लैंगिकता स्वीकारण्यामध्ये महिला पुरुषांपेक्षा खुल्या विचारांच्या कशा झाल्या?

  • जेसिका क्लेन
  • बीबीसी वर्कलाईफ
प्राईड फ्लॅगसोबत महिला

फोटो स्रोत, Getty Images / BALINT PORNECZI

लैंगिकतेबद्दल विचार करण्याचा आपला दृष्टीकोन आता बदलत आहे. पूर्वी सर्वांना परिचित सप्तरंगी असा एकमेव प्राईड फ्लॅग होता, तिथं आता वैविध्य दर्शवणारे अनेक रंगीबेरंगी झेंडे पाहायला मिळतात.

लोक लैंगिकतेबद्दल जुने विचार मागे सोडून अधिक मोकळेपणानं बोलू लागले आहेत. अगदी यापूर्वी जे स्वतःची लैंगिक ओळख लपवत होते तेही आता मुख्य प्रवाहातील चर्चेत सहभागी होतात. अशा प्रकारच्या खुल्या संवादामुळं लैंगिकतेचा विषय हा अगदीच कठोर न राहता, त्यात एक सहजपणा किंवा मोकळेपणा आला आहे.

पण नवीन माहितीचा विचार करता हा बदल एका गटामध्ये अधिक असल्याचं पाहायला मिळतं. अनेक देशांमध्ये आता पूर्वीच्या तुलनेत लैंगिकतेतील बदल स्वीकारण्यामध्ये महिलांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे.

पण, दोन्हीमधील या विसंगतीचं नेमकं कारण काय? अनेक तज्ज्ञांच्या मते, या बदलामागं अनेक कारणं आहे. त्यामुळं सामाजिक वातावरणातही बदल पाहायला मिळत आहे. तसंच महिलाही आता लैंगितेच्या आधारावर ठरवलेल्या त्यांच्या भूमिका आणि ओळखीची बंधनं तोडत आहेत.

पण ही नवी माहिती समोर आल्यानंतरही एक प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. तो म्हणजे, महिला असो वा पुरुष त्यांच्यासाठी भविष्यात सेक्श्युअल फ्लुडिटी म्हणजे आवड किंवा लैंगिकतेबाबतची ओढ याबाबत लवचिक (वेगळी लैंगिक ओळख स्वीकारण्याची मानसिकता) असण्याचा नेमका अर्थ काय असू शकतो?

लक्षणीय बदल

सीन मॅसी आणि त्यांचे सहकारी न्यूयॉर्कच्या बिंघमटन ह्युमन सेक्श्युयालिटीज रिसर्च लॅबमध्ये सुमारे दशकभरापासून लैंगिक वर्तनासंदर्भात अभ्यास करत आहेत.

प्रत्येक अभ्यासादरम्यान त्यांनी सहभागी झालेल्यांकडून त्यांचं सेक्श्युअल ओरिएंटेशन (लैंगिक ओळख किंवा ओढ) आणि लिंग याबाबत माहिती जाणून घेतली.

काळाबरोबर यासंदर्भातले आकडे कशा पद्धतीनं बदलत गेले, याकडं त्यांनी आधी लक्ष दिलं नाही. पण, लैंगिक आकर्षणाचा विचार करता त्यांच्याकडं माहितीचा मोठा खजिनाच जणू उपलब्ध असल्याचं मॅसी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नुकतंच लक्षात आलं.

"आपण दहा वर्षे अभ्यास करून एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली आहे. या सर्व माहितीचा अभ्यास करून आपण यात काही खास आढळतं का, याचा अभ्यास का करत नाही?" असा प्रश्न मॅसी यांना पडला.

मॅसी हे बिंघमटन विद्यापीठातील महिलांच्या लिंग आणि लैंगिकता याविषयीच्या अभ्यासक्रमाचे सहयोगी प्राध्यापक आहेत.

फोटो स्रोत, Getty Images / SOPA Images

अभ्यासावरून त्यांच्या लक्षात आलं की, 2011 ते 2019 दरम्यानच्या काळात महाविद्यालयांत जाणाऱ्या महिलांची लैंगिक ओळख 'हेट्रोसेक्श्युआलिटी' म्हणजे, केवळ विरुद्धलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण याशिवाय इतर लैंगिक ओळखीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदलत चालली होती.

