चार पायांच्या देवमाशाचे अवशेष सापडले; तो जमिनीवर येऊनही चालायचा

चार पायांचा व्हेल

फोटो स्रोत, DR ROBERT W. BOESSENECKER

फोटो कॅप्शन,

चार पायांचा व्हेल

इजिप्तमधील शास्त्रज्ञांनी माशाच्या एका आगळ्यावेगळ्या प्रजातीचे अवशेष शोधून काढले आहेत. 4 कोटी 30 लाख वर्षांपूर्वी ही प्रजात पृथ्वीवर अस्तित्वात होती.

हा प्राणी चार पायांचा एक देवमासा (व्हेल) असून पाण्यात पोहण्यासह जमिनीवर येऊन चालूही शकायचा, असा दावा संशोधकांनी केला आहे.

इजिप्तच्या पश्चिम भागातील एका वाळवंटात देवमाशाचे हे जीवाश्म आढळून आले आहेत. याला अँफिबियस फिओमीसेटस असं संबोधलं जात आहे.

या जीवाश्माच्या कवटीचा आकार इजिप्तमधील अनुबिस या देवतेसारखी असल्याने त्याला अनुबिस हेच नाव देण्यात आल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

त्यांच्या मते, सध्या पाण्यात मुक्त संचार करत असलेल्या व्हेलच्या पूर्वजांना मात्र चार पाय होते. ते आपल्या पृथ्वीवर सुमारे 1 कोटी वर्ष राहत होते.

या अवाढव्य प्रजातीचं वजन तब्बल 600 किलोंच्या आसपास होतं. तर त्यांची लांबी सरासरी 10 फूट इतकी असे.

शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, चार प्राण्यांच्या व्हेलला शिकार करणं सोपं जावं यासाठी त्याच्या जबड्याची रचना अतिशय मजबूत प्रकारची होती.

फोटो स्रोत, Reuters

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

या संदर्भातला एक अहवाल नुकताच प्रोसिडिंग्ज ऑफ रॉयल सोसायटी या मासिकात प्रकाशित करण्यात आला आहे.

इजिप्तमध्ये फायूम डिप्रेशन भागात या व्हेलच्या सांगाड्याचे अंश आढळून आले आहेत. याचा अभ्यास मन्सुरा युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केला.

सध्या हा परिसर एक वाळवंट बनलं असलं तरी कधी काळी हा भूभाग समुद्राने आच्छादित केलेला होता. सध्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवाश्म आढळून येतात.

संशोधकांच्या पथकाचे प्रमुख अब्दुल्ला गोहर यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी याविषयी विस्ताराने चर्चा केली.

"फिओमीसेटस अनुबिस ही व्हेलची एक नवी आणि प्रमुख जमात आढळून आली आहे. आफ्रिकेतील जीवाश्मांचा अभ्यास करण्यासाठी हा शोध अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाईल," असं त्यांनी म्हटलं.

पाय असलेल्या व्हेलचे जीवाश्म सापडण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी फिओमीसेट्स अनुबिस आफ्रिकेत सापडलेला सर्वात प्राचीन उभयचर प्राणी असल्याचं मानलं जातं.

आजवरच्या इतिहासात पृथ्वीवरील पहिला व्हेल 5 कोटी वर्षांपूर्वी दक्षिण आशियाच्या परिसरात विकसित झाल्याचं मानलं जातं.

2011 मध्ये पेरू येथील जीवाश्म अभ्यासकांना अशाच प्रकारे चार पाय, जाळीदार पाय आणि खुरा असलेल्या 4 कोटी 30 लाख वर्षांपूर्वीच्या व्हेलचे जीवाश्म सापडले होते.

त्यानंतर आता इजिप्तमध्ये अशा प्रकारची प्रजात होती, असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)