Got a TV Licence?

You need one to watch live TV on any channel or device, and BBC programmes on iPlayer. It’s the law.

Find out more
I don’t have a TV Licence.

थेट अहवाल देणे

सर्व वेळा यूके आधारित आहेत

 1. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबई महापालिकेची नियमावली

  1.कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेला व्यक्ती कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता त्याचं दहन करण्यात यावं.

  2.जर मृताच्या नातेवाईकानं दफन करण्याची मागणी केली, तर त्याला मुंबई शहराच्या बाहेर जाऊन कोविड- 19च्या नियमांचे पालन करावे लागेल.

  3.कोरोनाग्रस्त रुग्णांचा अंत्यसंस्कार रुग्णालयाजवळील स्मशानभूमीत करण्यात येईल. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मृतदेहाला स्पर्श करण्यास मनाई करण्यात आलीय.

  4.याशिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृतदेह घरी घेऊन जाता येणार नाही, तर रुग्णालयातून थेट स्मशानभूमीत नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तसंच अंत्यसंस्कारासाठी 5 पेक्षा जास्त जण उपस्थित राहू शकणार नाहीत.

  मुंबई महापालिकेची नियमावली
  Image caption: मुंबई महापालिकेची नियमावली
 2. दिल्लीतल्या निजामुद्दीन परिसरातल्या अनेकांना कोरोनाची लक्षणं

  दिल्लीतल्या निजामुद्दीन परिसरात एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर अनेकांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली आहे. त्यानंतर पोलिसांनी हा परिसर सील केला आहे.

  पोलिसांच्या मते, जवळपास 200 जण कुठल्याही परवानगीशिवाय इथं एकत्र आले होते, असं पीटीआय या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.

  यातल्या अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

  View more on twitter
 3. महाराष्ट्रात आज कोरोनाचे 17 नवीन रुग्ण, एकूण संख्या 220वर

  30 मार्चला राज्यात कोरोनाचे 17 नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 220वर पोहोचली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबई 8, पुणे 5, नागपूर 2, तर नाशिक आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तसंच आज राज्यात 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  जिल्हानिहाय रुग्णांची संख्या
  Image caption: जिल्हानिहाय रुग्णांची संख्या
 4. मुंबई्मध्ये कोरोनामुळे 80 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

  मुंबईतल्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू झाला आहे. lतर मुंबईमध्ये कोरोनाचा अजून पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानं राज्यातील रुग्णांची एकूण संख्या 216 झाली आहे.

 5. देशात सध्या स्थानिक संसर्गाची भीती- आरोग्य मंत्रालय

  गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 92 नवीन रुग्ण आढळले असून आता देशातील कोरोनाच्या रुग्णांची एकूणसंख्या 1071झालीआहे. कोरोनामुळे आतापर्यंत 29जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

  विकसित देशांची तुलना केल्यास आपल्या देशातील लोकांचं सहकार्य आणि सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील रुग्णांची संख्या कमी असल्याचं त्यांनी म्हटलं.

  मात्र कुणीही सोशल डिस्टन्सिंग आणि इतर मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्यास आपल्यावर वाईट परिस्थिती ओढवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

  देशात सामुदायिक संसर्गाची परिस्थिती नाहीये,तर स्थानिक संसर्गाची भीती असल्याचंही लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. जर सामुदायिक संसर्गाची शक्यता असेल, तर तुम्हाला ते सांगितलं जाईल. सध्यातरी आपण स्थानिक संसर्गाच्या स्थितीत आहोत, असं त्यांनी म्हटलं.

 6. नागपूरमध्ये शासकीय रुग्णालयातील डॉक्टर क्वारंटाईन

  नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविदयालय आणि रुग्णालयातील 9 डाॅक्टरांना कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

  या निवासी डाॅक्टरांना त्यांच्या हाॅस्टेलमध्येच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

  नागपूरमध्ये कोरोनाचे एकूण 16 रुग्ण आढळून आले आहेत.

 7. पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

  पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एका 52 वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू होते.

  उपचारादरम्यानच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

  त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

 8. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 203

  महाराष्ट्रात रविवारी (29 मार्च) कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 22 ने वाढली. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या आता 203 झाली आहे.

  या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक 10 रुग्ण मुंबईचे आहेत. 5 रुग्ण पुण्याचे, 3 नागपूरचे, 2 अहमदनगरचे आहेत. सांगली, बुलढाणा आणि जळगावमध्ये कोरोनाचे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत.

  कोरोनामधून बऱ्या झालेल्या 35 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. केईएममध्ये शनिवारी (28 मार्च) एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर रविवारी बुलडाण्यामध्ये एका 45 वर्षीय शिक्षकाचा मृत्यू झाला.

