रशियाचं सैन्य युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे?

  • पॉल कर्बी
  • बीबीसी न्यूज
व्लादिमीर पुतीन

फोटो स्रोत, Reuters

रशियाचं सैन्य युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे का? युक्रेन आणि पश्चिमेतल्या देशांतल्या नेत्यांना सध्या पडलेला हा प्रश्न आहे.

सातच वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनच्या एका भागावर ताबा मिळवला होता आणि फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देत अस्थिरता वाढवली होती.

आपला असा कोणताही इरादा नसल्याचं रशियाने म्हटलंय. पण इथं नेमकं काय सुरू आहे?

युक्रेन कुठे आहे?

युक्रेनच्या सीमा युरोपियन युनियन आणि रशिया या दोन्हींना लागून आहेत. पण युक्रेन पूर्वी सोव्हिएत साम्राज्याचा भाग होता. त्यामुळेच रशियाशी युक्रेनचे अगदी जवळचे सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत आणि इथे रशियन भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.

युक्रेनच्या युरोपियन संघटनांच्या दिशेने झुकण्याला रशियाने दीर्घकाळापासून विरोध केलाय आणि युक्रेनने कधीही नाटोमध्ये सहभागी होऊ नये आणि नाटोच्या कोणत्याही गोष्टीला आपल्या भूमीवर परवानगी देऊ नये अशी रशियाची मागणी आहे.

रशिया धार्जिण्या राष्ट्राध्यक्ष्यांची सत्ता युक्रेनियन नागरिकांनी 2014मध्ये संपुष्टात आणली. त्यानंतर रशियाने युक्रेनकडून दक्षिण क्रिमिआच्या भागाचा ताबा मिळवला. त्यानंतर रशियाचं पाठबळ असणाऱ्या फुटीरतावाद्यांनी युक्रेच्या पूर्वेकडील दोनबास भागांमध्ये मोठा ताबा मिळवला.

खऱ्या हल्ल्याची शक्यता आहे का?

पूर्व युक्रेनमधली ही स्थिती अजूनही कायम आहे. घुसखोरांनी व्यापलेल्या या भागाजवळ रशियाने रणगाडे, तोफखाने आणि स्नायपर्स - अचूक वेध घेणारे बंदूकधारी सैनिक पाठवल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे. युक्रेनच्या सीमेजवळच्याच भागात रशियाचं 90 हजारांपेक्षा जास्त सैन्य असल्याच्या बातम्या आल्यायत आणि हीच काळजीची गोष्ट आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हल्ला करण्याचं ठरवल्याचं वा लगेच हल्ला होण्याची शक्यता असल्याचं अजून कशावरूनही सूचित झालेलं नाही. सगळ्यांनी शांत रहावं असं आवाहन क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी केलं होतं. पण 2022च्या सुरुवातीला कधीतरी हल्ला होऊ शकतो असा युक्रेनच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा आणि पश्चिमेतल्या देशांच्या गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मार्च 2021मध्ये रशियाने क्रिमिआमध्ये युद्ध सराव केला आणि त्यानंतर काळजी व्यक्त केली जाऊ लागली.

युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकॉव्ह म्हणाले, "जानेवारीच्या अखेरीस परिस्थिती चिघळण्याची शक्यता जास्त आहे."

जानेवारीपर्यंत कदाचित रशियाचं जवळपास 1 लाख 75 हजारांचं सैन्य सज्ज होईल असं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा - CIA ने म्हटलंय.

'ज्या ठिकाणाहून रशियन सैन्य आणि सुरक्षा यंत्रणा झपाट्याने कार्यरत होऊ शकतील अशा ठिकाणी त्यांना पुतिन तैनात करत असल्याचं,' CIA चे संचालक विल्यम बर्न्स यांनी म्हटलंय.

रशियाचं म्हणणं काय?

सैन्य तळ दाखवणारे सॅटेलाईट फोटोज हे पूर्व युक्रेनमधले नसून क्रिमिआमधले आहेत असं रशियाने सुरुवातीला सांगितलं. पण त्यांनतर 'आम्हाला आमच्या भूभात सैन्य हलवण्याचा हक्क आहे' असं राष्ट्राध्यक्षांच्या सहकाऱ्याने म्हटलं. पण याचा अर्थ आणखी गंभीर काही होईल असा काढू नये, असंही म्हटलं.

युक्रेनने त्यांच्या एकूण सैन्याच्या निम्मे जवळपास 1 लाख 25 हजार सैनिक पूर्व सीमेजवळ तैनात केले असून रशियाचा पाठिंबा असणाऱ्या फुटीरतावाद्यांनी व्यापलेल्या भागांवर हल्ला करण्याचा कीव्हचा इरादा असल्याचा उलट आरोप रशियाने केला.

