सौदी अरेबियावर पाकिस्तानला दूर ठेवण्यासाठी दबाव वाढवणार का नरेंद्र मोदी?

प्रिन्स मोहम्मद बिन सलमानाच्या स्वागताला नरेंद्र मोदी एअरपोर्टवर

फोटो स्रोत, MEAINDIA

फोटो कॅप्शन,

प्रिन्स मोहम्मद बिन सलमानाच्या स्वागताला नरेंद्र मोदी एअरपोर्टवर

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.

मंगळवारी रात्री स्वत: नरेंद्र मोदी त्यांच्या स्वागतासाठी एअरपोर्टवर पोहोचले होते.

विशेष म्हणजे याआधी प्रिन्स सलमान दोन दिवसांच्या पाकिस्तान भेटीवर होते.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला आहे. याचा परिणाम प्रिन्स सलमान यांच्या द्विपक्षीय भारत दौऱ्यावर पडू शकतो असं तज्ज्ञ सांगतायत.

भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे सौदीचे प्रिन्स सलमान भारताला जास्तीत जास्त तेलाची विक्री करू इच्छित आहेत. आणि हीच त्यांची रणनीती आहे असं सांगितलं जातंय.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रिन्स सलमान यांच्यात चर्चा होईल. ज्यात पुलवामात जवानांवरील झालेला हल्ला केंद्रस्थानी असेल.

सोमवारी इस्लामाबामध्ये सौदीचे परराष्ट्र मंत्री आदेल अल जुबैर यांनी म्हटलं होतं की, "आमचा हेतू दोन्ही देशांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्याचा आहे. तसंच शांततापूर्ण मार्गाने आणि चर्चेनं तणाव, मतभेद मिटवण्याचा काही मार्ग आहे का? हे आम्ही पाहात आहोत"

फोटो स्रोत, SAUDI EMBASSY

फोटो कॅप्शन,

भारताचे आणि सौदी अरबचे संबध फार जुने आहेत.

पुलवामा हल्ल्याआधी सौदीचे प्रिन्स सलमान यांच्या भारत दौऱ्याचा मुख्य हेतू हा तेल विक्री आणि आर्थिक गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने होता.

मात्र आता बदललेल्या स्थितीत राजकीय चर्चा होणं अनिवार्य आहे.

भारत या क्षणाला एकूण गरजेच्या 20 टक्के तेल सौदी अरेबियातून आयात करतो.

त्याशिवाय सर्वाधिक तेलाची खरेदी भारत इराणकडून करतो. सौदीला इराणपेक्षा अधिक तेल भारतीय बाजापेठेत खपवायचं आहे.

याआधी सौदीचे प्रिन्स सलमान रविवारी पाकिस्तानात पोहोचले, जिथं त्यांचं जोरदार स्वागतही झालं.

पाकिस्तान वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी त्यांना सलामी दिली होती. आणि पंतप्रधान इम्रान खान स्वत: गाडी चालवत त्यांना एअरपोर्टवरून घरी घेऊन गेले होते.

सौदी प्रिन्स सलमान यांनी पाकिस्तानशी असलेल्या आपल्या जवळीकतेबद्दल म्हटलं होतं की, भविष्यातही सौदी पाकिस्तानचा मजबूत सहकारी म्हणून राहू इच्छितो.

त्यांनी पाकिस्तानच्या दौऱ्यात तब्बल 20 अब्ज डॉलरचे सामंजस्य करार केले. ही सौदीनं पाकिस्तानमध्ये केलेली अभूतपूर्व गुंतवणूक मानली जाते.

याशिवाय पंतप्रधान इम्रान खान यांच्या विनंतीवरून त्यांनी सौदीच्या तुरूंगात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्याचेही आदेश दिले होते.

फोटो स्रोत, Getty Images

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते भारतात आले आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे दोन देशांतील तणावाचा परिणाम त्यांच्या या व्यावसायिक भेटीवर होऊ शकतो.

सौदी अरेबियासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी उत्तम संबंध असणं गरजेचं आहे. त्यामुळेच बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात होणाऱ्या चर्चेकडे आणि त्यानंतर होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारत गेल्या काही वर्षापासून जोरदार प्रयत्न करत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)