टायगर पतौडी : एकाच डोळ्याने क्रिकेटचं मैदान गाजवणारा कर्णधार

  • रेहान फझल
  • बीबीसी प्रतिनिधी
टायगर पतौडी

फोटो स्रोत, Getty Images

'7, लोक कल्याण मार्ग' या पत्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीनंतर देशातील सर्वाधिक कठीण काम करणारी व्यक्ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार- असं विनोदाने म्हटलं जातं. किमान साठच्या दशकात तरी हा विनोद वस्तुस्थितीला धरूनच होता.

त्याकाळी भारतीय संघामध्ये एक वा दोन चांगले खेळाडू होते, पण त्यांना जिंकण्याची सवय अंगवळणी पडलेली नव्हती. भारतीय संघाची वेगवान गोलंदाजीबाबत इतकी बिकट अवस्था होती की, यष्टिरक्षक बुधी कुंदरन पहिली ओव्हर टाकायचे.

हा काही डावपेच नव्हता, तर संपूर्ण संघात कोणीच वेगवान गोलंदाज नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली होती.

कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्याला इजा झाल्यावर पतौडी कर्णधार

'डेमॉक्रसीज् इलेव्हन: द ग्रेट इंडियन क्रिकेट स्टोरी' या पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार राजदीप सरदेसाई सांगतात त्यानुसार, पतौडी भारतीय संघाचे कर्णधार झाले तेव्हा त्यांचं वय केवळ 21 वर्षं 70 दिवस इतकंच होतं.

त्यांना अतिशय अवघड परिस्थितीमध्ये ही जबाबदारी सांभाळावी लागली.

एक मार्च 1962 रोजी बारबडोसविरोधातील सामन्यामध्ये त्या वेळी जगातील सर्वांत वेगवान गोलंदाज असणारे चार्ली ग्रिफीथ यांनी टाकलेला बॉल भारतीय कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्याला लागला आणि ते जायबंदी झाले.

ही जखम इतकी मोठी होती की, कॉन्ट्रॅक्टर यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येऊ लागलं. त्यानंतर उपकर्णधार पतौडी यांनी पुढील कसोटी सामन्यात भारतीय संघाचं कर्णधारपद सांभाळावं, असं संघाचे व्यवस्थापक गुलाम अहमद यांनी सुचवलं.

अशा रितीने पतौडी युगाची सुरुवात झाली आणि या कालखंडात भारतीय संघाच्या खेळाची नवीन परिभाषा तयार झाली.

नेतृत्वाच्या कारणावरून पतौडींचा संघात समावेश

पतौडी भारताच्या वतीने 47 कसोटी सामन्यांमध्ये खेळले, त्यापैकी 40 सामन्यांमध्ये त्यांनी भारताचं नेतृत्व केलं. कर्णधार होणं हा जणू काही त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच होता. यातील केवळ नऊ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी संघाला विजय मिळवून दिला, तर त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 19 कसोटी सामने हरला.

ही काही विशेष अभिमानास्पद कामगिरी नव्हती. पण केवळ आकडेवारीवरून पतौडी यांच्या कर्णधारपदावरील कामगिरीचा अंदाज येणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

टायगर पतौडी आणि नरी कॉन्ट्रॅक्टर

त्यांच्या संघातील एक सदस्य प्रसन्ना सांगतात, "पतौडी मैदानात ज्या रितीने उतरत त्यावरून दर्जा आणि नेतृत्व काय असतं याचा अंदाज यायचा. जगात बहुधा केवळ दोनच खेळाडू असे झाले असावेत ज्यांना नेतृत्वगुणाच्या बळावर संघात सहभागी करून घेतलं जात असे. यातील एक होते, इंग्लंडचे कर्णधार माइक ब्रेयरली, तर दुसरे होते मन्सूर अली खान पतौडी."

स्वतः न खेळण्याचा प्रस्ताव ठेवला

पतौडी यांचे भाचे आणि दक्षिण प्रांताकडून खेळताना वेस्ट इंडीजविरोधात शतक ठोकलेले बिन जंग सांगतात, "1975 साली वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी मी दिल्लीत आमच्या घरामागे सिमेंटच्या खेळपट्टीवर पतौडी यांच्याकडून सराव करवून घेत होतो.

