पाहा व्हीडिओ : लग्नाच्या मांडवात जेव्हा वाघोबा पाहुणा म्हणून येतो...
लग्नात अनपेक्षित पाहुणा आला, तर गडबड होणं स्वाभाविक आहे. पण तो पाहुणा जर वाघ असेल तर?
13 डिसेंबरला मध्य प्रदेशातल्या मनूसखापा गावात असाच प्रसंग घडला.
वाघ बघून वऱ्हाड्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यातल्या काही हौशी मंडळींनी त्याचा व्हीडिओही रेकॉर्ड केला.
या लग्नात धुमाकूळ घातल्यानंतर हा वाघ मध्य प्रदेशाची सीमा ओलांडून महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात शिरला.
महाराष्ट्रात आल्यानंतर या वाघाने नागपूरमधील कानाडोंगरी परिसरातील एका महिलेवर हल्ला केला. जखमी महिलेचं नाव शांताबाई झिंगरू करकडे असं आहे. त्यांना आता तुमसर इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत बीबीसीशी बोलताना भंडाऱ्याचे विभागीय वन अधिकारी विवेक गोसिंग म्हणाले, “सध्या वन विभागाची १५-२० लोकांची टीम या वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहे. सध्या हा वाघ भटकंती करतो आहे. वाघ एका ठिकाणी थांबल्यावर आम्ही त्याला पकडण्यासाठी मुख्य वन संरक्षक (वाईल्ड लाईफ) यांच्याकडे पिंजरा लावण्याची परवानगी मागितली आहे. अद्याप ती मिळालेली नाही.”
परिसरातील लोकांना सावध राहण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.
(स्टोरी: गजानन उमाटे, बीबीसी मराठीसाठी)
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)