'Do Not Touch My Clothes' असं अफगाणी महिला का म्हणत आहेत?

डॉ. बहार जलाली यांनी सोशल मीडियावर ही मोहीम सुरू केली.

फोटो स्रोत, Dr Bahar Jalali

फोटो कॅप्शन,

डॉ. बहार जलाली यांनी सोशल मीडियावर ही मोहीम सुरू केली.

तालिबाननं विदयार्थिनींसाठी लागू केलेल्या नव्या ड्रेसकोडच्या विरोधात अफगाणिस्तानातील महिलांनी ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे.

#DoNotTouchMyClothes आणि #AfghanistanCulture या हॅशटॅगचा वापर करून अनेक महिला त्यांच्या रंगीबेरंगी आणि पारंपरिक कपड्यांतील फोटो शेअर करत आहेत. सोशल मीडियावर या मोहिमेची सुरूवात करणाऱ्या आणि त्यात सहभागी होणाऱ्या महिलांशी बीबीसीच्या सोदाबा हैदर यांनी चर्चा केली.

गुगलवर "Afghan traditional clothes" असं सर्च केल्यास विविध रंगांचे पारंपरिक कपडे पाहून तुम्हाला भारावून गेल्याची भावना निर्माण होईल. यापैकी प्रत्येक ड्रेस हा वेगळा, हातानं एम्ब्रायडरी केलेला, भरपूर डिझाईन असलेला, छातीच्या भागावर काळजीपूर्वकपणे लहान लहान आरसे लावलेला असा असतो.

अट्टन किंवा अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय नृत्यादरम्यान परिधान करण्यासाठी असलेला लांब आणि घेरदार स्कर्ट यांचा त्यात समावेश दिसतो. अफगाणिस्तानच्या ज्या भागातील या महिला असतील त्यानुसार काही महिलांनी एम्ब्रॉयडरी केलेल्या टोप्या तर काहींनी डोक्यावर भरपूर कलाकुसर केलेले हेडपीस वापरल्याचे आपल्याला दिसते.

अफगाणिस्तानात गेल्या 20 वर्षांपासून महिला कॉलेजमध्ये जाताना किंवा कामाला जाताना अशाच प्रकारचे कपडे परिधान करून जात होत्या. कधी कधी पुढे ट्राऊझरऐवजी जीन्स आल्या तर काही वेळा स्कार्फ खांद्यावर न राहता, डोक्यावर बांधण्यात आला.

पण गेल्या काही दिवसांत तालिबानला पाठिंबा दर्शवण्यासाठी समोर आलेल्या महिलांचे फोटो हे याच्या अगदी विरोधी चित्र दर्शवणारे आहेत. यात महिला लांब पूर्ण काळा बुरखा परिधान केलेल्या असून त्यात त्यांचा चेहरा आणि हातही झाकलेले दिसत आहेत. तालिबानच्या समर्थनार्थ काबुलमध्ये या महिला समोर आल्या होत्या.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

काबुल विद्यापीठात तालिबानच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आल. बुरखा घातलेल्या महिला यात सहभागी झाल्या होत्या.

तालिबानच्या नव्या कठोर मुस्लीम कायद्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी या महिलांनी रॅली काढली होती. या रॅलीचा एक व्हीडिओ समोर आला आहे. त्यात एक महिला,'' मेकअप करणाऱ्या किंवा अत्याधुनिक कपडे परिधान करणाऱ्या अफगाणी महिला या अफगाणी मुस्लीम महिलांचं प्रतिनिधीत्व करत नाहीत. आम्हाला शरियाच्या विरोधी आणि पाश्चिमात्य असे महिलांचे अधिकार नको आहेत," असं म्हणत होती.

मात्र जगभरातील अफगाणी महिलांनी लगेचच यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानातील अमेरिकन विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या माजी प्राध्यापिका डॉ. बहार जलाली यांनी सोशल मीडियावर पारंपरिक कपडे परिधान करण्याचा हक्क परत मिळवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यांनी त्यासाठी #DoNotTouchMyClothes आणि #AfghanistanCulture असे हॅशटॅग वापरले आहेत. या मोहिमेत जगभरातील अफगाण महिला सहभागी होत आहेत.