2011 मध्ये 77 टक्के महिलांनी केवळ पुरुषांकडे आकर्षित होत असल्याचं सांगितलं होतं. 2019 मध्ये हे प्रमाण 65 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं अभ्यासावरून त्यांच्या लक्षात आलं. ही उल्लेखनीय अशी घट होती.

याच काळात केवळ पुरुषांबरोबर शरीरसंबंध ठेवणाऱ्या महिलांचं प्रमाणंही कमी झालं होतं. पुरुषांशी तुलना करता या काळात त्यांच्या लैंगिक आकर्षणामध्ये मात्र फारसा फरक झालेला आढळून आला नाही. जवळपास 85 टक्के पुरुषांनी महिलांप्रती आकर्षित होत असल्याचं सांगितलं होतं.

90 टक्के पुरुषांनी केवळ महिलांबरोबरच शरीरसंबंध ठेवत असल्याचं सांगितलं होतं. हा आकडा या दहा वर्षात फारसा बदलला नाही.

ब्रिटन आणि नेदरलँड्ससह जगभरात आणखीही काही सर्वेक्षणं झाली, त्यातही जवळपास अशा प्रकारचेच निष्कर्ष समोर आले. या सर्वेक्षणांमध्ये समलैंगिक व्यक्तीकडे आकर्षित होत असल्याचं सांगणाऱ्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण हे अधिक होतं.

सत्ता आणि स्वातंत्र्य

"एखाद्या ठराविक निष्कर्षावर पोहोचण्याच्या दृष्टीनं यात प्रचंड गुंतागुंत आहे," असं अमेरिकेतील मॅसाच्युसेट्सच्या स्प्रिंगफिल्ड कॉलेजमधील प्राध्यापिका एलिजाबेथ मॉर्गन म्हणाल्या.

पण पुरुष आणि स्त्री यांच्या लैंगिक भूमिका आणि दोन्हींमध्ये कशाप्रकारे बदल झाला किंवा झाला नाही, हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक ठरू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images /Long Visual Press

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

मॅसी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रामुख्याने स्त्रीवाद आणि महिला चळवळ यातील प्रगती यामुळं अशा प्रकारचा सांस्कृतिक बदल आढळून आला. या दोन्हीमुळे प्रामुख्यानं गेल्या काही दशकांमध्ये सामाजिक राजकीय दृष्टीकोनामध्ये उल्लेखनीय बदल झालेला आहे.

मात्र या बदलाचा पुरुष आणि महिलांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम झाला आहे.

"लैंगिक भूमिकेच्या दृष्टीनं विचार करता पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रगती झालेली आहे," असं मॅसी म्हणाले.

त्याचवेळी, लोकांना लैंगिक ओळख समजण्यासाठी आणि जाहीर करण्यासाठी एलजीबीटीक्यू+ (लेस्बियन, गे, बायसेक्श्युअल, ट्रांसजेंडर आणि क्वीर) चळवळीचा मोठा फायदा झाल्याचंही ते मान्य करतात.

लैंगिक ओळखीतील बदल स्वीकारण्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण अधिक असण्यामागं स्त्रीवाद आणि महिला चळवळ यांची मोठी भूमिका असल्याचं मॅसी म्हणतात. त्याचं कारण म्हणजे जुन्या काळापासून चालत असलेल्या रुढींची बंधन तोडता यावी यासाठी पुरुषांच्या संदर्भात अशी चळवळ उभीच राहिली नाही, असंही ते म्हणाले.

"50 वर्षांपूर्वी महिलांनी पुरुषांशी लग्न करून संसार करणे याला पर्यायच नव्हता. त्यामागचं कारण म्हणजे पुरुषानं महिलांना सर्वकाही पुरवावं असं सांगितलं गेलं होतं," असं एलिजाबेथ मॉर्गन म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images

अशा परिस्थितीमध्ये महिलांनी पारंपरिक लैंगिकतेच्या (केवळ पुरुषांबरोबर शरिरसंबंध) बेड्या तोडल्या तर त्याकडं पुरुषांच्या लैंगिकतेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या रुढी परंपरांचं उल्लंघन समजलं जात होतं.

