नाना पटोलेंचा भाजपला रामराम, गुजरातमध्ये देणार काँग्रेसला हात

गुजरात निवडणुकीत भाजपविरुद्ध हार्दिक पटेलबरोबरच आता नाना पटोलेंनीही काँग्रेसच्या हातात हात घातला आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले नाना पटोले यांनी गुजरातच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या आदल्या दिवशी खासदारकीचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

गेले अनेक दिवस केंद्र आणि राज्य सरकारबद्दलची नाराजी जाहीरपणे व्यक्त करणारे पटोले तसं मनाने भाजपपासून आधीच दूर गेले होते.

विशेष म्हणजे ते 11 डिसेंबरला गुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. मात्र काँग्रेस प्रवेशाची घोषणा त्यांनी अजून केलेली नाही.

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित नसताना गुजरातच्या प्रचारात काँग्रेससोबत सहभागी का होत आहात? या बीबीसीच्या प्रश्नावर पटोले म्हणाले, "मी कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अजून निश्चित केलेलं नाही. मात्र सध्याचं सरकार हे फसवणारं सरकार आहे. त्यांना विरोध करणाऱ्यांसोबत जायचं ही माझी भूमिका आहे."

मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला म्हणून आपण राजीनामा देत आहोत, असं पटोलेंचं म्हणणं आहे.

"शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, हमीभावाचं आश्वासन पाळलं गेलं नाही, स्वामीनाथन आयोगाच्या तरतुदी लागू केल्या गेल्या नाहीत, ही देखील माझ्या राजीनाम्याची कारणं आहेत," असं त्यांनी सांगितलं.

Image copyright NANA PATOLE
प्रतिमा मथळा नाना पटोले यांनी दिलेल्या राजीनाम्याची प्रत

"गेल्या हिवाळी अधिवेशनात खासदारांच्या बैठकीत मी शेतकऱ्यांच्या आणि ओबीसींच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावरून मोदी रागावले आणि त्यांनी मला खाली बसण्याचा इशारा केला. त्याच वेळी त्यांच्याबाबत माझा भ्रमनिरास झाला," असंही नाना पटोले म्हणाले.

पटोलेंच्या राजीनाम्यामागे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भाजप नेत्यांशी असलेली जवळीक हेही कारण आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

"पण मला प्रफुल्ल पटेलांची कसलीही भीती नाही. या कारणासाठी राजीनामा द्यायचा असता तर मी निवडणुकीआधी दिला असता," अशी स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)