सनरायजर्स हैदराबाद: आयपीएलमधील अफगाणिस्तानच्या खेळाडूंविषयी तुम्हाला माहितेय का?

रशीद खान, अफगाणिस्तान, सनरायझर्स हैदराबाद

फोटो स्रोत, Gareth Copley - ECB

फोटो कॅप्शन,

रशीद खान

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत अफगाणिस्तानचे तीन खेळाडू सहभागी झाले आहेत.

आयपीएल स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद या संघाकडे तालिबानचं लक्ष असणार आहे. संपूर्ण स्पर्धेत अफगाणिस्तानचे तीनच खेळाडू आहेत आणि हे तिघंही सनरायझर्स हैदराबादकडून खेळतात.

अफगाणिस्तान क्रिकेटच्या वाटचालीत या तिघांचाही मोलाचा वाटा आहे. चर्चा न करताच संघनिवड केल्यामुळे रशीद खानने अफगाणिस्तानचं कर्णधारपद सोडलं होतं. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये नियंत्रण मिळवल्यानंतर क्रिकेट संघाला स्वातंत्र्य दिलं आहे. मात्र महिला क्रिकेट संघाला खेळण्याची परवानगी नाकारली आहे. या निर्णयाचे पडसाद क्रिकेटवर्तुळात उमटले आहेत.

यंदाच्या वर्षी अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच खेळणार होता. मात्र अफगाणिस्तान महिला क्रिकेट संदर्भातील तालिबानच्या निर्णयामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही एकमेव टेस्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

युद्धग्रस्त वातावरणात अफगाणिस्तानच्या बहुतांश क्रिकेटपटूंनी क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली आहेत. अफगाणिस्तानच्या असंख्य खेळाडूंनी परिस्थितीशी संघर्ष करत वाटचाल केली आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं तेव्हा रशीद खान इंग्लंडमध्ये हंड्रेड ही स्पर्धा खेळत होता. मात्र त्याच्या घरचे अफगाणिस्तानमध्ये होते. रशीद खानने केलेल्या ट्वीटची तेव्हा जगभर चर्चा झाली होती. अफगाणिस्तानचा झेंडा डोळ्यांखाली रेखाटत रशीदने देशाप्रति प्रेम व्यक्त केलं होतं.

10 ऑगस्ट रोजी रशीदने ट्वीटमध्ये म्हटलं होतं, "जागतिक नेत्यांनो, माझा देश अडचणीत आहे. अनागोंदी माजली आहे. हजारो निरपराध माणसं ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे जीव गमावत आहेत. घरं, वास्तू उद्धस्त होत आहेत. हजारो कुटुंबं बेघर झाली आहेत. आम्हाला अशा स्थितीत सोडून जाऊ नका. अफगाण लोकांना मारणं आणि अफगाणिस्तानला नामशेष करणं थांबवा. आम्हाला शांतता हवी".

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

त्याच दिवशी रशीदने आणखी एक ट्वीट केलं. त्याने लिहिलं, "अफगाणिस्तानमधील युद्धामुळे मानवतेवरचं संकट निर्माण झालं आहे. युद्धाची झळ बसलेल्या नागरिकांना मदत पुरवण्यासाठी रशीद खान फंड आणि अफगाणिस्तान क्रिकेटला मदत करा".

19 ऑगस्ट रोजी लिहिलेल्या ट्वीटमध्ये रशीदने लिहिलं, "देश म्हणून अफगाणिस्तानप्रति आदर व्यक्त करण्याची आणि देशवासीयांच्या बलिदानाचं स्मरण करणं आवश्यक आहे. शांततापूर्ण, विकसित आणि एकसंध अफगाणिस्तानसाठी प्रार्थना करूया".

26 ऑगस्ट रोजी लिहिलेल्या ट्वीटमध्ये रशीद लिहितो, "काबूलमध्ये पुन्हा हिंसाचार. अफगाण लोकांना मारणं थांबवा".

9 सप्टेंबर रोजी रशीदने अफगाणिस्तानचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. कर्णधार आणि जबाबदार माणूस म्हणून अफगाणिस्तान संघाच्या निवडीत माझा सहभाग असणं अपेक्षित आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि निवडसमितीने संघ निवडताना माझ्याशी चर्चा केलेली नाही. यामुळे अफगाणिस्तानच्या ट्वेन्टी20 संघाच्या कर्णधारपदावरून बाजूला होण्याचा मी निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानसाठी खेळणं हा माझ्यासाठी अभिमानाचा मुद्दा आहे.

आयपीएलचा सुपरस्टार-रशीद खान

आपल्या फिरकीने जगभरातल्या मातब्बर फलंदाजांना पेचात टाकणं ही रशीदची खासियत आहे. वेगवान गोलंदाजासारखी वाटावी अशी त्याची अॅक्शन फलंदाजांना धडकीच भरवते. 2017 पासून रशीदने आयपीएल खेळायला सुरुवात केली. धावा रोखणं आणि सातत्याने विकेट्स मिळवणं या दोन्ही आघाड्या रशीद समर्थपणे सांभाळतो.

