गॉबेल्की टेपे: जगातलं सर्वांत जुनं मंदिर, 11 हजार वर्षांपूर्वीच्या या मंदिरामुळे उलगडू शकतो नवा इतिहास

  • अँड्य्रू करी
  • बीबीसी ट्रॅव्हल
गॉबेल्की टेपे

फोटो स्रोत, Getty Images

तुर्कस्तानातील गॉबेक्ली टेपे ही रचना प्रागैतिहासिक लोकांनी स्टोनहेन्जच्याही सहा हजार वर्षं आधी बांधली होती आणि तिच्यामुळे मानवी संस्कृतीच्या कहाणीला नव्याने आकार मिळतो आहे.

जर्मन पुरातत्त्वज्ञ क्लॉस श्मिट यांनी 25 वर्षांपूर्वी तुर्कस्तानातील एका डोंगरमाथ्यावर उत्खनन सुरू केलं, तेव्हा आपल्याला सापडलेलं बांधकाम असाधारण व अनन्यसाधारण असल्याची त्यांची खात्री पटली होती.

उर्फाजवळ चुनखडीच्या एका पठारावर 'गॉबेक्ली टेपे' ही रचना आहे. 'पोट टेकडी' अशा अर्थी वापरला जाणारा हा तुर्की शब्द आहे. या ठिकाणी श्मिट यांना वीसहून अधिक वर्तुळाकार दगडी आवारं आढळली.

यातील सर्वांत मोठं आवार वीस मीटरचं होतं, त्यात मधोमध सूक्ष्म कोरीवकाम केलेला 5.5 मीटर उंचीचे खांब होते. या कोरीव दगडी खांबांवर भयकारक, शैलीदार मानवी प्रतिमा आहेत, त्यांनी हाताची दगडी घातलेली असून कोल्ह्याच्या साच्यातील पट्टे घातलेले आहेत. या खांबांचं वजन 10 टनांपर्यंत आहे.

प्राणी माणसाळवलेले नव्हते किंवा कुंभारकामाचा शोध लागला नव्हता, अशा काळात- म्हणजे धातूची अवजारं तर दृष्टिपथातही नव्हती अशा काळात इतकं कोरीव काम करणं आणि खांब उभारणं प्रचंड तांत्रिक आव्हानाचं ठरलं असणार. या रचना 11 हजार वर्षांपूर्वीच्या किंवा त्याही आधीच्या आहेत. निवाऱ्यासाठी नव्हे, तर दुसऱ्या कोणत्यातरी उद्देशाने झालेलं हे बांधकाम मानवतेच्या इतिहासातील सर्वांत जुनी रचना ठरलं आहे.

श्मिट यांनी दशकभर काम केल्यानंतर एक लक्षणीय निष्कर्ष काढला. मी 2007 साली उर्फामध्ये त्यांना भेटलो तेव्हा (जर्मन आर्किऑलॉजिकल इन्स्टिट्यूटसोबत काम करणारे) श्मिट म्हणाले की, मानवाने शेती का सुरू केली आणि कायमस्वरूपी वसाहतींमध्ये राहायची सुरुवात का झाली, याचा उलगडा करून मानवी सभ्यतेच्या कहाणीचं पुनर्लेखन करण्यासाठी गोबेक्ली टेपेची मदत होऊ शकते.

श्मिट व त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेली दगडी अवजारं व इतर पुरावे पाहता, ही वर्तुळाकार आवारं शिकारी- संकलक मानवांनी बांधल्याचं दिसतं. या ठिकाणी सापडलेली प्राण्यांची लाखो हाडं वन्य प्रजातींची आहेत, आणि धान्यं अथवा इतर वनस्पतींचा पुरावा सापडला नाही.

हे शिकारी-संकलक लोक 11,500 वर्षांपूर्वी दगडी हत्यारांनी गॉबेक्ली टेपेवरील T आकाराचे खांब कोरण्यासाठी इथे आले असावेत. त्यांनी तिथल्या चुनखडीच्या पठाराचा खाणीसारखा वापर केला असावा, असं श्मिट यांना वाटलं.

