ISIS-K : इस्लामिक स्टेट खुरासान संघटना नेमकी काय आहे?

काबूल विमानतळ हल्ल्यानंतरचं दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

काबूल विमानतळ हल्ल्यानंतरचं दृश्य

ISIS-K किंवा विस्ताराने बोलायचं झाल्यास इस्लामिक स्टेट खुरासान प्रॉव्हिन्स (ISKP) ही इस्लामिक स्टेट संघटनेची एक प्रादेशिक शाखा आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात ही संघटना सक्रिय आहे.

अफगाणिस्तानातील सर्व जिहादी कट्टरवादी संघटनांमध्ये ही संघटना सर्वाधिक धोकादायक आणि हिंसक मानली जाते.

इराक आणि सीरियामध्ये जेव्हा इस्लामिक स्टेट संघटना आपल्या सर्वाधिक क्षमतेने कार्यरत होती, त्यावेळी ISKP ची स्थापना झाली.

तोपर्यंत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सैन्याकडून इस्लामिक स्टेटचा पराभव झालेला नव्हता.

ISKP ही संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतून जिहादींची भरती करते.

विशेषतः तालिबान आता पूर्वीसारखी कट्टर राहिली नाही, असं म्हणत ती संघटना सोडून येणाऱ्या अफगाण लोकांवर त्यांचं विशेष लक्ष असतं.

ISKP संघटना किती कट्टर?

गेल्या काही वर्षांत बहुतांश आत्मघाती हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेटच्या खुरासान शाखेने घेतली आहे.

मुलींच्या शाळा, रुग्णालयं इतकंच नव्हे तर प्रसूतीगृह अशा ठिकाणीही या संघटनेने हल्ले घडवून आणले.

फोटो स्रोत, Getty Images

प्रसूतीगृहावर केलेल्या हल्ल्यात कट्टरवाद्यांनी गरोदर महिला आणि तिथल्या परिचरिकांवर गोळीबार केला होता.

जगभरातील पाश्चिमात्य, आंतरराष्ट्रीय आणि मानवतावादी ठिकाणांना लक्ष्य करणं हा ISIS-K संघटनेचा प्रमुख उद्देश आहे.

त्यासाठी इस्लामिक स्टेटने बनवलेल्या जागतिक नेटवर्कचा भाग म्हणून ही संघटना ओळखली जाते.

ते कुठे सक्रिय आहेत?

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नंगरहार येथे ISIS-K चं तळ आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान होणारा अंमली पदार्थांचा व्यापार आणि मानव तस्करी याच मार्गावरून होते, असं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, AFP

कधी काळी इस्लामिक स्टेटकडे सुमारे 3 हजार कट्टरवादी सदस्य होते.

पण तालिबान, अफगाण सुरक्षा दल आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सेनेविरुद्ध झालेल्या चकमकींमध्ये या संघटनेला मोठं नुकसान सहन करावं लागलं.

तालिबानशी त्यांचा संबंध आहे का?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

ढोबळमानाने उत्तर द्यायचं तर 'हो.'

हक्कानी नेटवर्क या तिसऱ्या संघटनेमार्फत या दोन्ही संघटनांचे संबंध आहेत, असं म्हटलं जातं.

त्यातही ISIS-K आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात तर खूपच घनिष्ट संबंध आहेत, असं तज्ज्ञ सांगतात.

याच पार्श्वभूमीवर त्यांचा तालिबानसोबत जवळचा संबंध जोडला जातो.

तालिबानने काबूलच्या सुरक्षेची जबाबदारी खलील हक्कानीकडे दिली आहे.

अमेरिकेने खलील हक्कानीवर 50 लाख डॉलरचं बक्षीस ठेवलं आहे.

एशिया पॅसिफिक फाऊंडेशनचे डॉक्टर सज्जन गोहेल अफगाणिस्तानातील कट्टरवादी संघटनांवर कित्येक वर्षांपासून लक्ष ठेवून आहेत.

ते सांगतात, "2019 पासून ते 2021 पर्यंत अनेक प्रमुख हल्ल्यांमध्ये ISIS-K, हक्कानी नेटवर्क आणि पाकिस्तानात सक्रिय असलेल्या कट्टरवादी संघटनांची संयुक्त भूमिका होती."

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवला तेव्हा पुल-ए-चरकी तुरुंगातून मोठ्या संख्येने कैद्यांची मुक्तता केली.

यामध्ये इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा संघटनेचे कट्टरवादी मोठ्या संख्येने होते.

पण ISIS-K चे तालिबानसोबत बरेच मतभेद आहेत.

तालिबानने जिहाद आणि रणांगणावरील युद्धाचा मार्ग सोडून कतारची राजधानी दोहा येथे महागडे आणि आलीशान हॉटेलांमध्ये जाऊन सौदेबाजी केली, असा आरोप ISIS-K कडून केला जातो.

इस्लामिक स्टेटचे कट्टरवादी हेच तालिबानी राजवटीसाठी सर्वात मोठं आव्हान म्हणून पुढे येऊ शकतात, अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)