INDvsENG : ओव्हल कसोटीत भारताचा इंग्लंडवर 157 धावांनी दिमाखदार विजय

विराट कोहली

फोटो स्रोत, PRESS ASSOCIATION

लंडनच्या ओव्हल मैदानावर येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध 157 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

भारताने दिलेलं 368 धावांचं आव्हान यजमान इंग्लडला पेलवलं नाही. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ 210 पर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे या सामन्यात भारताने 157 धावांनी विजय मिळवला आहे.

नाणेफेक गमावून पहिल्या डावात फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने केवळ 191 धावा फलकावर लावल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने 290 धावा उभारल्या.

पहिल्या डावातच इंग्लंडला 99 धावांची आघाडी मिळाल्यामुळे भारतीय संघ सुरुवातीपासूनच बॅकफूटवर गेला होता. पण रोहित शर्माचं शतक चेतेश्वर पुजारा, शार्दूल ठाकूर आणि ऋषभ पंतसह कर्णधार विराट कोहली, सलामीवीर के. एल. राहुल यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने 466 धावांचा डोंगर उभारला. यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 367 मजबूत धावांचं आव्हान ठेवण्यात भारताला यश आलं.

धावांचा पाठलाग करताना इंग्लंडनेही चांगली सुरुवात केली होती. एकवेळ भारत पराभूत होतो की काय अशी स्थिती या सामन्यात निर्माण झाली होती. पण भारतीय गोलंदाजांनी जीव की प्राण एक करून टिच्चून मारा केला.

भारतीय गोलंदाजीसमोर एकही फलंदाज टिकाव धरू न शकल्याने इंग्लंडचा संघ 210 धावांवर गारद झाला.

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींसह चौघांना कोरोना व्हायरसची लागण

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह झाली असून शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील चार जणांना अलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

शास्त्री यांच्यासह बोलिंग प्रशिक्षक बी. अरूण, फिल्डिंग प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजियोथेरपिस्ट नितिन पटेल यांना खबरदारीचा उपाय म्हणून अलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रकाद्वारा दिली आहे.

टीम इंडियासोबत हे चौघंही सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सध्या सुरू आहे. आज या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आहे.

काल (4 सप्टेंबर) संध्याकाळी शास्त्री यांची लॅटरल फ्लो अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्या जवळच्या संपर्कात असल्यानं अन्य तिघांनाही अलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

चौघांचीही RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. सध्या चौघंही टीम इंडियाच्या हॉटेलमध्येच आहेत. वैद्यकीय सल्लागारांनी पुढची माहिती दिल्याशिवाय त्यांना पुढे प्रवास करता येणार नाही.

टीम इंडियाच्या बाकीच्या सदस्यांची लॅटरल फ्लो तपासणी करण्यात आली. संध्याकाळी आणि त्यानंतर सकाळी झालेल्या तपासणीत निगेटिव्ह आल्यावरच बाकी सदस्यांना ओव्हल टेस्टच्या चौथ्या दिवशी खेळण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं बीबीसीआयचे मानद सचिव जय शहा यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)