या दरम्यानच्या काळात महिला अधिक स्वातंत्र्य मिळवण्यात यशस्वी ठरल्या, मात्र पुरुषांची भूमिका जवळपास तशीच कायम राहिली. कारण समाजाची सत्ता ही त्यांच्याच ताब्यात होती.

"ही सत्ता राखण्यासाठी पुरुषांना पुरुषार्थ दर्शवणारी भूमिका कायम राखणं गरजेचं होतं आणि हेट्रोसेक्श्युयालिटी म्हणजे विरुद्ध लिंगाप्रती आकर्षण हा त्या पुरुषार्थाचाच एक भाग आहे," असं एलिजाबेथ मॉर्गन सांगतात.

सेक्स कोच आणि एज्युकेटर वायलेट टर्निंग यांनी, पुरुषांची सत्ता असलेल्या समाजातही आपसांत शरीरसंबंध ठेवणाऱ्या महिलांच्या संदर्भात 'फेटिसाइझेशन'चाही उल्लेख केला.

म्हणूनच चुकीच्या कारणांसाठी असली तरी, यामुळं महिलांमध्ये समलैंगिक आकर्षणाच्या मुद्याला अधिक प्रमाणात सामाजिक मान्यता मिळाली.

लोकांना दोन पुरुषांचे आपसांतील लैंगिक संबंध मान्य करणं किंवा पचवणं हे अधिक कठीण ठरतं. 2019 मध्ये 23 देशांमध्ये समलैंगिक महिला आणि पुरुष यांच्याप्रती असलेल्या वर्तनासंदर्भात एक संशोधन करण्यात आलं. त्यात लेस्बियन महिलांच्या तुलनेत गे पुरुषांबद्दल नापसंती दर्शवणाऱ्यांचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलं होतं.

मुक्तसंवाद

काळाबरोबर महिलांसाठी लैंगिकतेबाबत आवड आणि नावड याविषयी चर्चा करण्यासाठीच्या ठिकाणांमध्येही वाढ झाली आहे.

अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ युटामध्ये मानसशास्त्राच्या प्राध्यापिका लिझा डायमंड यांनी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला लैंगिक आकर्षणाबाबत अभ्यास सुरू केला होता.

त्यांच्या या अभ्यासात पुरुषांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. यामध्ये सहभागी झालेले अनेक सदस्य हे 'गे सपोर्ट ग्रुप' (समलैंगिकांना पाठिंबा असलेले) मधील आणि बहुतांश पुरुष सदस्य होते. त्यामुळं अभ्यासकांना पुरुषांचा शोध घेणं फार कठीण गेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, डायमंड यांना महिलांच्या लैंगिकतेविषयीदेखील माहिती मिळवायची होती.

त्यांनी सुमारे दहा वर्षे त्यासाठी अभ्यास केला. त्यात त्यांनी 100 महिलांकडून दर दोन वर्षांनी त्यांच्या लैंगिक आकर्षण आणि वर्तन याविषयी माहिती घेतली आणि त्याआधारे अभ्यास केला.

त्यांनी लिहिलेलं "सेक्श्युअल फ्लुडिटी: अंडरस्टँडिंग वुमन्स लव्ह अँड डिझायर" हे पुस्तक 2008 मध्ये प्रकाशित झालं. काही महिलांसाठी प्रेम आणि आकर्षण हे कशाप्रकारे लवचिक असतं आणि काळाबरोबर ते कशाप्रकारे बदलतं, याबद्दल त्यात चर्चा करण्यात आलेली होती. जुन्या विचारांपेक्षा हे विरोधाभासी होतं. पूर्वीच्या रुढींनुसार लैंगिक आकर्षणाबाबत चर्चा किंवा त्यात बदल होणं योग्य नव्हतं, आणि हा पुरुषकेंद्री दृष्टीकोन होता असं डायमंड म्हणतात.

ज्यावेळी त्यांचं हे पुस्तक प्रकाशित झालं, त्याच सुमारास सिंथिया निक्सन आणि मारिया बेलो अशा अमेरिकन सेलिब्रिटींनी सार्वजनिकरित्या समलैंगिक आकर्षणाबाबत कबुली दिली होती. त्यापूर्वी त्यांनी पुरुषांना डेट केलं होतं.