 9. बुलडाण्यात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू

  बुलडाण्यात शनिवारी (28 मार्च) मृत्यू झालेल्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती वैद्यकीय अहवालातून समोर आली आहे.

  संबंधित व्यक्ती हे एका शाळेचे मुख्याध्यापक होते. विशेष म्हणजे या 45 वर्षीय रुग्णानं कोणताही परदेश प्रवास केलेला नाहीये.

  या व्यक्तीला सुरूवातीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानं नंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

 10. आजवर बरे होऊन हॉस्पिटलमधून घरी आलेले रुग्ण

  पुणे – 15

  मुंबई – 14

  यवतमाळ – 03

  नागपूर - 01

  औरंगाबाद – 01

  एकूण 34

  View more on twitter
 11. राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 196 वर

  राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 196 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

  • मुंबई-ठाणे क्षेत्र – 107
  • पुणे-पिंपरी चिंचवड – 37
  • सांगली – 25
  • नागपूर – 13
  • यवतमाळ – 03
  • अहमदनगर - 03
  • सातारा – 02
  • सिंधुदुर्ग – 01
  • औरंगाबाद – 01
  • कोल्हापूर – 01
  • जळगाव – 01
  • बुलढाणा – 01
 12. 'या काळाची नोंद इतिहासात होईल'

  उद्धव ठाकरे म्हणाले...

  चाचणी केंद्रं वाढवली आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढेल. ही वाढ लक्षात येतीये, पण त्याचबरोबर या विषाणूनं ग्रासलेले लोक बरेही होत आहेत, ही आशादायक गोष्ट आहे.आता न्यूमोनियाची लक्षणं वाढतील. सर्दी-खोकला किंवा न्यूमोनियाचे पेशंट आले, तर त्यांना तातडीने एक्सरे आणि हिमोग्राम करायला सांगा.

  आपल्याकडे काही हजार प्रवासी आले आहेत. त्यांना आपण होम क्वारंटाईनमध्ये राहायला सांगितलं. पण ते क्वारंटाईनमध्ये राहत आहेत, की नाही हे पाहणं कुटुंबीयांची तसंच नातेवाईक, शेजाऱ्यापाजाऱ्यांची जबाबदारी आहे. हाय रिस्क ग्रुप म्हणजेच गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध, मधुमेह तसंच रक्तदाब असलेल्या व्यक्ती यांना अधिक जपणं गरजेचं आहे.

  जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात गर्दी कमी नाही झाली, तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील.

  लॉक डाऊन झाल्यानंतर पाच दिवस झाले आहेत. पुढचे दिवसही असेच निघून जातील. आपल्याला आपली जीवनशैली थोडी बदलावी लागतीये इतकंच.

  या काळाची नोंद जगाच्या इतिहासात होईल, कारण असा काळ जगानं पाहिला नाहीये.

  पाहा संपूर्ण भाषण इथे -

  View more on facebook
 13. 'कामगारांच्या राहण्याची, मोफत खाण्याची सोय करतोय'

  उद्धव ठाकरे म्हणाले...

  संपूर्ण देशात इतर राज्यातील कामगार आपापल्या राज्यात जायला उत्सुक झाले आहेत. महाराष्ट्रात असलेल्या इतर राज्यातील कामगारांनी आहे तिथंच थांबावं, अशी विनंती. कृपया गोंधळ करू नका. महाराष्ट्र सरकार तुमची काळजी घेत आहे.

  कामगारांच्या जेवण्याची तसंच राहण्याची व्यवस्था सरकार करत आहे. त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रयत्न करू नका. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यातही कामगारांची वाहतूक होता कामा नये.

  काही ठिकाणी लोक आवश्यक नसताना बाहेर पडत आहेत. मी विनंती करतो, की वर्दळ करू नका. विनाकारण सरकारला कठोर पावलं टाकायला लावू नका. ही आरोग्यविषयक आणीबाणी आहे. त्यामुळे प्रत्येकानं जबाबदारीनं वागायला हवं.

  शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळेल. सरकार तुम्हाला मदत करत आहे. तुम्हीही सरकारला पूर्ण सहकार्य करावं.

 14. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्याला संदेश

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याला उद्देशून भाषण करत आहेत. ओढवलेल्या आरोग्य संकटात सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांसह सर्वांचे आभार मानले.