स्वतःच्या कारवाया झाकण्यासाठी रशिया ही बोंबाबोंब करत असल्याचं युक्रेनने म्हटलं.

फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या भागात राहणाऱ्या सुमारे पाच लाख युक्रेनियनांकडे आता रशियन पासपोर्ट असल्याचं रशियाच्या फेडरेशन काऊन्सिलच्या इंटरनॅशनल अफेअर्स कमिटीच्या व्लादिमीर झाहाबरोव्ह यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला म्हटलं होतं.

रशियाला काय हवंय?

युक्रेनबाबत पश्चिमेकडच्या देशांनी रशियाची 'रेड लाईन' - धोक्याची रेषा, ओलांडू नये असा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलाय.

काय आहे ही धोक्याची रेषा?

नाटोने पूर्वीकडच्या देशांमध्ये हातपाय पसरू नयेत आणि रशियाला धोका निर्माण करतील अशाप्रकारे त्यांच्या शेजारच्या देशांमध्ये युद्धसामुग्री तैनात करू नये, असं पुतिन यांचं म्हणणं आहे.

पूर्व युक्रेनमधल्या बंडखोरांना रशियाचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या विरोधात युक्रेनने तुर्कीची ड्रोन्स तैनात केली होती. याला रशियाचा विरोध आहे. सोबतच काळ्या समुद्रात पश्चिमेतल्या देशांच्या सैन्यासोबत युक्रेनने केलेल्या सैनिकी सरावालाही रशियाचा विरोध आहे.

युक्रेनमधले सध्याचे नेते रशिया विरोधी मोहीम राबवत असल्याचं जुलै 2021मध्ये एका रशियन नेत्याने क्रेमलिन वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटलं होतं.

जे युक्रेनला रशियाच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न करतील ते यामध्ये स्वतःच्या देशाचा नाश करून घेतील, असंही यात म्हटलं होतं.

नाटो युक्रेनला कशी मदत करतंय?

नाटो (NATO) म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी अलायन्स. जगभरातले 30 देश नाटोचे सदस्य आहेत.

नाटोचा वेस्टर्न मिलिटरी अलायन्स हा बचावात्मक उद्दिष्टांसाठी असून याच कारणांसाठी सैनिकी पाठबळ दिलं जाईल असं त्याचे सेक्रेटरी जनरल जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी स्पष्ट केलंय.

याशिवाय युके युक्रेनला दोन नाविक तळ उभारण्यासाठी मदत करणार आहे. तर अमेरिकेची अँटी टँक जॅव्हलिन मिसाईल्स युक्रेनला पाठवण्याती आली असून अमेरिकेच्या कोस्ट गार्डच्या दोन गस्ती बोटी युक्रेन नेव्हीला देण्यात आल्या आहेत.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

युक्रेनने नाटोमध्ये कधी सहभागी व्हायचं हे युक्रेन आणि नाटोच्या 30 देशांनी ठरवायचं असल्याचं स्टोल्टनबर्ग यांनी म्हटलंय.

आपण युक्रेनला त्यांची सार्वभौमता जपण्यासाठी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेने म्हटलंय. पण सध्यातरी युद्धात्मक वा सैनिकी कारवाईचा विचार करत नसल्याचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलंय.

सध्या तरी अमेरिकेने रशियाने आखलेली रेड लाईन मानायला नकार दिलाय.

रशियावर निर्बंध घालणं हे पश्चिमेकडच्या देशांकडे असणारं सगळ्यात मोठं शत्त्र आहे. रशियाने लष्करी कारवाई केली तर त्यांनी मोठी किंमत मोजावी लागेल असं राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटलं होतं.

रशियाच्या बँकिंग प्रणालीला इतर आंतरराष्ट्रीय स्विफ्ट पेमेंट सिस्टीमपासून तोडण्याची धमकी देणं ही सगळ्यात मोठी आर्थिक कारवाई ठरू शकते. हा शेवटचा उपाय असल्याचं अनेकांचं मत आहे.

याशिवाय जर्मनीमधून जाणाऱ्या रशियाच्या नॉर्ड स्ट्रीम 2 या गॅस पाईपलाईनला रोखणं ही देखील एक धमकी असू शकते. या पाईपलाईनला परवानगी देणं जर्मनीच्या ऊर्जामंत्र्यांच्या हातात आहे.

रशियाच्या RDIF सोव्हरिन वेल्थ फंडवरचे निर्बंध आणि बँकांनी रशियाच्या रूबल्स चलनाचं इतर परकीय चलनात रूपांतर करण्यावर निर्बंध हे देखील पर्याय असू शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)