Got a TV Licence?

You need one to watch live TV on any channel or device, and BBC programmes on iPlayer. It’s the law.

Find out more
I don’t have a TV Licence.

ताजे अपडेट्स

सर्व अपडेट्स UKमधील वेळेनुसार

 1. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच

  • राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाला. 790 नवे रुग्ण आढळले. 121 रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशात 2,411 रुग्ण सापडले तर 71 जणांचा मृत्यू झाला.
  • कोरोनासंदर्भात माहिती देणारं तसंच सतर्क करणाऱ्या आरोग्यसेतू अॅपवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. नागरिकांचे दैनंदिन तपशील त्यांच्या परवानगीविना घेतले जाणं तसंच डेटा प्रायव्हसी या मुद्यांवरून राहुल यांनी अॅपच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.
  • रेड झोन असलेल्या मुंबई-पुण्यातून जाण्या-येण्यास मनाई आहे. ऑरेंज झोनमध्ये काही अटींसह टॅक्सी-कॅबना वाहतूक करण्याची मुभा आहे, मात्र बस प्रवासाला मान्यता नाही.
  • मुंबईहून लखनौला जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांनी काँक्रिट मिक्सरमधून प्रवास केला. इंदूरमध्ये पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रक थांबवून या कामगारांना बाहेर आणलं. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • नाशिक इथून स्थलांतरित कामगारांसाठी भोपाळ आणि लखनौ या दोन ठिकाणांसाठी ट्रेन रवाना करण्यात आल्या. देशभरात साबरमतीहून आग्र्याला तर सुरतहून ओदिशातील बहरामपूरला ट्रेन रवाना झाली.
  • दिल्लीत अडकलेल्या UPSC परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या परतीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

  आज इथंच थांबूया. कोरोनासंदर्भातील राज्य,देश तसंच आंतरराष्ट्रीय अपडेट्ससाठी बीबीसी मराठीच्या वेबसाईटवरील लाईव्ह पेजला फॉलो करा.

  या पुढील अपडेट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

 2. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  महाराष्ट्रातले झोन 1 मे रोजी

  मुंबई शहरात सद्यस्थितीला 1576 कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत, असं मुंबई महापालिकेनं माहिती दिलीय.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: कोरोना व्हायरसवर Remdesivir औषध रामबाण ठरेल? #सोपीगोष्ट

  कोरोना व्हायरसवर Remdesivir औषध रामबाण ठरेल? #सोपीगोष्ट

 4. मालेगावात चार पोलिसांना कोरोना

  मालेगाव इथं बंदोबस्तासाठी तैनात जालना इथल्या राज्य राखीव पोलीस दलातील चौघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

  त्यांच्यावर जालना इथं उपचार सुरू आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून या पोलिसांशी संवाद साधला.

  कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत, तुम्हीही बरे व्हाल असं आरोग्यमंत्र्यांनी या पोलिसांना सांगितलं.

  View more on twitter
 5. इराणमध्ये कार पार्किंगमध्ये सिनेमाचं प्रदर्शन

  कोरोना
  Image caption: इराणमध्ये कारपार्किंगमध्ये सिनेमा दाखवण्यात आला.

  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने इराणमध्ये कार पार्किंगमध्ये सिनेमाहॉल दाखवण्यात आला. नागरिक आपल्या गाडीत बसून स्क्रीनवर सिनेमा पाहू शकतात.

  शुक्रवारी संध्याकाळी इब्राहिम हतामिकिया यांचा चित्रपट पाहण्यासाठी मिलाद टॉवरच्या कार पार्किंगमध्ये 160हून अधिक गाड्या आल्या होत्या.

  कार पार्किंगमध्ये येण्याआधी या गाड्यांचं निर्जुंतुकीकरण करण्यात आलं.

  28वर्षीय नाजनीन याच्यासाठी हा अनोखा अनुभव होता. माझ्या आईवडिलांनी अशा पद्धतीने चित्रपट पाहिले आहेत.

  इराणमध्ये 40 वर्षांपूर्वी इस्लामिक क्रांतीआधी अशा पद्धतीने चित्रपट दाखवले जात असत.

  इराणमध्ये छोटी दुकानं उघडली आहेत मात्र मॉल्स, सिनेमागृह उघडण्यास परवानगी नाही.

  इराणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 6,100 जणांचा मृत्यू झाला आहे. एक लाखाहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

 6. ब्रिटनमध्ये 24 तासात 621 जणांचा मृत्यू

  ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासात कोरोनामुळे 621जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 28,131 असा झाला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 182,260 इतक्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

 7. राज्यात आज कोरोनामुळे 36 मृत्यू; 790 नवे रुग्ण

  राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी कोरोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाला. शनिवारी 790 नव्या रुग्णांची नोंद झाली. 121 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

  राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 12,296 इतकी झाली आहे. आतापर्यंत 2,000 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 521 जणांचा मृत्यू झाला आहे.