हे खांब कोरण्याचं आणि वाहून नेण्याचं काम प्रचंड कष्टप्रद ठरलं असेल, पण सकृत्दर्शनी वाटतं तितकंही ते अवघड नसेल. या टेकडीवर आढळणाऱ्या नैसर्गिक चुनखडीच्या स्तरांद्वारे या खांबांवर कोरीव काम करण्यात आलेलं आहे. त्यावेळी सापडणाऱ्या टणक दगडाने किंवा अगदी लाकडी अवजारांनीही चुनखडीच्या तुलनेने मऊ पृष्ठभागावर कोरीव काम करता येतं.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

या टेकडीवरील चुनखडीचे भाग 0.6 मीटर ते 1.5 मीटर जाडीचे आडवे पट्टे आहेत, त्यामुळे प्राचीन कलाकारांना त्यातील दोन्ही बाजूंचा जास्तीचा भाग तेवढा कापावा लागला असेल, खाली काही हात लावावा लागला नसेल, असं या ठिकाणी उत्खनन केलेल्या पुरातत्त्वज्ञांना वाटतं. खांबांचं कोरीव काम पूर्ण केलं की ते दोऱ्यांच्या, ओंडक्यांच्या व मुबलक मनुष्यबळाच्या सहाय्याने काही मीटरांवरच्या डोंगरमाथ्यावर नेण्यात आले असतील.

या प्रदेशात पसरलेल्या लहान व भटक्या टोळ्यांना त्यांच्या श्रद्धांमुळे डोंगरमाथ्यांवरील या बांधकाम प्रकल्पांमध्ये सहभागी व्हायची प्रेरणा मिळाली असावी. त्या वेळी मोठ्या मेजवान्या होऊन नंतर या टोळ्या पुन्हा विखरून जात असतील, असं श्मिट यांना वाटलं. हे ठिकाणी विधीकेंद्र होतं, कदाचित दफनविधी किंवा मृत्यूशी संबंधित काही विधींसाठी म्हणून त्याचा वापर होत असेल, पण वसाहत म्हणून हा भाग वापरात नव्हता, असं श्मिट यांचं प्रतिपादन होतं.

हा बराच मोठा दावा आहे. मानवी समाजांमध्ये पीक घ्यायची सुरुवात झाली आणि प्राणी माणसळवले जाऊ लागले, तेव्हा- म्हणजे निओलिथिक स्थित्यंतर झालं तेव्हा- व्यामिश्र विधी व संघटित धर्म उगम पावल्याचं पुरातत्त्वज्ञ दीर्घ काळ मानत आले आहेत. वरकड अन्न उपलब्ध झाल्यावर माणसांना अधिकची संसाधनं विधींसाठी व स्मारकांसाठी वापरणं शक्य झालं.

गॉबेक्ली टेपेमधील रचनांच्या शोधामुळे हा कालानुक्रम उलटापालटा झाला, असं श्मिट मला म्हणाले. या ठिकाणी सापडलेली दगडी अवजारं निओलिथिकपूर्व काळातील असल्याचं ठामपणे म्हणता येतं. या जागेवर पहिल्यांदा उत्खनन झालं, त्याला 25हून अधिक वर्षं उलटून गेल्यानंतरही पिकांचा किंवा पाळीव प्राण्यांचा पुरावा सापडलेला नाही. या जागेवर कोणीही पूर्ण वेळ राहत होतं, असं श्मिट यांना वाटत नाही. हे 'टेकडीवरचं कॅथेड्रल होतं', असं ते म्हणाले.

त्यांचं म्हणणं खरं असेल तर व्यामिश्र विधी व सामाजिक संघटन मानवी वसाहतींच्या व शेतीच्या पूर्वीच उगम पावल्याचं म्हणावं लागेल. हे महाकाय खांब कोरण्यासाठी व हलवण्यासाठी संकलक भटक्या टोळ्यांना एकत्र यावं लागलं, त्यामुळे एक हजार वर्षांच्या कलावधीनंतर लोक पुढचं पाऊल उचलण्यासाठी उद्युक्त झाले: ते नियमितपणे मोठे मेळावे घेऊ लागले, अन्नपुरवठ्याचं अनुमान बांधता येणं ही लोकांची गरज झाली आणि ते पिकांवर व पाळीव प्राण्यांवर अवलंबून राहू लागले. विधी व धर्म यांमुळे निओलिथिक क्रांतीला चालना दिल्याचं यावरून दिसतं.

