'तुला चित्रपटात काम करायचं असेल तर माझ्यासोबत झोपावं लागेल'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

BBC EXCLUSIVE : राधिका आपटे आणि उषा जाधव जेव्हा कास्टिंग काऊचबद्दल बोलतात...

बीबीसीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये अभिनेत्री राधिका आपटे आणि उषा जाधव यांनी बॉलिवूडमध्ये होणाऱ्या कास्टिंग काऊचबद्दल त्यांचे अनुभव आणि मतं व्यक्त केली आहेत.

"तुला या चित्रपटात काम करायचं असेल तर माझ्यासोबत झोपावं लागेल," असं अभिनेत्री उषा जाधवला सांगण्यात आलं होतं. उषा जाधव राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे.

"कामाच्या बदल्यात माझ्याकडून लैंगिक संबंधांची अपेक्षा करण्यात आली. मी नाही सांगितलं तेव्हा त्यानं मला काम देण्यास नकार दिला तसंच तुला या इंडस्ट्रीमध्ये कुणीही काम देणार नाही असंही ऐकवलं," असं उषा पुढे सांगते.

"तर अभिनेत्री म्हणून वावरायचं असेल तर सेक्स करण्यात तू आनंद मानला पाहिजे," असं एका अनामिक अभिनेत्रीला सांगण्यात आलं होतं.

या अनामिक अभिनेत्रीनं तिचा अनुभव सविस्तरपणे सांगितला आहे. एका कास्टिंग एजंटनं कशा प्रकारे तिचं लैंगिक शोषण केलं याचं कथन तिनं बीबीसीच्या मुलाखतीमध्ये केलं आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे याबाबत उघडपणे बोलते. तिनं बीबीसीबरोबर बोलताना तिची भीती व्यक्त केली आहे.

"बॉलिवूडमधल्या लैंगिक शोषणाबद्दल बोलायचं म्हटल्यास लोकांना भीती वाटते, कारण इथं काही लोकांना देव मानलं जातं," असं राधिका सांगते.

"पण, त्याचवेळी हे सगळं भोगणाऱ्या, पण करिअरपोटी गप्प राहणाऱ्या सर्वांबाबात मला सहानुभूती वाटते," असंही राधिका सांगते.

हॉलिवूड प्रमाणेच बॉलिवूडमध्येही सर्वांनी एकत्र येत असे प्रकार थांबवले पाहिजेत, अशी मागणी राधिकानं केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)