मी 15 यार्ड अंतरावरून प्लॅस्टिकच्या बॉलने शक्य असेल तितक्या वेगाने गोलंदाजी करावी, असं त्यांनी मला सांगितलं. ते दोन-तीन बॉल खेळून गेले, पण चौथ्या बॉलवर बोल्ड झाले. त्यानंतर दोन चेंडू टाकून झाल्यावर पुन्हा साद यांनी त्यांना बोल्ड केलं. आपल्याला बॉल दिसलाच नाही, असं पतौडी त्रस्त होऊन म्हणाले."

साद यांच्या म्हणण्यानुसार, "पतौडी यांनी तत्काळ निवडसमितीचे अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांना फोन करून सांगितलं की, त्यांना वेस्ट इंडीजविरोधी सामन्यांकरता भारतीय संघात निवडू नये, कारण त्यांना बॉल दिसत नाहीये. हे ऐकल्यावर राजसिंग हसले आणि म्हणाले, की पॅट, आम्ही तुम्हाला बॅटिंगसाठी नाही, तर कॅप्टन्सीसाठी भारतीय संघात निवडतो आहोत."

फटकेबाजीनंतरही चंद्रशेखर यांना थांबवलं नाही

पतौडींनी राजसिंग डुंगरपूर यांची आशा फोल ठरवली नाही. भारतीय संघ कसोटी मालिकेत 0-2 असा मागे पडला होता, पण कोलकाता आणि मद्रासमधील सामन्यांमध्ये विजय मिळवून देत त्यांनी आपला संघ 2-2 असा समपातळीवर आणून ठेवला.

त्या संघाचे सदस्य राहिलेले प्रसन्ना म्हणतात, "कलकत्त्यातील कसोटीमध्ये चौथ्या दिवशी रात्री पतौडीने माझ्या खोलीचं दार वाजवलं आणि म्हणाले, की हे बघ, विकेट फिरते आहे. समोरचे किती रन्स करतायंत त्याची चिंता करू नकोस. तू आणि चंद्रशेखर फक्त वेस्टइंडीजच्या खेळाडूंना आउट करण्यावर लक्ष केंद्रित करा."

तसंच झालं. लॉइड यांनी चंद्रशेखर यांच्या गोलंदाजीवर सलग चौकार फटकावले तरीही पतौडींनी त्यांना गोलंदाजी करण्यापासून थांबवलं नाही. लगेच पुढच्याच ओव्हरमध्ये चंद्रशेखर यांनी लॉइड यांना विश्वनाथच्या हातून झेलबाद करवलं. त्यातून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

कार-अपघातामध्ये डोळा गमवावा लागला

विसाव्या वर्षी एक अपघात झाला नसता, तर पतौडी यांची क्रिकेटची कारकीर्द आणखी बहरली असती.

ब्राइटन इथे ससेक्ससोबत 1 जुलै 1961 रोजी झालेला सामना संपल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातील सर्व खेळाडू एका मिनीव्हॅनमध्ये बसून निघाले. पण पतौडींनी यष्टिरक्षक रॉबिन वॉल्टर्स यांच्या सोबत मॉरिस-1000 या कारमधून जायचं ठरवलं.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

कार थोडी पुढे गेल्यावर लगेचच दुसऱ्या एका गाडीने तिला धडक दिली.

ऑक्सफर्ड संघाचे आणखी एक भारतीय सदस्य अब्बास अली बेग (जे कालांतराने भारतीय संघासाठी 10 कसोटी सामने खेळले) सांगतात, "पतौडी त्यांचा उजवा डोळा दाबून कारमधून बाहेर येताना आम्हाला दिसलं. त्यांच्या डोळ्यातून रक्त येत होतं. हा फार मोठा अपघात असेल, असं मला तेव्हा वाटलं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये मलमपट्टी केल्यावर ते बरे होतील, असं आम्हाला वाटलं. पण तसं झालं नाही."

बेग म्हणतात, "कारच्या काचेचा एक तुकडा त्यांच्या डोळ्यात घुसला होता. सर्जरी झाली. पण त्यांचा डोळा बरा झाला नाही. काही दिवसांनी त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तर त्यांना स्वतःच्या दिशेने दोन बॉल येताना दिसत होते आणि बॉल सहा इंचाच्या अंतरावर असल्यासारखं वाटत होतं."