दुसऱ्या दिवशी मी पहाटेपूर्वी श्मिट यांच्यासोबत डोंगरमाथ्यावर गेलो. त्यांच्या सोबत जर्मन पुरातत्त्वज्ञांचा आणि स्थानिक गावातील कामगारांचा चमू होता. त्या ठिकाणचे खांब पाहून मी स्तंभित झालो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

11,500 वर्षांपूवी माणसाने एकत्र येत T च्या आकाराचे हे खांब दगडी हत्यारांनी खोदून काढले असावेत, असा अंदाज आहे.

श्मिट यांनी गॉबेक्ली टेपेसंबंधीचे अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर निओलिथिक पुरातत्त्वशास्त्रातील तज्ज्ञांच्या छोटेखानी विश्वात त्याची बरीच चर्चा झाली. पण तरीही हे ठिकाण काहीसं विस्मतृतीत गेल्यासारखंच राहिलं होतं. उत्खननस्थळाच्या भोवती तात्पुरत्या स्वरूपाची गंजलेल्या पत्र्याची छपरं लावलेली होती आणि डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी खड्ड्यांनी व धुळीने भरलेले रस्ते होते.

या जागेबद्दल व तिथल्या खांबांबद्दल श्मिट यांनी 2000च्या दशकाच्या मध्यात त्यांचे निष्कर्ष सादर केले, तेव्हा त्यांचे सहकारी व पत्रकार चकित झाले. हे धर्माचं जन्मस्थान आहे, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. डेर स्पीजल या जर्मन नियतकालिकाने गॉबेक्ली टेपेमधील सुपीक गवताळ प्रदेशाची तुलना 'गार्डन ऑफ ईडन'शी केली.

लवकरच जगभरतील लोक गॉबेक्ली टेपे पाहण्यासाठी येऊ लागले. दशकभरात या डोंगरमाथ्याचं रूप पूर्णतः पालटून गेलं. जवळच्या सिरियामध्ये झालेल्या यादवीने 2012 साली या भागातील पर्यटन विस्कळीत केलं, पण त्याआधी कित्येक पर्यटक कुतूहल वाटून इथे येत होते. काहींनी या रचनेला जगातील पहिलं मंदिर असं संबोधलं होतं.

गेल्या पाच वर्षांमध्ये या डोंगरमाथ्यामध्ये पुन्हा बदल होतो आहे. आता चांगले रस्ते झाले आहेत, कार- पार्किंगची सोय आहे आणि जगभरातील पर्यटकांच्या राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. तिथल्या मध्यवर्ती स्मरणरचनांभोवती संरक्षक कवच म्हणून ठेवण्यात आलेल्या गंजलेल्या पत्र्यांऐवजी 2017 साली अत्याधुनिक फ्रॅब्रिक-अँड-स्टील प्रकारातील शेड लावण्यात आल्या. मध्य उर्फामध्ये 2015 साली उभं राहिलेलं 'शान्लउर्फा आर्किऑलॉजी अँड मोझाइक म्युझियम' हे तुर्कस्तानातील एक सर्वांत मोठं संग्रहालय आहे. गॉबेक्ली टेपेमधील सर्वांत मोठ्या आवाराची व तिथल्या T आकारातील खांबांची पूर्ण आकारातील प्रतिकृती या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना हे खांब जवळून पाहता येतात व कोरीव कामही निरखता येतं.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये 2018 साली गॉबेक्ली टेपेची नोंद झाली. तुर्कस्तानी पर्यटन अधिकाऱ्यांनी 2019 हे 'गॉबेक्ली टेपे' वर्षं घोषित केलं आणि या स्थळाला आपल्या जागतिक प्रसार अभियानामध्ये मध्यवर्ती स्थान दिलं.

