पाहा व्हीडिओ : फक्त तीन लोकांची भाषा त्यांच्यासोबतच संपणार?

पाहा व्हीडिओ : फक्त तीन लोकांची भाषा त्यांच्यासोबतच संपणार?

उत्तर पाकिस्तानच्या दुर्गम खोऱ्यामध्ये बादेशी भाषा बोलली जाते. ही भाषा बोलणारे आता फक्त तीन जणच या जगात जिवंत आहेत. त्यांच्या मृत्यूसोबतच ही भाषा संपण्याची भीती आहे.

हा अगदी छोटा समुदाय आहे. या समुदायातल्या लोकांनी इतर प्रचलित भाषा बोलणाऱ्या महिलांशी लग्न केलं. त्यामुळे ही भाषा आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

"मागच्या पिढीपर्यंत संपूर्ण गावात बादेशी बोलली जात होती," रहीम गुल म्हणतात.

"पण जेव्हा आम्ही तोर्वली भाषा बोलणाऱ्या समुदायातील महिलांशी लग्न केली, तेव्हापासून आमची मुलंही हीच भाषा बोल लागली. बादेशी भाषा आता संपत चालली आहे," असं निरीक्षणही गुल नोंदवतात.

खरं तर तोर्वली भाषेलाही पश्तू भाषेकडून धोका आहे. पण अजूनही या भागात ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जात असल्यानं टिकून आहे. ते भाग्य बादेशी भाषेच्या वाट्याला मात्र आलं नाही.

या भागात रोजगाराची साधनं नसल्यानं इथली मंडळी स्वात जिल्ह्यात पर्यटनाचा व्यवसाय करतात. तिथं त्यांनी प्रचलित पश्तु भाषा शिकली आहे. तिथं याच भाषेत सर्वं व्यवहार चालतात.

आता तर परिस्थिती अशी आहे की, बादेशी भाषेचा वापर करण्याची संधी फारच कमी मिळत असल्यानं या गावातले हे तिघे ही भाषा विसरत चालले आहेत.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)