  त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

  • महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील सर्व नेते माझ्यासोबत आहेत. विरोधी पक्षनेत्यांशीही मी चर्चा करत आहे. राज (ठाकरे) सोबतही माझं बोलणं सुरू आहे.सर्वच क्षेत्रातून लोक पुढे येत आहेत मदतीसाठी. मुख्यमंत्री निधीसाठी उदय कोटक यांनी 10 कोटी रुपयांची मदत केली. सर्वांचे मी आभार मानतो.केंद्राशीही आमचा संपर्क आहे. पंतप्रधान, अमित शाह यांच्याशी मी संवाद साधत आहे. केंद्राच्या योजनाही तुमच्यापर्यंत पोहोचतील.डॉक्टरांशी बोलल्यानंतर माझं मनोधैर्य वाढतं. कोरोनाशी लढणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा. डॉक्टर, पोलिस, जीवनावश्यक सेवा देणारे कर्मचारी आपल्यासाठी झटत आहेत. आपण त्यांच्यावरचा ताण किती वाढवायचा याचा विचार करायला हवा.जगभरात भीषण परिस्थिती आहे. ती दृश्यं पाहिल्यावर आपण सध्या घेत असलेली काळजी का घेत आहोत, हे लक्षात येतं.
  उद्धव ठाकरे
 15. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा सातवा बळी

  राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या मुंबईच्या 40 वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनानं बळी घेतलेल्या राज्यातील व्यक्तींचा आकडा 7 वर पोहोचला आहे.

 16. "मला माफ करा..."

  माझ्या गरीब बंधुभगिनींना वाटत असेल कसा पंतप्रधान आहे ज्याने आम्हाला या संकटात ढकललंय. त्यांची मी विशेष माफी मागतो, असं मोदी आज 'मन की बात' सुरू करताना म्हणाले.

  Modi
 17. 'सोशल डिस्टन्सिंग वाढवा आणि इमोशनल डिस्टन्सिंग कमी करा'

  पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलेली मतं -

  1. होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींसोबत काही जण गैरवर्तन करत असल्याचं माझ्या कानावर आलं. हे चुकीचं आहे. ही माणसं संशयित आहेत, दुसरा कुणी या व्हायरसला बळी पडू नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे त्यांना योग्य वागणूक द्यायला हवी.
  2. सोशल डिस्टन्सिंग वाढवा आणि इमोशनल डिस्टन्सिंग कमी करा, हे सूत्र आपण लक्षात ठेवायला हवं.
  3. फिटनसेबद्दल मी काय करतो, याविषयी व्हीडिओ अपलोड करेन. त्यातील काही गोष्टी तुमच्या कामात येईल, असा विश्वास येईल. मी काही फिटनेस एक्सपर्ट नाही, पण काही योगासनं कोरोनाच्या काळात कामी येतील, अशी मला आशा आहे.
  4. भारत करत असलेला प्रयत्न कोरोनावर मात करेन. आपण लवकरच यातून बाहेर येऊ.
  5. देशात कुठेही एखादा गरीब संकटात आढळल्यास सगळ्यात आधी आपल्याला त्याचं पोट भरायचं आहे, हीच आपली संस्कृती आहे.
  6. आज आपण घरात बंद असलो, तरी उद्या आपण घराबाहेर पडून आकाशात उडी घेणार आहोत.
  मोदींचा संदेश
 18. मोदींचा देशभरातील डॉक्टरांशी संवाद

  कोरोना व्हायरसचा सामना करण्यात सर्वांत पुढे असलेल्या डॉक्टरांशी नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमात संवाद साधला.

  दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलचे डॉ. नितीश गुप्ता यांनी मोदींना सांगितलं, "सीमेवर जवान जसं काम करतोय, तसं आम्ही काम करत आहोत. तसंच उपचारासोबत आम्हाला रुग्णांचं समुपदेशन करावं लागतं. काही रुग्ण आता बरे झाले आहेत, त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. सुरुवातीला त्यांच्यात भीती असते, पण नंतर त्यांना आत्मविश्वास मिळतो."

  तर, पुण्यातील डॉक्टर बोरसे यांनी म्हटलं, "नायडू हॉस्पिटलमध्ये कोव्हिड-9 चे 16 रुग्ण आले होते. उपचाराअंती त्यातील 7 जणांना घरी सोडण्यात आलं आहे, तर 9 जणांवर उपचार सुरू आहेत."

 19. नरेंद्र मोदींचा नागरिकांशी 'मन की बात' द्वारे संवाद

  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधताना लोकांना लॉकडाऊनमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल माफी मागितली.

  या कार्यक्रमात मोदींनी देशातील नर्स, डॉक्टर, आशा वर्कर, स्वच्छता कर्मचारी यांचे आभार मानले. या सगळ्यांसाठी 50 लाख रुपयांचा आरोग्य विमा जाहीर केल्याचं सांगितलं.

  तसंच बँकिंग, वाहतूक क्षेत्रातील क्रमाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

  View more on twitter
 20. महाराष्ट्रात एकूण 193 कोरोना पॉझिटिव्ह

  आता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 193 वर पोहोचली आहे.

  यापैकी मुंबईत 4 तर पुणे, सांगली आणि नागपुरात प्रत्येकी 1 नवा रुग्ण आढळला आहे.