त्यानंतर ओप्रा विन्फ्रे यांनी डायमंड यांना महिलांच्या लैंगिक आकर्षण किंवा लैंगिकतेत होणारा बदल याबाबत चर्चा करण्यासाठी शोमध्ये आमंत्रित केलं. त्यामुळं ही संकल्पना आणि अशा वर्तनाबाबत मुख्य प्रवाहामध्ये अधिकृतरित्या चर्चा व्हायला सुरुवात झाली.

महिलांची लैंगिक ओळख समजून घेण्यासाठी आता वेगळ्या भाषेचा वापर होत असल्याचं टर्निंग म्हणतात. त्यासाठी त्यांनी स्वतःचं एक उदाहरण दिलं आहे. 2007 मध्ये त्यांची लेस्बियन पार्टनर हायस्कूलमध्ये असताना 'गे स्ट्रेट अलायंस' (GSA) शी संलग्न होती. त्यात जोडप्यांसाठी गे किंवा स्ट्रेट (विरुद्ध लिंग असलेल्यांशी संबंध असलेले) हे दोनच पर्याय असल्यानं, याशिवाय वेगळी लैंगिक ओळख असलेल्यांसाठी जागाच नव्हती. महिलांच्या लैंगिकतेचं वर्णन करण्यासाठी यात शब्दच नव्हता. जाणूनबुजून या GSA मधून महिलांच्या समलैंगिकतेची ओळख करून देणारं L अक्षर वगळण्यात आलं होतं, असं त्या म्हणाल्या.

मात्र आता प्रत्येकासाठी वेगळी लैंगिक ओळख जाहीर करण्यासाठी (क्वीर) हा शब्द उपलब्ध आहे, कारण त्याला सगळीकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळं महिलांसह सर्वांच्या समावेशासह नवी भाषा समोर येत असल्याचं टर्निंग म्हणतात.

भविष्यात काय होणार?

सेक्श्युअल फ्लुडिटी ही संकल्पना आता पुरुषांच्या विश्वात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. टिकटॉकवर अनेक स्ट्रेट पुरुष हे व्हीडिओमध्ये गे पुरुषांच्या भूमिकेत झळकत असतात. न्यूयॉर्क टाइम्समधील एका लेखातील माहितीनुसार, त्यांच्या महिला फॉलोअर्सलाही ते आवडतं.

पुरुष सहजपणे हे सर्व करतात की केवळ सोशल मीडियावर लोकप्रियता किंवा व्हीडिओला क्लिक मिळवण्यासाठी करतात हे सांगणं कठीण आहे. मात्र तसं असलं तरीही पुरुषार्थासंबंधीची मानसिकता काही प्रमाणात बदलत असल्याचं या ट्रेंडवरून लक्षात येतं. त्यामुळं भविष्यात पुरुषांना लैंगिक ओळखीसंदर्भातील बदल स्वीकारण्यास आणि जाहीर करण्यास मदत होऊ शकते.

यासाठी लैंगिकतेबाबतचे बदल स्वीकारलेल्या महिलांचीदेखील मदत होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे महिला आता लैंगिक आवडींविषयी अधिक चर्चा करू लागल्या आहेत. त्यामुळं अधिक लोक लैंगिकतेबाबतच्या पर्यायांसंदर्भात चर्चा करू लागले आहेत.

आपल्या संस्कृतीनं या मुद्द्याभोवती लाजेचं एक कुंपण तयार केलं आहे. मात्र ते तोडण्यासाठी अशाप्रकारे वेगळी लैंगिक ओळख जाहीर करणाऱ्यांना सामाजिकदृष्ट्या स्वीकारलं जाणं गरजेचं हे, असं डायमंड म्हणतात. तसं झाल्यास अशा प्रकारे अधिक जण पुढे येऊन, त्यांची लैंगिक ओळख जाहीर करू शकतील.

"पुरुषांना हेट्रोसेक्श्युयालिटी आणि पुरुषार्थाच्या पारंपरिक चौकटीतून मुक्त करण्याचीही गरज आहे. तसं केलं तर पुरुषांच्या लैंगिक ओळखीसंदर्भात वेगळे किंवा महिलांसारखेच परिणामही पाहायला मिळू शकतात, असं मॅसी यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)