

अहमद मसूद

वडिलांची हत्या झाली तेव्हा अहमद मसूद 12 वर्षांचेच होते. त्यांनी लंडनमध्ये शिक्षण घेतलं आहे. तसंच सँडहर्स्टमध्ये रॉयल मिलिट्री अॅकेडमीमध्ये एकवर्ष प्रशिक्षणही घेतलं आहे.

"वडिलांप्रती असलेल्या आकर्षणाचा वारसा त्यांच्याकडे आहे. मात्र अद्याप सैन्याचे कमांडर म्हणून ते परिक्षेला सामोरे गेलेले नाहीत, असं डॉक्टर गिउस्टोजी सांगतात.

"राष्ट्रीय स्तरावर सत्ता किंवा भागीदारीबाबत येणाऱ्या कोणत्याही प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे कौशल्य असणं गरजेचं असेल. त्यांच्याकडं गमावण्यासारखं असं काहीही शिल्लक नाही. कदाचित चर्चेमध्ये जास्तीची मागणी ते करू शकतात,'' असंही ते म्हणाले.

खोऱ्यात यापुढं काय होईल, याचा अंदाज लावणं कठीण आहे, असं प्रोफेसर लीक यांचं म्हणणं आहे.

"वारसा आणि पित्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत ते नक्कीच जागरूक आहेत. आपण त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याचा वारसा जपताना पाहू शकतो,'' असंही त्या म्हणाल्या.

"मात्र यावेळची गोष्ट पूर्वीपेक्षा वेगळी आहे. तालिबाननं मोठी शहरं आणि गावं ताब्यात घेतली आहेत. त्यामुळं पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळं संतुलन ढासळू शकतं," असं त्यांचं मत आहे.

अहमद मसूद यांनीही मदतीची मागणी केली आहे.

"तालिबाननं हल्ला केला तर त्यांना नक्कीच आमच्या प्रखर विरोधाचा सामना करावा लागले. आमची सैन्य शक्ती आणि रसद पुरेशी नसल्याचंही आम्हाला माहिती आहे," असं त्यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या लेखात म्हटलं आहे.

"आमचे मित्र आम्हाला रसद पोहोचवण्याचा मार्ग शोधत नाही, तोपर्यंत आमच्याकडे असलेली साधन सामुग्री वेगानं संपत जाणार आहे," असंही त्यांनी यात लिहिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)