जेन्स नॉट्रोफ यांनी 2000च्या दशकात विद्यार्थी म्हणून या ठिकाणी कामाला सुरुवात केली होती. आता ते एका जर्मन पुरातत्त्व संस्थेसोबत कार्यरत आहेत. 'डोंगरमाथ्यावरचं हे एक दुर्गम ठिकाण होतं, ते मला अजूनही आठवतं. आता ते पूर्णपणे बदलून गेलं आहे,' असं नॉट्रोफ सांगतात. धुळीने माखलेल्या डोंगरमाथ्यापासून पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण ठरलेल्या आजच्या गॉबेक्ली टेपेचा हा प्रवास श्मिट यांना पाहायला मिळाला नाही.

2014 साली त्यांचं निधन झालं. पण त्यांच्या शोधांमुळे निओलिथिक स्थित्यंतरामध्ये जागतिक पातळीवर रुची निर्माण झाली. अलीकडच्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी सापडलेल्या नवीन तपशिलांमुळे आणि आधीच्या उत्खननांच्या निष्कर्षांची सूक्ष्म छाननी होत राहिल्यामुळे खुद्द श्मिट यांचे या स्थळासंबंधीचे आरंभिक अर्थबोधही उलटेपालटे झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

गॉबेल्की टेपेच्या उत्खननात सापडलेल्या दगडी वस्तू

श्मिट यांच्या हयातीत कधीच झालं नव्हतं इतकं खोलवर उत्खनन आता झालं आहे. जर्मन पुरातत्त्व संस्थेमधील अभ्यासक ली क्लेअर यांच्या चमूने या ठिकाणी अनेक मीटर खोलवर उत्खनन केलं. "सर्वांत खालच्या थरांचा व तिथल्या साठ्यांचा तपास करण्याची दुर्मीळ संधी आम्हाला मिळाली," असं क्लेअर सांगतात.

क्लेअर व त्यांच्या सहकाऱ्यांना तिथे जे काही सापडलं, त्यामुळे प्रागैतिहासिक काळाची कहाणी पुन्हा एकदा नव्याने लिहिली जाण्याची शक्यता आहे. या संशोधकांना घरांचे आणि वर्षभर सुरू असणाऱ्या वसाहतींचे पुरावे सापडले. म्हणजे विशेष प्रसंगी भेट देण्यापुरतं एक दूरचं मंदिर, एवढंच गॉबेक्ली टेपेचं स्थान नव्हतं, तर इथे मोठ्या खास इमारती असणारं जिवंत गाव होतं, असं या पुराव्यांवरून सूचित होतं.

पावसाचं पाणी गोळा करण्यासाठी इथे कालवे व कुंड असल्याचंही संशोधकांना सापडलं. या कोरड्या डोंगरमाथ्यावर मानवी वसाहत असण्याचा हा कळीचा पुरावा होता. स्वैपाकासाठी व बीअर उत्पादनासाठी धान्यावर प्रक्रिया करण्याकरता लागणारी दळणाची हजारो अवजारं या उत्खननात सापडली.

"गॉबेक्ली टेपे हे अजूनही एक अनन्यसाधारण, विशेष स्थळ आहे, पण इतर ठिकाणच्या उत्खननांमधून आपल्याला माहिती झालेल्या मर्मदृष्टीशी इथल्या नवीन शोधांची सांगड बसते आहे," असं क्लेअर सांगतात. "कायमस्वरूपी पेशे असणारी ही पूर्ण मानवी वसाहत होती. यामुळे या स्थळासंबंधीचं आमचं पूर्ण आकलन बदलून गेलं."

दरम्यान, उर्फाभोवतीच्या खडकाळ गावांमध्ये काम करणाऱ्या तुर्कस्तानी पुरातत्त्वज्ञांना अशाच प्रकारचे T आकाराचे स्तंभ असणारी डझनभर डोंगरमाथ्यांवरील स्थळं सापडली आहेत. या रचनांचा काळही गॉबेक्ली टेपेच्या आसपासचाच आहे.