  शनिवारी मृत्यू झालेल्यांपैकी, 27 जण मुंबईचे आहेत तर पुणे शहरातील 3, अमरावती शहरातील 2, वसई विरारमधील 1, अमरावती जिल्ह्यातील 1 आणि औरंगाबाद मनपा क्षेत्रात एकाचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील एकाचा मुंबईत मृत्यू झाला.

  शनिवारी मृत्यू झालेल्यांपैकी 28 पुरुष आणि 8 महिला आहेत. यापैकी 19 जणांचं वय 60 पेक्षा अधिक होतं. 16 रुग्ण 40-59 वयोगटातले होते. एकजण 40 वर्षांखालील होता. 33 रुग्णांपैकी 23 जणांमध्ये म्हणजेच 70 टक्के रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग अशा विकारांचा त्रास होता.

  राज्यात 844 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. राज्यात सद्यस्थितीला 1,74, 933 लोकांना घरी क्वारंटीन करण्यात आलं आहे तर 12, 623 लोकांना संस्थात्मक क्वारंटीन करण्यात आलं आहे.

 8. आजचा #CoronaPodcast

  आपल्या गावी परत जाण्यासाठी स्थलांतरितांची पुणे, नवी मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर गर्दी.

  नांदेडहून पंजाबला परत गेलेले अनेक भाविक कोरोना पाॅझिटिव्ह. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर काय केले आरोप?

  सांगतायत आजचा #CoronaPodcast मध्ये आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड

  View more on facebook
 9. राहुल गांधींची आरोग्यसेतूवर टीका

  कोरोना
  Image caption: आरोग्यसेतू अॅप

  कोरोनासंदर्भात उपयुक्त माहिती, नागरिकांना सतर्क करण्यासाठी तयार करण्यात आलेलं आरोग्यसेतू अॅप म्हणजे देशातील नागरिकांवर निगराणी ठेवण्यासाठीची व्यवस्था आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

  त्यांनी पुढे लिहिलं आहे, "एका खाजगी ऑपरेटरद्वारे हे अॅप चालवलं जातं. अॅपच्या यंत्रणेवर सरकारकडून कोणतंही संघटनात्मक नियंत्रण नाही. लोकांच्या खाजगी आयुष्यात घुसखोरी तसंच डेटा सिक्युरिटीसंदर्भात हे अॅप गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे".

  "सुरक्षित राहण्यासाठी तंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकतं मात्र नागरिकांच्या संमतीविना त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा माग ठेवणं योग्य नाही", असं राहुल यांनी म्हटलं आहे.

  आरोग्यसेतू अॅपविषयी सविस्तर वाचा इथे

  View more on twitter
 10. लष्कर करणार कोरोना योद्धांना सलाम

  कोरोनाविरुद्ध लढाईत मोलाचं योगदान देणाऱ्या वीरांचे सैन्याच्या तिन्ही दलांकडून आभार व्यक्त करण्यात येणार आहेत.

  रविवारी सकाळी या उपक्रमाला सुरुवात होईल. भारतीय सैन्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी शुक्रवारी याउपक्रमासंदर्भात तपशीलवार माहिती दिली होती.

  लॉकडाऊन काळात कर्तव्यावर असताना आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ दिल्लीसह अन्य शहरातील पोलीस स्मारकांमध्ये आदरांजली वाहण्यात येईल.

  मुंबईत नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरमधून जेजे, केईएम आणि कस्तुरबा गांधी हॉस्पिटल या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येईल. कुलाब्यातील नौदलाच्या अश्विनी हॉस्पिटललाही हा सन्मान प्राप्त होईल.

  हवाई दलांच्या विमानांकडून फ्लाय पास्ट करण्यात येईल. सकाळी दहा ते अकरा या कालावधीत हवाई दलाची विमानं देशाच्या बहुतांश भागांवरून फिरतील. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्सवर पुष्पवृष्टी करण्यात येईल.

  कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटल्सबाहेर लष्कराच्या बँडकडून देशभक्तीपर गाण्यांची धून वाजवण्यात येईल.

  नौदलाची हेलिकॉप्टर्स मुंबई, कोची, गोवा, विशाखापट्टणम इथल्या हॉस्पिटल्सवर पुष्पवृष्टी करतील. गोव्यात नौदलाकडून विमानतळाच्या धावपट्टीवर मानवी साखळी बनवून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्धांचे आभार मानले जातील.

  संध्याकाळच्या सत्रात नौदलाची पाच लढाऊ जहाजं दिव्यांनी लखलखतील. तटरक्षक दलाची 24 जहाजं दिव्यांची रोषणाई करून कोरोना योद्धांना सलाम करतील.

  लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

 11. हॅरी पॉटरच्या लेखिका जे.के.राऊलिंग 10 लाख पौंडांची मदत करणार

  कोरोना
  Image caption: लेखिका जे.के.राऊलिंग

  हॅरी पॉटरच्या लेखिका जे.के. राऊलिंग कोरोनाग्रस्तांकरता दहा लाख पौंडांचा निधी देणार आहेत. दोन चॅरिटी संस्थांना मिळून ही रक्कम राऊलिंग दान करतील.

  यापैकी एक संस्था बेघर लोकांसाठी काम करत तर दुसरी संस्था घरगुती हिंसाचाराने पीडित महिलांसाठी काम करते.

