ग्रॅमी अवॉर्ड 2019 मध्ये लेडी गागा, चाइल्डिश गॅम्बिनो यांचा दणका

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
On the Grammys red carpet

जागतिक संगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा रविवारी लॉस अँजेलिसमध्ये पार पडला. प्रसिद्ध पॉप सिंगर लेडी गागा, चाइल्डिश गॅम्बिनो, ब्रँडी चार्ली या कलाकारांनी संगीत क्षेत्रातील दमदार कामगिरीसाठी ग्रॅमी पुरस्कार पटकावले आहेत.

यंदा ग्रामी पुरस्कारांचं 61वं वर्ष आहे. 15 वेळा ग्रॅमी पुरस्काराची मानकरी ठरलेली गायिका अलिसिया कीज हिने यंदा ग्रामी पुरस्कारांचं सूत्रसंचालन केलं.

...अॅण्ड द विनर्स आर

चाइल्डिश गॅम्बिनोचं 'This is America' हे गाणं यंदा सर्वोत्कृष्ट गाणं ठरलं. त्याशिवाय, बेस्ट म्युझिक व्हीडिओ आणि बेस्ट रॅपचे पुरस्कारही याच गाण्याने पटकावले. पण गॅम्बिनो (खरं नाव अभिनेता डोनाल्ड ग्लोव्हर) यांनी चार पुरस्कार पटकावतानाच अमेरिकेच्या सामाजिक तसंच राजकीय परिस्थितीवर परखड टीका केली.

अमेरिकेत माथेफिरू बंदूकधाऱ्यांकडून सातत्याने होणारे हल्ले, अमेरिकेतील राजकीय परिस्थिती, कृष्णवर्णीय म्हणून अमेरिकेत जगणे, हा सगळा पट 'चाइल्डिश गॅम्बिनो'ने आपल्या 'This is America' या गाण्यातून मांडला आहे.

लेडी गागाने तीन ग्रॅमी पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. तिचं 'Where do you think you are going?' हे गाणं सर्वोत्कृष्ट सोलो परफॉर्मन्स ठरलं.

ब्रॅडली कूपरसोबत तिनं गायलेलं 'Shallow' या गाण्यानं 'सर्वोत्कृष्ट ग्रुप परफॉरमन्स'चा ग्रॅमी पटकावला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लेडी गागा

दरम्यान, लंडनमधल्या ब्रिटिश अकॅडेमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA) 2019चा बेस्ट ओरिजनल म्युझिक अवॉर्ड म्यूझिकल रोमँटिक ड्रामा 'A Star is Born'ला मिळालं आहे.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर लेडी गागाने आपल्या ट्विटर अकाउंट वरून, "मला विश्वास बसत नाहीए की आम्हाला हा पुरस्कार मिळालाय. माझी खूप इच्छा असून देखील मी हा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहू शकत नाहीए, करण मी इथे ग्रॅमीमध्ये आहे. आम्ही संगीतावर आधारित चित्रपट बनवला. हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे... माझं जग आहे. आमच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभार. तुमच्याशिवाय हे शक्य झालं नसतं," असं तिनं म्हटलं आहे.

ग्रॅमी पुरस्काराचा इतिहास

जगभरात संगीत क्षेत्रात ग्रॅमी पुरस्काराला वेगळा मान आहे. अमेरिकेतील नॅशनल अॅकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा 4 मे 1959 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेल्स आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये एकाच वेळी झाला होता. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं जात आहेत.

2004 पासून हा सोहळा लॉस एंजेल्सच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)