हा जयललितांचा अखेरचा व्हीडिओ होता का?

हा जयललितांचा अखेरचा व्हीडिओ होता का?

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला, असा अनेकांनी आरोप केला आहे. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शशिकलांच्या गोटातून एक व्हीडिओ बुधवारी रिलीज करण्यात आला. या व्हीडिओमध्ये जयललिता हॉस्पिटलच्या बेडवर रेलून बसलेल्या दिसत आहेत.

या व्हीडिओमध्ये जयललिता टीव्ही पाहात असाव्यात, असं दिसत आहे. त्यांच्या डाव्या हातात जूसचा ग्लास आहे आणि त्या टीव्ही पाहात जूस पिताना दिसत आहेत.

शशिकला यांनी जयललितांना बेशुद्धावस्थेत रुणालयामध्ये दाखल केलं आणि त्यांची नीट काळजी घेतली नाही, असा आरोप शशिकलांचे पक्षांतर्गत विरोधक करतात.

त्यांना उत्तर म्हणून मी हा व्हीडिओ रिलीज केला, असं शशिकला समर्थक आमदार पी. वेट्रिवेल यांनी म्हटलं.

जयललिता यांच्या मृत्यूबद्दल अनेक वाद असल्यामुळे अलीकडेच एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवरही हा व्हीडिओ रिलीज करण्यासाठी शशिकला गटावर दबाव वाढत होता.

पोटनिवडणुकीसाठी मृत्यूचं राजकारण?

हा व्हीडिओ नेमका जयललितांच्या आर. के. नगर या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आदल्या दिवशी रिलीज केल्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदान संपेपर्यंत, म्हणजे गुरुवारी संध्याकाळी सहापर्यंत या व्हीडिओच्या प्रसिद्धीवर बंदी घातली.

या व्हीडिओ रिलीज करण्याचा पोटनिवडणुकीशी संबंध नाही, असा दावा वेट्रिवेल यांनी केला.

पण हा व्हीडिओ जयललितांच्या निधनापूर्वी काही दिवसआधींचा आहे का आणि अपोलो रुग्णालयातलाच आहे का, हे बीबीसी तपासू शकलं नाही.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)