हरनाज संधू : 'या' उत्तरांनी तिला मिस युनिव्हर्सच्या मुकुटापर्यंत पोहोचवलं

हरनाज संधू

फोटो स्रोत, Getty Images

भारताची हरनाज संधू 70 वी 'मिस युनिव्हर्स' ठरली आहे. 21 वर्षानंतर हरनाज संधूच्या रुपात 'मिस युनिव्हर्स'चा किताब भारताला मिळाला आहे.

हरनाज संधू 21 वर्षांची आहे. 2000 साली अभिनेत्री लारा दत्ता हिला 'मिस युनिव्हर्स' स्पर्धा जिंकली होती.

हरनाजनं अंतिम फेरीत पराग्वेच्या नादिया फरेरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या ललेला मसवाने या दोघींना मागे टाकत विजय मिळवला.

इस्रायलच्या इलियटमध्ये आयोजित या स्पर्धेत मेक्सिकोची माजी 'मिस युनिव्हर्स' अँड्रिया मेजा हिने हरनाज संधूला 'मिस यूनिव्हर्स'चं मुकुट देऊन गौरवलं.

मिस यूनिव्हर्सचा किताब पटकावल्यानंतर हरनाज म्हणाली, "ईश्वर, नातेवाईक आणि मिस इंडिया संघटनेचे मी आभारी आहे, ज्यांनी या प्रवासात मला मार्गदर्शन केलं आणि मला आधार दिला. मी जिंकावं म्हणून प्रार्थना केलेल्या सगळ्यांचे आभार. 21 वर्षांनंतर हा किताब भारताला मिळाल्यानं अधिकचा आनंद आणि अभिमानही वाटतो."

हरनाजला विचारलेले प्रश्नं आणि तिची उत्तरं

अंतिम राऊंडच्या वेळेस सगळ्या स्पर्धकांना विचारण्यात आलं होतं की, आजच्या काळात दबावाचा सामना करणाऱ्या तरुणांना दबावाला सामोरं जायला मदत मिळेल यासाठी काय संदेश द्याल?.

या प्रश्नाचं उत्तर देताना हरनाज म्हणाली, "आजच्या काळातील तरुणांवर असलेला सर्वात मोठा दबाव हा त्यांच्या आत्मविश्वासाशी संबंधित आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तेच तुम्हाला सुंदर बनवतं. स्वतःची इतरांशी तुलना करणं बंद करा.

"संपूर्ण जगामध्ये जे काही घडत आहे त्यावर बोलणंही अत्यंत गरजेचं आहे. बाहेर पडा. स्वतःसाठी भूमिका घ्या कारण तुम्हीच स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास आहे, म्हणून मी आज इथे उभी आहे."

फोटो स्रोत, Getty Images

याआधी टॉप-5 च्या राऊंडमध्ये हरनाजला हवामान बदलाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

अनेक लोकांना हवामान बदल म्हणजे थोतांड आहे असं वाटतं, तुम्ही त्यांना समजावण्यासाठी काय कराल?, असा प्रश्न विचारल्यावर हरनाजचं उत्तर होतं, "मी निसर्गाकडे पाहते तेव्हा त्याला किती अडचणींचा सामना करावा लागत आहे हे पाहून मला वाईट वाटतं. हे सर्व आपल्या बेजबाबदार वर्तनामुळं घडतं.

"हा काळ कमी बोलण्याचा आणि जास्त काम करण्याचा आहे, असं मला ठामपणे वाटतं. कारण आपलं प्रत्येक पाऊल निसर्गाला वाचवू शकतं किंवा नष्ट करू शकतं. खबरदारी घेणं किंवा संवर्धन करणं हे पश्चात्ताप किंवा नंतर सुधारणा करण्यापेक्षा अधिक चांगलं आहे."

कोण आहे हरनाज संधू?

हरनाजनं यावर्षी ऑक्टोबरमध्ये 'मिस यूनिव्हर्स'चं इंडिया ही स्पर्धा जिंकली होती.

2017 साली हरनाजने टाइम्स फ्रेश फेस बॅकसह तिचं करिअर सुरू केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

हरनाज संधू सौदर्य स्पर्धांमध्ये 2017 सालापासून सहभागी होत आहे. याआधी हरनाज 'मिस दीवा 2021' चा पुरस्कारही जिंकली होती.

फोटो स्रोत, Getty Images

2019 मध्ये फेमिना मिस इंडिया पंजाबचा पुरस्कार आणि 2019 मध्येच फेमिना मिस इंडिया स्पर्धेच्या टॉप-12 मध्येही तिनं जागा मिळवली होती. याशिवाय तिने अनेक पंजाबी सिनेमांमध्ये काम केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)