या दोन कौशल्यांमुळे रशीद आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचा हुकूमी एक्का झाला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विदेशी खेळाडूंच्या यादीत रशीदचं नाव मॅचविनर म्हणून घेतलं जातं.

फोटो स्रोत, Robert Cianflone

फोटो कॅप्शन,

रशीद खान

रशीदच्या चार ओव्हर्स प्रतिस्पर्धी संघ सावधपणे खेळून काढण्यावर भर देतात. रशीदच्या नावावर आयपीएल स्पर्धेत 69 सामन्यात 85 विकेट्स आहेत. गोलंदाजीच्या बरोबरीने रशीद उपयुक्त अशी फटकेबाजीही करतो. अतिशय चपळ असं क्षेत्ररक्षणही करत असल्याने रशीद हैदराबादच्या संघाचा कणाच झाला आहे.

आयपीएलमधील कामगिरीमुळे रशीदची महती जगभर पसरली. जगभरात सुरू असलेल्या विविध ट्वेन्टी-20 लीगमध्ये रशीद सहभागी होतो.

रशीद, अॅडलेड स्ट्रायकर्स, बंड-ए-अमिर ड्रॅगन्स, बंड-ए-अमिर रिजन, बार्बाडोस ट्रायडंट्स, बूस्ट डिफेन्डर्स, कोमिला व्हिक्टोरिअन्स, डरबान हिट, गयाना अमेझॉन वॉरिअर्स, काबूल इगल्स, लाहोर क्वालँडर्स, मराठा अरेबिअन्स, मिस एनाक रिजन, नानगरहर लेपर्ड्स, क्वेटा ग्लॅडिएटर्स, स्पीन घार रिजन, ससेक्स, ट्रेंट रॉकेट्स अशा असंख्य संघांसाठी खेळतो.

अफगाणिस्तानच्या टेस्ट, वनडे तसंच ट्वेन्टी20 संघाचा तो अविभाज्य भाग आहे. आगामी ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रशीदच्या कामगिरीकडे क्रिकेटचाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

मोहम्मद नबी

मि.प्रेसिडेंट या टोपणनावाने प्रसिद्ध मोहम्मद नबी जगभरातल्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होते. दणकट बांध्याचा नबी ज्या संघाकडून खेळतो त्या संघाला संतुलन प्राप्त करून देतो.

फटकेबाजी आणि फिरकी गोलंदाजी ही नबीची ताकद. अफगाणिस्तानच्या टेस्ट, वनडे, ट्वेन्टी20 संघाचा नबी महत्त्वाचा भाग आहे. अफगाणिस्तान संघाचं नेतृत्वही नबीने केलं आहे.

फोटो स्रोत, Mark Brake

फोटो कॅप्शन,

मोहम्मद नबी

नबी मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब, सिल्हेट रॉयल्स, रंगापूर राइड्स, चितगाव विकिंग्ज, कोमिला व्हिक्टोरिअन्स, क्वेटा ग्लॅडिएटर्स, सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिअट्स, मेलबर्न रेनेगेड्स, लिस्टरशायर, बाल्ख लिजंड्स, केंट, सेंट ल्युसिआ झोकूस, कराची किंग्ज या संघांसाठी खेळतो.

आयपीएल स्पर्धेत नबीला सनरायझर्स हैदराबाद साठी खेळण्याच्या मर्यादित संधी मिळाल्या. मात्र जेव्हा संधी मिळाली तेव्हा नबीने छाप उमटवली आहे. आयपीएल स्पर्धेत नबीच्या नावावर 177 धावा आणि 13 विकेट्स नावावर आहेत.

मुजीब उर रहमान

20वर्षीय मुजीबचं वय लहान असलं तरी त्याची फिरकी भल्याभल्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकते. 17व्या वर्षीच त्याने त्याने आयपीएलमधल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी पदार्पण केलं. तीन हंगाम पंजाबसाठी खेळल्यानंतर यंदा मुजीब हैदराबादच्या ताफ्यात दाखल झाला आहे.

फोटो स्रोत, Matt Roberts - CA

फोटो कॅप्शन,

मुजीब उर रहमान

अफगाणिस्तान संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या मुजीबने आयपीएल स्पर्धेत 19 मॅचमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या धर्तीवर जगभरातील बंगाल टायगर्स, ब्रिस्बेन हिट, कोमिला व्हिक्टोरिअन्स, कुमिला वॉरियर्स, हॅम्पशायर, जमैका तलावालाज, काबूल झाल्मी, नॉदर्न सुपरचार्जर्स, पेशावर झाल्मी, खोस्ट प्रोव्हिन्स अशा अनेक संघांसाठी खेळतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)