तैवानमध्ये समलैंगिक विवाहांवर जनतेत होणार सार्वमत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तैवान समलैंगिक विवाहांना मान्यता देणार? आज होतंय सार्वमत

तैवानमध्ये समलैंगिक विवाहाला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिल्यानंतर यावर कायदा करण्यात यावा किंवा करू नये, यासाठी सार्वमत घेतलं जात आहे. हा कायदा आणण्यासाठी तैवान सरकारकडे दोन वर्षांची मुदत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयांचं इथल्या समलैंगिक जोडप्यांनी स्वागत केलं आहे. मात्र इथल्या संघटनांनी आणि काही पालकांनी याला कडवा विरोध केला आहे. या पालकांच्या म्हणण्यानुसार, या कायद्यामुळे लग्नसंस्थेच्या मूळ संकल्पनेला तडा जाईल आणि पुढच्या पिढीला काय शिकवणूक द्यावी हा प्रश्नही उपस्थित होईल.

तर आमच्या प्रेमाच्या निखळ भावनेला विरोध करणाऱ्यांनी जाणून घ्यावं, असं समलैंगिक जोडप्यांचं म्हणणं आहे.

तैवानचे लोक या कायद्याच्या विरुद्ध कौल देतील, असं गेल्याच आठवड्यात घेण्यात आलेल्या मतदानपूर्व कल चाचणीत दिसून आलं. पण जर कौल याविरुद्ध आला तर तैवान समलैंगिक विवाहांना मान्यता देणारा आशियातलं पहिलं ठिकाण ठरेल.

शनिवारी होत असलेल्या या सार्वमतात या एका प्रश्नाशिवाय नऊ आणखी मुद्द्यांवर लोकांची मतं घेण्यात येत आहेत. यापैकी एका प्रश्न चीनबरोबर तणाव निर्माण करणारा ठरू शकतो - "2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये तुम्हाला कोणत्या नावाने सहभागी व्हायला आवडेल, तैवान की चिनी तैपेई?"

सध्या तैवान चिनी तैपेई याच नावाने भाग घेतं, कारण 1980 मध्ये पितृराष्ट्र चीनबरोबर त्यांचा तसा करार झाला होता.

हा दोन्ही पक्षांसाठी जरा कळीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. 1949 पासून तैवान स्वायत्ततेने राज्य करत असला तरी चीन त्याला स्वतःपासून विभक्त झालेला आपल्याच राष्ट्राचा एक प्रदेश मानतो, जो एक दिवस पुन्हा देशात विलीन होईल.

स्थानिक निवडणुकांबरोबरच होत असलेल्या या सार्वमताचे निकाल शनिवारी उशिरा येणं अपेक्षित आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)