  राऊलिंग यांनी ट्वीटरवर लिहिलं आहे की, आपल्यासाठी स्वत:चं आरोग्य धोक्यात घालून घराबाहेर काम करणाऱ्यांचं योगदामन मोलाचं आहे.

 12. कोरोना व्हायरस

  कालपर्यंतची रुग्णांची आकडेवारी लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयानं नांदेडला ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट केलंय.

  अधिक वाचा
  next
 13. 24 तासात कोरोनाचे 2,411 रुग्ण; 71 मृत्यू

  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2,411 रुग्ण आढळले आहेत.

  याच कालावधीत देशभरात 71 जणांचा मृत्यू झाला आहे.

  देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 37, 776 एवढी झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 1223 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  दरम्यान 10,017 लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

 14. फ्रान्समध्ये 24 जुलैपर्यंत आरोग्य आणीबाणी

  फ्रान्समध्ये 24 जुलैपर्यंत आरोग्य आणीबाणी लागू असेल असं सरकारने स्पष्ट केलं आहे. एएफपी वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

  फ्रान्समध्ये आतापर्यंत 24, 594 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  View more on twitter
 15. एम्सच्या डॉक्टरांकडून दिल्ली पोलिसांवर पुष्पवृष्टी

  आपात्कालीन काळात जनजीवन सुरळीतपणे सुरू राखण्यात क्रियाशील दिल्ली पोलिसांना 'ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' अर्थात एम्सच्या डॉक्टरांनी पुष्पवृष्टी करून अभिवादन केलं.

  View more on twitter
 16. साबरमतीहून आग्र्याला तर सुरतहून बहरामपूरला ट्रेन रवाना

  स्थलांतरित कामगारांना घरी परतता यावं यासाठी गुजरातमधील साबरमती इथून उत्तर प्रदेशातील आग्र्यासाठी तर सुरतहून ओदिशामधील बहरामपूरसाठी विशेष ट्रेन रवाना झाली.

  सुरत-बहरामपूर ट्रेनमध्ये 1200 कामगार प्रवास करत आहेत. या सर्वांची स्टेशनवर आरोग्य चाचणी घेण्यात आली. ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून ही ट्रेन रवाना करण्यात आली आहे.

  View more on twitter
 17. स्थलांतरित कामगारांसाठी छत्तीसगढची २८ ट्रेन्सची मागणी

  देशाच्या विविध भागांमध्ये अडकलेल्या 1.17 लाख स्थलांतरितांना छत्तीसगढमध्ये परत आणण्यासाठी २८ ट्रेन्सची व्यवस्था करण्याची विनंती छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे.

  21 राज्यं आणि 4 केंद्रशासित प्रदेशात छत्तीसगढचे कामगार कार्यरत आहेत.

  या कामगारांना विनाशुल्क प्रवास करू द्यावी अशी विनंतीही त्यांनी रेल्वे मंत्र्यांना केली आहे.

  View more on twitter
 18. काँक्रीट मिक्सरमधून स्थलांतरितांचा जीवघेणा प्रवास

  View more on facebook

  महाराष्ट्रातून लखनौला जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित कामगारांनी काँक्रिट मिक्सर ट्रकच्या मिक्सरमधून जीवघेणा प्रवास केला.

  इंदूरमध्ये पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रक थांबवून या लोकांना बाहेर काढलं. ट्रक पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आला असून, त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं डीएसपी उमाकांत चौधरी यांनी सांगितलं.

 19. ऑरेंज झोनमध्ये वाहतुकीसंदर्भात खुलासा

  ऑरेंज झोन क्षेत्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसंच जिल्हांतर्गत बस वाहतूक बंद राहील असं गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

  त्याचवेळी टॅक्सी आणि कॅब्स यांना एक ड्रायव्हर आणि दोन प्रवासी अशी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  वाहतुकीची परवानी देण्यात आलेल्या वाहनांना आंतरजिल्हा वाहतूक करता येईल, यामध्ये एक ड्रायव्हर आणि जास्तीज जास्त दोन प्रवासी अशीच वाहतूक करता येईल.

  View more on twitter
 20. दिल्लीत अडकले UPSCचे विद्यार्थी; खासदार श्रीकांत शिंदेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

  View more on twitter

  राजधानी दिल्लीत UPSC परीक्षेच्या तयारीसाठी आलेले 1100 हून अधिक विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. त्यांच्या राज्यात परत जाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं आहे.

  "परीक्षेच्या तयारीनिमित्ताने ही मुलंमुली दिल्ली होते. लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते दिल्लीत अडकून पडले. त्यांच्याकडचा जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपत चालला आहे. दीड महिना ही मुलं घरापासून दूर असल्याने त्यांचे पालक चिंतेत आहेत. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परतायचं आहे. त्यासाठी ट्रेनची किंवा बसेसची उपाययोजना करावी", असं खासदार शिंदे यांनी म्हटलं आहे.

  दिल्लीत अडकलेल्या या मुलांची जिल्हानिहाय यादीही त्यांनी सादर केली आहे.