कालांतराने पतौडींनी 'टायगर टेल्स' या आत्मचरित्रामध्ये नमूद केलं की, "मी लायटर घेऊन सिगरेट पेटवायचा प्रयत्न करायचो, तेव्हा सिगरेटपासून सुमारे काही इंच दुसरीकडेच लायटर पेटवायचो. मी जगमधून ग्लासमध्ये पाणी ओतायला बघायचो, तर पाणी ग्लासऐवजी टेबलावरच पडत असे."

एक डोळा आणि एक पाय यांच्या सहाय्याने केलेली खेळी

अनेक तास नेटप्रॅक्टिस केल्यानंतर पतौडी यांनी त्यांच्या या मर्यादेवर जवळपास मात केली. दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरोधात त्यांनी नाबाद 203 धावांची खेळी केली. पण, 1967 साली मेलबर्नमधील हिरव्या खेळपट्टीवर केलेल्या 75 धावा, ही आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कामगिरी असल्याचं ते मानत असत.

त्या सामन्यात 25 धावांवर भारताचे पाच खेळाडू बाद झालेले होते. पतौडी यांच्या गुडघ्याच्या मागच्या बाजूची नस (हॅमस्ट्रिंग) दुखावली होती, त्यामुळे ते एक रनर (अजित वाडेकर) घेऊन मैदानात उतरले. पतौडींना पुढच्या बाजूला वाकता येत नव्हतं, त्यामुळे त्यांनी फक्त हूक, कट आणि ग्लान्स असे फटके खेळून 75 धावा केल्या.

नंतर इयान चॅपल यांनी लिहिल्यानुसार, "त्या खेळीमधले दोन शॉट मला आजही आठवतात. रेनेबर्गच्या गोलंदाजीवर आधी त्यांनी ऑफ द टोज् मिड विकेट बाउंड्रीला चौकार मारला, आणि मग त्या वेळचे जगातील सर्वाधिक वेगवान गोलंदार ग्रॅम मॅकेन्झी यांनी टाकलेला बॉल डोक्यावरून वन बाउन्सने फटकावला. विशेष म्हणजे या खेळीदरम्यान त्यांनी पाच वेगवेगळ्या बॅट वापरल्या."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची टीममधल्या सहकाऱ्यांशी ओळख करून देताना

चॅपल लिहितात, "आज तुम्ही सतत बॅट का बदलत होतात, असं मी संध्याकाळी त्यांना विचारलं. त्यावर पतौडी म्हणाले, मी कधी स्वतःची बॅट घेऊन दौऱ्यावर जात नाही. माझ्या किटमध्ये फक्त शूज्, मोजे, क्रिम आणि कपडे असतात. पॅव्हेलियनच्या दारात जी बॅट पडली असेल, ती मी उचलून खेळायला उतरतो."

'एका डोळ्याने आणि एका पायाच्या सहाय्याने खेळण्यात आलेली खेळी' असं या प्रसंगाचं वर्णन मिहीर बबोस यांनी 'हिस्ट्री ऑफ क्रिकेट' या पुस्तकात केलं आहे.

कमालीचे क्षेत्ररक्षक

पतौडी चांगले फलंदाज होण्यासोबतच चांगले क्षेत्ररक्षकसुद्धा होते.

सुरेश मेनन यांनी 'पतौडी नवाब ऑफ क्रिकेट' या पुस्तकात लिहिलं आहे, "1992 साली मी भारतीय संघाच्या दौऱ्याचं वार्तांकन करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेलो, तेव्हा एके काळी उत्तम फिल्डर राहिलेल्या कॉलिन ब्लेन्ड यांनी मला सांगितलं होतं की, त्यांच्या मते कव्हर पॉइन्टवर पतौडी जॉन्टी ऱ्होड्सपेक्षाही चांगली फिल्डिंग करत असत. त्यांचा अंदाज इतका अचूक असायचा की डाइव्ह मारताना कधीही त्यांची पॅन्ट खराब व्हायची नाही."

राजदीप सरदेसाई यांनी पतौडींच्या क्षेत्ररक्षणाचं वेगळ्या तऱ्हेने विश्लेषण केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, "भारतातील जे काही राजेमहाराजे क्रिकेट खेळले, त्यात रणजी यांचाही समावेश होतो. तेसुद्धा फलंदाजीसाठी ओळखले जात, फिल्डिंगसाठी नाही. तसंही भारतात ब्राह्मण्यग्रस्त समाजामध्ये क्षेत्ररक्षणाचं काम कनिष्ठ जातींचं मानलं जात होतं."

