#5मोठ्याबातम्या : बाँब बनवण्याप्रकरणी अटक झालेले वैभव राऊत सनातनचे साधक?

संग्रहित छायाचित्र Image copyright AFP
प्रतिमा मथळा संग्रहित छायाचित्र

पाहूयात वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. स्फोटकांचा साठा जप्त

मुंबई जवळच्या नालासोपाऱ्यात राहाणाऱ्या वैभव राऊत यांच्या घरातून ATS ने (दहशतवाविरोधी पथक) मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. याविषयीची बातमी एबीपी माझाच्या वेबसाईटनं दिली आहे.

या छाप्यात 8 देशी बाँब मिळाले आहेत तर घरापासून जवळच असलेल्या त्यांच्या दुकानात बाँब बनवण्याची सामुग्री सापडली आहे. त्यात गनपावडर आणि डिटोनेटरचाही समावेश आहे.

वैभव राऊत हे सनातनशी संलग्न असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी राऊत सनातनचे कार्यकर्ते नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत आणि त्यांना शक्य ती मदत आम्ही करू असंही त्यांनी म्हटलं आहे.

2. मराठा आरक्षणासाठी बंद पुकारणाऱ्यांविरोधात याचिका

मराठा आरक्षणासाठी राज्यभर बंद पुकारणाऱ्यांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबतची बातमी लोकसत्तानं दिली आहे.

या बंद दरम्यान सार्वजनिक तसंच खाजगी मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, आंदोलकांसह बंदची हाक देणाऱ्या आयोजकांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी, तसंच त्यांना यापुढे कोणत्याही प्रकारचे बंद पुकारण्यासाठी मनाई करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

Image copyright Getty Images

सामाजिक कार्यकर्ते अरूण बावलकर यांच्यामार्फत अॅड आशिष गिरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला वा संघटनेला बंद पुकारण्यास सुप्रीम कोर्टानं मज्जाव केलेला आहे.

बंद दरम्याना झालेल्या नुकसानाची नुकसानभरपाई वसूल करण्याबाबत नियमावलीही सुप्रीम कोर्टानं 2003 मध्ये आखून दिलेली आहे. याचाच आधार घेत याचिकाकर्त्यांनी ही मागणी केली आहे.

3. शिवसेना नेते अंबादास दानवेंनी आंदोलकाला लाथाडलं

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मराठा आंदोलकाने खालच्या पातळीवर शिव्या दिल्या, असा आरोप करत संतप्त अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला अक्षरश: लाथडलं आहे. बातमी एबीपी माझाच्या वेबसाईटनं दिली आहे.

Image copyright Facebook

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मराठा आंदोलकानं खालच्या पातळीवर शिव्या दिल्या त्यामुळे आपण हे केल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

"माझ्या नेत्याला कोणी खालच्या पातळीवरच्या शिव्या देत असेल तर मी ऐकून घेऊ शकत नाही. अन्यथा माझ्या त्या पदावर राहाण्याचा काहीच अर्थ नाही," असं ते म्हणाले. आपण त्या आंदोलकावर धावून गेलो, पण त्याला लाथाडलं नाही असं ते पुढे म्हणाले.

दरम्यान मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या वेळेस आंदोलकांनी औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीतल्या सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड केली.

उद्योगांना संरक्षण देण्याची गरज आहे. कंपन्या फोडल्याने आमचं मोठं नुकसान झालं आहे. आमच्या उद्योगांना संरक्षण मिळणार नसेल तर आम्हालाही गुंतवणूक करण्यावर विचार करावा लागेल असं उद्योजक संघटनेचं म्हणण आहे.

4. केरळमध्ये पुरस्थिती, 26 ठार

केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान २६ जणांचा मृत्यू झाला आहे. याविषयीचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे मदत मागितली आहे.

Image copyright Getty Images

इडुक्की आणि मलप्पुरम या दोन जिल्ह्यांत १७, वायनाडमध्ये ३, कन्नूरमध्ये २ तर कोझिकोडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. इडुक्की येथे दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.

5. जनावरांच्या निर्यातीला सरकारची बंदी

जनावरांच्या निर्यातीत वाढ होऊनही सरकारनं त्यांच्या देशातील बंदरांवरून होणाऱ्या निर्यातीला बंदी घातली आहे. याविषयीची बातमी इंडियन नं दिली आहे.

2016-17 मध्ये जनावरांच्या निर्यातीतून आलेलं उत्पन्न होतं 527.40 कोटी होतं. यावर्षी मात्र ही निर्यात खालावून 411.02 एवढी झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Image copyright Getty Images

प्राणी हक्क संघटनांच्या प्रदर्शनांनंतर ही बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी अनिश्चित काळासाठी घालण्यात आली आहे. यादरम्यान देशातील बंदरांमधून प्राण्याची निर्यात करता येणार नाही.

हेही वाचलंत का?