"अफगाणिस्तानची ओळख आणि सार्वभौमत्वावर हल्ला होत असून, ती सर्वात मोठी चिंता असल्यामुळं, या मोहिमेला सुरुवात केल्याचं, जलाली यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

तालिबानने महिलांना त्यांचे नोकरी आणि शिक्षणासाठीचे हक्क द्यावेत अशी मागणी करणाऱ्या अफगाण महिला.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

जलाली यांनी हिरव्या रंगाच्या अफगाण पोशाखातील त्यांचा एक फोटो ट्विटवर पोस्ट केला आहे. इतर महिलांनीही त्यांचे फोटो पोस्ट करून अफगाणिस्तानचा खरा चेहरा दाखवून द्यावा, असं आवाहन त्यांनी महिलांना केलं आहे.

"मला जगाला हे सांगायचं आहे की, तुम्ही माध्यमांमध्ये जो पोशाख पाहत आहात (तालिबानच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत महिलांनी परिधान केलेल्या पोषाखाचा म्हणजे काळ्या बुरख्याचा उल्लेख करताना ) ती आमची संस्कृती नाही, ती आमची ओळख नाही," असं त्या म्हणाल्या.

तालिबानच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीमध्ये महिलांनी ज्याप्रकारचा पोशाख परिधान केला होता, ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. रंगीबेरंगी आणि पारंपरिक कपडे परिधान करण्याची सवय असलेल्या अफगाण महिलांसाठी नीब आणि हँड कव्हरींह या पाश्चिमात्य संकल्पना आहेत.

अफगाणिस्तानच्या प्रत्येक भागातील वेगळे पारंपरिक असे पोशाख आहेत. पण एवढं वैविध्य असूनही त्यात सारखेपणा असतो : भरपूर रंग, आरसे आणि भरतकाम (एम्ब्रायडरी). विशेष म्हणजे महिलांचे विचारही जुळतात, ते विचार म्हणजे त्यांचे कपडे ही त्यांची ओळख आहे.

"हा आमचा अस्सल अफगाणी ड्रेस आहे. अफगाणी महिला अशाप्रकारे रंगीबेरंगी आणि साधे कपडे परिधान करतात. काळा बुरखा हा अफगाणिस्तानच्या संस्कृतीचा भाग कधीही नव्हता," असं ट्वीट व्हर्जिनियातील हक्क कार्यकर्त्या स्पॉझ्मी मसीद यांनी केलं.

"शेकडो वर्षांपासून आमचा देश हा मुस्लीम देश आहे. आमच्या आजींनी नेहमी पारंपरिक सुंदर असे पोशाख परिधान केले आहेत. त्यांनी कधीही निळ्या रंगाची 'चादरी' आणि अरबचे काळे बुरखे परिधान केले नाही," असंही मसीद म्हणाल्या.

"आमचा पोशाख हा आमची समृद्ध संस्कृती आणि पाच हजार वर्षांच्या इतिहासाची साक्ष देतो. त्यामुळं अफगाणिंना ते जे आहेत, त्याचा अभिमान वाटतो."

देशात सर्वाधिक जुन्या विचारांचा पगडा ज्या भागात आहे, त्या भागात राहणाऱ्या महिलांनीही कधीही नकाब, चेहरा झाकणारे काळे वस्त्र परिधान केलेले नाही.

व्हीडिओ कॅप्शन,

तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाण लोकांसमोर कोणत्या चिंता आहेत?

"मी हा फोटो पोस्ट केला कारण, आम्ही अफगाण महिला आहोत आणि आम्ही आमची सांस्कृतिक वस्त्र अभिमानानं परिधान करतो. कोणताही दहशतवादी गट आमची ओळख ठरवू शकत नाही. आमची संस्कृती ही गडद किंवा ब्लॅक अँड व्हाईट नाही, तर ती अतिशय रंगीबेरंगी आणि सुंदर आहे. त्यात कलाकुसर आहे आणि त्यातून आमची ओळख समोर येते," असं 37 वर्षीय लिमा हलिमा अहमद यांनी ट्विटमध्ये म्हटलं. लिमा या संशोधक असून महिलांच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या पायवंद अफगाण असोसिएशनच्या त्या संस्थापिका आहेत.