"चाळीस-पन्नासच्या दशकांमध्ये विजय मर्चंट यांच्यापासून विजय हजारे यांच्यापर्यंत सर्व महान भारतीय फलंदाज अनेक तास बॅटिंग करू शकत असत, पण फिल्डिंगच्या बाबतीत त्यांचे हात तितके लवचिक नव्हते. पतौडी यांनी मात्र आक्रमक फलंदाजीसोबतच फिल्डिंगलाही आकर्षक ठरवलं. ते कव्हरवर उभं राहून एखादा चित्ता शिकारीवर झेपावेल, तसे बॉल पकडायला झेप घेत असत. त्याचमुळे बहुदा त्यांचं नाव टायगर असं पडलं असावं."

ट्रेनमधून प्रवास करण्याची आवड

पतौडी यांना कायमच विमानातून प्रवास करण्याचं भय वाटत असे. शक्यतोवर ते ट्रेनने प्रवास करणं पसंत करत.

एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम केलेले यजुवेंद्र सिंग सांगतात, "निवृत्त झाल्यानंतरसुद्धा पतौडींची स्टाइल ओसरली नव्हती. एखाद्या स्थानकावर ट्रेन थांबायची तेव्हा त्यांचा सेवक किशन त्यांचा जेवणाचा डबा स्थानकावरच्या स्वैपाकघरात नेऊन गरम कराचा. तोवर स्टेशनमास्तर ट्रेन थांबवून ठेवायचे.

पतौडींच्या डब्याच्या चारही बाजूंनी लोकांची गर्दी जमलेली असायची. याकडे लक्ष न देता पतौडी एका हातात व्हिस्की घेऊन कोणतीतरी गझल गुणगुणत असायचे."

पेटी, तबला आणि 'हिरण डान्स'

पतौडींना संगीताची खूप आवड होती. ते हौशी पेटी आणि तबला वादक होते. मूडमध्ये असताना ते अनेकदा 'हवा मे उडता जाए, मेरा लाल दुपट्टा मलमल का' हे गाणं गात असत.

एकदा त्यांना ऱ्होड्स स्कॉलरच्या निवडीसाठी मुलाखती घ्यायला बोलावण्यात आलं. एका उमेदवाराने सीव्हीमध्ये संगीताची आवड असल्याचा उल्लेख केला होता. पतौडींनी त्यांच्या हाताने टेबलावर त्रिताल वाजवला आणि हा कोणता ताल आहे असा प्रश्न संबंधित उमेदवाराला विचारला.

फोटो स्रोत, Getty Images

शर्मिला टागोर सांगतात, "पतौडींना तबल्याची इतकी आवड होती की, कधीकधी महान सरोदवादक अमजद अली खाँ यांच्या सोबत ते जुगलबंदी लावत असत. एकदा अमजद भोपाळमध्ये खुल्या मैदानात सरोद वाजवत होते. तेव्हा पाऊस पडायला लागला. सगळे लोक धावत आत आले. तेव्हा अमजत आणि पतौडी यांनी रात्रभर संगीत वाजवून आम्हा सर्वांचं मनोरंजन केलं होतं."

पतौडींना गाण्यासोबतच 'हिरण डान्स'चीसुद्धा आवड होती, असं सरदेसाई सांगतात.

"एकदा त्यांनी आणि बगी (अब्बास अली बेग) यांनी विख्यात नृत्यांगना सोनल मानसिंग यांच्या समोर नाचून दाखवायचं धाडस केलं होतं. अनेकदा ते 'दिल जलता है, तो जलने दो' हे गाणं गुणगुणत असत. हेच गाणं गाऊन त्यांनी मला पटवलं होतं, असं शर्मिला टागोर सांगतात."

माजी क्रिकेटपटू जयंतीलाल सांगतात की, पतौडींना हाताने खाता यायचं नाही, जयंतीलाल यांनीच मग त्यांना हाताने खायला शिकवलं.

विश्वनाथ यांच्या खोलीत डाकू घुसले तेव्हा...

पतौडींना त्यांच्या सहकाऱ्यांची गंमत करायला आवडत असे. एकदा भोपाळमध्ये त्यांच्या महालात थांबलेले गुंडाप्पा विश्वनाथ आणि इरापल्ली प्रसन्ना यांचं काही डाकूंनी अपहरण केलं होतं.

