मुख्यमंत्री साहेब, 'जरा गावात फिरा, खरं काय ते कळेल'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक गावात काय आहे परिस्थिती? - पाहा व्हीडिओ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016मध्ये 'आमदार आदर्श ग्राम योजने'अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील फेटरी गाव दत्तक घेतलं आहे.

फेटरी गावात आमची भेट शीला बानाईत यांच्याशी झाली. त्यांच्या घराबाहेरून नाल्याचं पाणी वाहतं. या पाण्यामुळे त्रास होतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

त्या म्हणतात, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बायको आमच्या इथं येते. ते कार्यक्रमापुरती येते आणि चालली जाते, आमचं असं म्हणणं आहे की, तुम्ही गावात फिरा, म्हणजे तुम्हाला सत्य परिस्थिती कळेल. गावात रस्ते कसे आहेत, नाल्या कशा आहेत, ते पाहा आणि त्यांच्याकडे लक्ष द्या."

"आमच्या घरासमोरून नाल्याचं पाणी वाहतं. पाऊस आला की, ते घरात जातं. इतका त्रास आहे की, नाल्यामुळे मच्छर होत आहेत. आमचे लहान-लहान पोरं आहेत, सापं निघतात इथं. समजा एखाद्या पोराला काही कमी जास्त झालं, तर कोण जबाबदार राहणार आहे त्याला? रस्त्यावर पाय घसरतात, कुणी पडलं, मोडलं, तर कोण जबाबदार राहणार आहे?" त्या पुढे सांगतात,

गावात घरोघरी संडासचं बांधकाम झाल्याचं दिसून येतं. गावातील बहुसंख्य लोक संडासचा वापर करतात, असं गावकरी सांगतात. याशिवाय गावात 33KVचं सबस्टेशन झालं आहे. त्यामुळे लोडशेडिंग होत नाही, असंही गावकरी सांगतात.

गावातल्या जलशुद्धीकरण केंद्रामुळे गावकऱ्यांना पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत असल्याचं दिसून आलं.

"गावात 18 कोटी रुपयांच्या निधीतून भरपूर विकास झाला आहे," असं फेटरीच्या सरपंच धनश्री ढोमणे यांनी सांगितलं.

रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे

शूट - शाहिद शेख

एडिट - सदफ खान

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)