पाहा व्हीडिओ : 'मुख्यमंत्र्यांच्या सहीचं प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ झालं नाही'

पाहा व्हीडिओ : 'मुख्यमंत्र्यांच्या सहीचं प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ झालं नाही'

18 ऑक्टोबर 2017ला हिंगोली जिल्ह्यातल्या साटंबा गावातल्या 13 शेतकऱ्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या पात्र शेतकऱ्यांचा सत्कार केला होता. या शेतकऱ्यांपैकी एक आहेत मनकर्णाबाई कैलास तपासे.

“तुमचं कर्ज माफ झालं असं सांगून आम्हाला प्रमाणपत्र दिलं. पण आता दिवाळीला या गोष्टीला 1 वर्षं होईल, तरी अजून आमचं कर्ज माफ झालेलं नाही,” मनकर्णाबाई सांगायला सुरुवात करतात.

2 एकर शेती असलेल्या मनकर्णाबाई यांच्या पतीनं 2016मध्ये या बँकेतून 50,000 रुपये पीक कर्ज घेतलं होतं.

“आमचे मालक दर आठवड्याला बँकेत चकरा मारतात. पण तिथले साहेब लोक म्हणतात, तुमचं कर्ज माफ झालं नाही, तुम्ही आमच्याकडे येऊ नका,” बँकेतील अनुभवाबद्दल मनकर्णाबाई सांगतात.

“कर्ज माफ झालं नाही त्यामुळे आम्ही सावकाराचं कर्ज उचलून पेरण्या केल्या. यंदा डबल पेरणी झाली. दोन पेरण्या झाल्यावर काय येणार शेतात? डबलच्या पेरणीला जास्त काही येत नाही,” मनकर्णाबाई त्यांची चिंता व्यक्त करतात.

“बाकीच्यांचं कर्ज माफ होत आहे. पण आमचं काहीच नाही अजून. नुसते सत्कारच झाले आमचे. कर्जमाफ झालं तर पुन्हा आम्हाला पुन्हा कर्ज मिळेल, सावकाराकडे जायची पाळी येणार नाही,” मनकर्णाबाई पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)