राजदीप सरदेसाई सांगतात, "विश्वनाथ यांनी हा किस्सा मला सांगितला होता- एकदा रात्री अचानक त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि काही डाकू त्यांच्या खोलीत घुसले. त्यांनी प्रसन्नाला गोळी मारून ठार केलं आहे आणि आता विश्वनाथ यांची पाळी असल्याचं डाकू म्हणाले.

मग डाकूंनी त्यांना एका झाडाला बांधलं. ते जोरजोराने रडायला लागले. तेव्हा पतौडी हसत खोलीत आले. ते डाकू वगैरे सगळं खोटं होतं, ते पतौडींच्या महालात काम करणारे कर्मचारीच होते आणि पतौडींच्या सांगण्यावरून त्यांनी हे नाटक केलं होतं, असं स्पष्ट झालं."

इंग्लंडमध्ये शिवलेला सूटच घालत असत

पतौडी यांना रंगीत कॅशमीयर मोजे घालायची आवड होती. ते सूट क्वचितच घालायचे, पण त्यांना इंग्लंडमधील विख्यात टेलर 'सेव्हिल रो' यांच्याकडे शिवलेला सूटच लागत असे.

ते ब्रिटनला जाताना कायम 'ब्रिटिश एअरवेज्'नेच प्रवास करत. त्यातील वैमानिकांचं आणि हवाईसुंदऱ्यांचं ब्रिटिश ढंगाचं बोलणं त्यांना आवडत असे.

फोटो स्रोत, Getty Images

पतौडींना पुस्तकं वाचण्याची खूप आवड होती. "अनेकदा पतौडी पुस्तक वाचता वाचता तसेच झोपी जात. सकाळी ते उठले की त्यांच्या जवळच पुस्तक ठेवलेलं असायचं," अशी आठवण यजुवेंद्र सिंग सांगतात.

काही मिनिटांमध्ये नाश्ता तयार

निवृत्त झाल्यानंतर पतौडी यांनी क्रीडाविषयक विख्यात नियतकालिक 'स्पोर्ट्स वर्ल्ड'चं संपादनसुद्धा केलं होतं. हे नियतकालिक कोलकात्याहून प्रसिद्ध होत असे.

त्या काळी 'स्पोर्ट्स वर्ल्ड'मध्ये काम केलेले मुदर पाथरेयी सांगतात, "ते जेव्हाकेव्हा दिल्लीहून ट्रेनने कलकत्त्याला येत, तेव्हा स्पोर्ट्सवर्ल्डच्या स्टाफसाठी हानिकेन बीअरची पेटी घेऊन येत. परत जाताना कलकत्त्याहून बकऱ्याचं मांस बर्फात ठेवून दिल्लीला घेऊन जात. कलकत्त्याला दिल्लीहून चांगलं बकऱ्याचं मटण मिळतं, असं त्यांचं म्हणणं होतं."

पतौडी स्वतः उत्तम स्वयंपाक करायचे. अनेकदा ते स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्या आचाऱ्यांसोबत तंदूरी वगैरे तयार करायला मदत करत.

त्यांची मुलगी अभिनेत्री सोहा अली खान सांगतात त्यानुसार, पतौडी कधी मुंबईत त्यांच्या सोबत राहायला येत, तेव्हा काही मिनिटांमध्ये 'स्क्रॅबल्ड एग'चा नाश्ता तयार करत.

आत्मविश्वासाला चालना

साठच्या दशकात पतौडींनी भारतीय क्रिकेटची धुरा खांद्यावर घेतली, तेव्हा आजच्या झिम्बाब्वेसारखी भारतीय संघाची अवस्था होती.

आपण जिंकू शकतो, असा विश्वास भारतीय क्रिकेटपटूंमध्ये निर्माण करण्याची कामगिरी पतौडी यांनी करून दाखवली.

राजदीप सरदेसाई म्हणतात, "त्याकाळी भारतीय संघ सामने खेळायचा, पण संघसदस्यांमध्ये जिंकण्याची ईर्षा नव्हती. आपण आंतरराष्ट्रीय सामना जिंकू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात नव्हता. पतौडी यांनी ही वृत्ती बदलली आणि भारतीय क्रिकेटमध्ये आत्मविश्वासाला चालना दिली."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)