पाहा व्हीडिओ : सैनिकाच्या थोबाडीत मारली म्हणून तुरुंगात रवानगी

पाहा व्हीडिओ : सैनिकाच्या थोबाडीत मारली म्हणून तुरुंगात रवानगी

इस्राईलच्या सैनिकाच्या थोबाडीत मारल्यामुळे 17 वर्षांच्या आहेद तामिमीवर इस्राईलच्या लष्करी न्यायालयात खटला सुरू आहे.

वेस्ट बॅंक भागातील नाबी सालेह या भागात ती राहते. तिला अटक झाल्यापासून तिचा व्हीडिओ सोशल मीडियावर गाजत आहे.

15 डिसेंबर रोजी तिनं आपल्या घरासमोर सैनिकाच्या थोबाडीत मारली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी तिला इस्राईली सैनिकांनी ताब्यात घेतलं. तिच्यावर इस्राईलच्या लष्करी न्यायालयात खटला सुरू आहे.

तिच्या आईनं हा प्रसंग चित्रित केला. त्यांना देखील अटक करण्यात आली.

तिचं घर वेस्ट बॅंक भागातील नाबी सालेहमध्ये आहे. वेस्ट बॅंक हा वादग्रस्त भाग आहे. वेस्ट बॅंकचा बहुतांश भाग इस्राइलच्या ताब्यात आहे तर काही भागावर पॅलेस्टाइनचा ताबा आहे. हा भाग गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्षग्रस्त आहे.

"इस्राईली सैनिक घरात घुसले, त्यांनी जमीन बळकवली आणि ते कुणालाही मारू शकतात. त्यामुळे तिनं त्यांना मारलं," असं आहेदचे वडील बस्सेम तामिमी यांनी म्हटलं.

पॅलेस्टिनी नागरिक आणि इस्राईलच्या सैनिकात नेहमी संघर्ष होताना दिसतो. आहेदच्या चुलत भावाला सैनिकांनी गोळी मारली त्यात त्याला कवटीचा काही भाग गमवावा लागला. त्यानंतर तिने त्या सैनिकाला मारलं.

लहानपणापासूनच आहेद तामिमी इस्राईली सैनिकांविरुद्धच्या प्रदर्शनात सहभाग घेते. तिची सुटका करावी अशी मागणी पॅलेस्टाइनचे नागरिक करत आहेत.

लष्करी न्यायालयात गेलेल्या प्रत्येक आरोपीला दोषी ठरवण्यात येतं, असं संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात म्हटलं आहे.

सत्ताधारी लिकूड पक्षाचे खासदार ओरेन हझन यांनी तिच्या अटकेचं समर्थन केलं आहे. "ती आज लहान आहे तर तिनं सैनिकाच्या थोबाडीत मारली उद्या चालून ती सैनिकाचा चाकूने गळा चिरेल," असं ते म्हणाले. "इस्राईलने कुणाची जमीन बळकावली नाही, कुठलाही प्रांत ताब्यात घेतलेला नाही," असं हझन म्हणाले.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)