"हे अनन्यसाधारण मंदिर नाही," असं एका ऑस्ट्रियन पुरातत्त्व संस्थेमधील संशोधक बार्बरा हॉरेज्स सांगतात. इथल्या ताज्या संशोधनामध्ये सहभागी नसणाऱ्या हॉरेज्स निओलिथिक कालखंडासंदर्भातील तज्ज्ञ आहेत. "यामुळे ही गोष्ट अधिक रोचक व उत्साहवर्धक ठरते." या भागाला 'आग्नेय तुर्कीमधील पिरॅमिड' असं संबोधता येईल, असं तुर्कस्तानी संस्कृती व पर्यटन मंत्री मेहमत नुरी इरसॉय म्हणाले.

गॉबेक्ली टेपे म्हणजे शेतीच्या दिशेने स्थित्यंतराला चालना देणारा शतकानुशतकं चाललेला बांधकाम प्रकल्प होता, असं आधी मानलं गेलं. परंतु, वास्तविक आजूबाजूचं जग बदलत असताना आपल्या नष्टप्राय जीवनशैलीला कवटाळून ठेवण्याचा शिकारी-संकलक टोळ्यांचा प्रयत्न या स्थळाच्या निमित्ताने पाहायला मिळतो, असं क्लेअर व इतरांना आता वाटतं. याच्या आसपासच्या ठिकाणचे लोक प्राणी पाळण्यासंबंधी व पिकं घेण्यासंबंधी प्रयोग करत असल्याचे पुरावेही मिळाले आहेत. 'पोट टेकडी'वरचे लोक मात्र या प्रयोगांना प्रतिकार करत असावेत.

या ठिकाणचं दगडी कोरीव काम हा महत्त्वाचा संकेत आहे. कोल्हे, बिबटे, साप व गिधाडं यांचं तपशीलवार कोरीव काम गॉबेक्ली टेपेमधील खांबांवर व भिंतींवर पाहायला मिळतं. "ही केवळ चित्रं नाहीत, तर कथनं आहेत. तत्कालीन गटांना सोबत ठेवण्यासाठी व सामायिक ओळख निर्माण करण्यासाठी या कथनांचं अतिशय महत्त्वाचं स्थान राहिलं असणार," असं क्लेअर म्हणतात.

मी 15 वर्षापूर्वी या जागेवर पहिल्यांदा फिरलो, तेव्हा खूप दूरचं काहीतरी पाहिल्यासारखं मला जाणवत होतं.

स्टोनहेन्जच्याही सहा हजार वर्षं आधी गॉबेक्ली टेपेचं बांधकाम झालं आणि तिथल्या कोरीव कामाचा अचूक अर्थ लागणं अशक्यच आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

गॉबेल्की टेपेच्या या वर्तुळाकार स्थापत्यामुळे मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या वर्षांबद्दल नवीन माहिती समोर येतेय.

गॉबेक्ली टेपेच्या प्रचंड आकर्षणशक्तीचं हेसुद्धा एक कारण आहे. दशकभरापूर्वी बहुतांश लोकांनी या ठिकाणाचं नाव ऐकलंही नसेल, पण आता तिथे हजारो पर्यटक येतात. मुळात या रचना का बांधण्यात आल्या, हे समजून घेण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. प्रत्येक नवीन शोधासोबत या ठिकाणाबद्दलचं व मानवी सभ्यतेविषयीचं आपलं आकलन बदलतं आहे.

"नवीन काम क्लॉकस श्मिट यांच्या गृहितकांना उद्ध्वस्त करणारं नाही, तर त्यांच्या खांद्यावर उभं राहून नवीन संशोधन सुरू आहे," असं हॉरेज्स सांगतात. "माझ्या मते, यातून प्रचंड ज्ञानप्राप्ती झाली आहे. त्याचा अर्थबोध बदलतो आहे, पण शेवटी विज्ञान म्हणजे हेच तर असतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)