लिमा या अफगाणिस्तानात गेली 20 वर्षे राहिल्या असून त्यांनी तिथं काम केलं आहे. त्यावरून, याठिकाणी महिलांना स्वतःच्या आवडीनुसार पर्याय निवडता येत होता. माझी आई मोठा आणि लांब बुरखा परिधान करयाची. काही महिला लहान परिधान करतात. पण महिलांवर कपडे परिधान करण्यासाठी कधी सक्ती केली नाही, असं त्या म्हणतात.

फोटो स्रोत, Lima Ahmad

फोटो कॅप्शन,

लिमा अहमद यांनी पोस्ट केलेल्या या फोटोखाली लिहीलंय, "ही अफगाण संस्कृती आहे, ही माझी संस्कृती आहे."

"आम्ही अफगाणी स्त्रिया आहोत. आम्ही कधीही असा प्रकार पाहिलेला नाही, ज्यात तुमचे पूर्ण शरीर काळ्या रंगाच्या कपड्यांनी झाकलेले असते, सोबत काळे हातमोजे, अगदी तुमचे डोळेही दिसणार नाहीत. जणू एखाद्या प्रदर्शनात मांडण्यासाठी तुम्हाला तयार केलं की काय," असं वाटत असल्याचं त्या म्हणाल्या. तालिबानच्या समर्थनार्थ निघालेल्या महिलांच्या रॅलीचा उल्लेख करत त्यांनी तसं म्हटलं.

प्रागमध्ये स्थायिक झालेल्या अफगाणी पत्रकार मलाली बशीर यांनीही ट्विटरवरील या मोहिमेत सहभाग घेतला. त्यांनी अफगाण महिलांचं त्यांच्या पारंपरिक पोशाखातील एक पेंटिंग शेअर केलं. जगाला आमच्या संस्कृतीतील सौंदर्य दाखवण्यासाठी हे पेंटिंग असल्याचं त्या म्हणाल्या.

त्यांनी गावातील (कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्यांनी गावाचं नाव सांगितलं नाही) बालपणीच्या आठवणी सांगितल्या. "आमच्या गावात निळा किंवा काळा बुरका परिधान करणं कधीही अनिवार्य नव्हतं. महिला नेहमी अफगाणिस्तानचा सांस्कृतिक पोशाख परिधान करायच्या. प्रौढ किंवा वयस्कर महिला काळ्या कपड्यानं डोकं झाकायच्या तर तरुण मुली शॉल वापरायच्या. महिला पुरुषांना भेटल्यानंतर हस्तांदोलन करायच्या," असं त्या म्हणाल्या.

"गेल्या काही काळात अफगाणी महिलांवर त्यांचा सांस्कृतिक पोशाख बदलून पूर्ण अंग झाकण्यासाठी किंवा सार्वजिनक ठिकाणी उपस्थित न राहण्यासाठी दबाव आणला जात आहे. मी माझा फोटो पोस्ट केला असून एक पेंटिंगही रिशेअर केलं आहे. त्यात अफगाण महिला, आमचे पारंपरिक पोशाख परिधान करून अफगाणिस्तानचं राष्ट्रीय नृत्य "अट्टन" करताना दिसत आहेत."

महिलांना शरिया कायदा आणि स्थानिक परंपरांनुसार शिक्षण आणि काम सुरू ठेवता येईल, मात्र त्यांना ड्रेसकोडचं कडक पालन करावं लागेल, असं तालिबानच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

काही अफगाणी महिलांनी तर अगदी साधे कपडे परिधान करायला सुरुवातही केली आहे. केवळ डोळ्यासमोर चौकोनी आकाराची चौकट असलेल्या निळ्या रंगाच्या चादरीचा वापर पुन्हा सुरू झाला आहे. काबूल आणि इतर शहरांत महिला ते मोठ्या प्रमाणावर परिधान करत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

उच्च शिक्षणमंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी मुला मुलींसाठी विद्यापीठांमध्ये वेगळी सोय केली जाईल तसंच सर्व विद्यार्थिनींना हिजाब परिधान करावा लागेल असंही ते म्हणाले. मात्र केवळ डोकं झाकलेलं आवश्यक असेल की संपूर्ण चेहरा झाकावा लागेल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)