ट्रॅकवर मध्येच ट्रेन थांबवून ड्रायव्हर गेला दही आणायला आणि....

पाकिस्तान ट्रेन

फोटो स्रोत, EPA

पाकिस्तानमधील पॅसेंजर रेल्वेचा ड्रायव्हर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

रेल्वे चालवत असतानाच दही खाण्याची इच्छा झाल्यामुळे त्याने गाडी मध्येच थांबवल्याचं समोर आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओत, एक रेल्वे ट्रॅकवर मध्येच थांबवण्यात आली आहे आणि एक माणूस जो या गाडीचा ड्रायव्हर आहे तो हातात दही घेऊन येत असल्याचं दिसत आहे.

लाहोरमधील एका स्टेशनवर ही घटना घडल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.

ड्रायव्हरनं गाडी मध्येच थांबवून आपल्या सहाय्यकाला बाजारात दही आणण्यास सांगितलं, असंही माध्यमांनी म्हटलं आहे.

या प्रकारानंतर पाकिस्तानचे रेल्वे मंत्री आझम खान स्वाती यांनी ट्रेन चालक राणा मोहम्मद शहजाद आणि त्यांचा सहाय्यक इफ्तिखार हुसैन यांना नोकरीवरून निलंबित केलं आहे.

स्वत:च्या कामासाठी राष्ट्रीय संपत्तीचा वापर करता येणार नाही, असं स्वाती यांनी पुढे म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

बीबीसीनं याप्रकरणी निलंबित ड्रायव्हरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.

एएफपीशी बोलताना रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद इजाज-उल-हसन शाह म्हणाले, "जेव्हा तुम्ही ट्रेन मध्येच थांबवता तेव्हा तो सुरक्षेचा मुद्दा बनतो. सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. सुरक्षेशी तडजोड कधीच करता येत नाही."

या घटनेच्या बातम्या आणि व्हीडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत आणि लोक आपआपली मतं व्यक्त करत आहेत. या घटनेप्रकरणी निलंबित चालकानं काहीही वक्तव्य केलेलं नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र अनेक जण हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

एका ट्विटर यूझरनं पंतप्रधान इम्रान खान यांना टॅग करत म्हटलंय, "कृपया याची कठोर दखल घ्यावी. सर्व शासकीय विभाग ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केवळ चेष्टा आहे. चौकस वार्षिक अहवालाच्या आधारे अव्यावसायिक आणि भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची वेळ आली आहे."

काही लोकांनी सोशल मीडियावर विनोदी प्रतिक्रिया देत रेल्वे ड्रायव्हरबद्दल सहानुभूती दाखवली आहे. मरियम नावाच्या युजरने असा कयास लावला की, 'गरीब ड्रायव्हर. त्या बिचाऱ्याला बायकोनं फोन केला असावा. '

तर एकानं म्हटलंय, "घरी येताना दही घेऊन या असं तुमची मुलगी म्हणते आणि तुम्ही रेल्वेचे ड्रायव्हर असता, त्यावेळी..."

पण काही लोकांनी त्यावर गंभीर भाष्य केलं आहे आणि देशाची रेल्वे व्यवस्था संकटात सापडल्याचं हे उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.

तर काही यूजर्सनी रेल्वे प्रवासात त्यांच्यासोबत घडलेल्या विचित्र घटनाही शेअर केल्या आहेत..

एका वापरकर्त्याने सांगितलं की, "एकदा ट्रेनच्या प्रवासादरम्यान, ट्रेन मॅनेजरने निर्जन भागात ट्रेन थांबवली जेणेकरून इंटरनेट योग्यरित्या काम करेल आणि पाकिस्तान क्रिकेट मॅच त्याच्या लॅपटॉपवर पाहता येईल."

फहाद अली या वापरकर्त्यानं म्हटलं, "ट्रेन थांबवून दही आणायला गेला, असा कुठे ड्रायव्हर असतो का?"

तर, मसूद मिर्झा यांनी 'दह्यालाही स्वतःचे व्यसन असतं' असं ट्वीट करत फहाद अली यांना रिप्लाय दिला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)