कोरोना व्हायरसः अमेरिकेची अर्थव्यवस्था बुडत चालली आहे का?

ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

तो दिवस होता 4 फेब्रुवारी 2020. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण देत होते.

“नोकऱ्या वाढू लागल्या आहेत. लोकांचं उत्पन्न वाढू लागलंय. गरीबी कमी होऊ लागलीय. गुन्हेगारी आटोक्यात येऊ लागली आहे. देश आणखी प्रगती करत आहे,” हे सगळे ट्रंप यांच्या भाषणात होते.

अमेरिकेची अर्थव्यवस्था जवळपास 21.44 ट्रिलयन डॉलर्सवर पोहोचली आहे, असंही म्हणाले.

म्हणजे या आकड्यांची इतर देशांच्या अर्थव्यस्थेसोबत तुलना करायची झाली तर चीनची अर्थव्यवस्था 14.4 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे. तर भारताची 2.8 ट्रिलियन डॉलर्स आणि पाकिस्तानची 320३ बिलियन डॉलर्स इतकी आहे.

हे आकडे समोर आले त्याआधीच चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 500 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हजारो लोकांना त्याची लागण झाली होती.

येत्या काही आठवड्यात कोणतं संकट कोसळणार याची अमेरिकेला तेव्हा गांभीर्य समजलेलं नव्हतं. अमेरिकेतलं शेअर मार्केटही तेजीत होतं. Dow Jones ने पहिल्यांदाच 29 हजारांचा आकडा गाठला होता.

अमेरिकेतला बेरोजगारीचा दर 3.6 टक्के खाली आला होता. 50 वर्षांत पहिल्यांदाच इतकी कमी बरोजगारी होती.

2017 मध्ये चीनसोबत अमेरिकेनं स्वामीत्व अधिकाराचा 200 बिलियन डॉलर्सचा करार केला. त्यामुळं अमेरिकेला चांगला फायदा झाला.

पण एका महिन्यातच अमेरिकेचं आणि जगाचं चित्र पालटलं. आतापर्यंत (25 मार्चपर्यंत) अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे 700 लोक दगावले आहेत. तर 23 हजार लोकांना त्याची लागण झाली आहे.

व्यापार, शाळा, क्रीडांगणांवरील खेळ सगळं काही ठप्प झालंय. शेअर बाजार कोसळला आहे. रस्ते, मॉल्स, विमानतळं, रेल्वे सगळीकडं भयाण शांतता आहे.

अर्थव्यवस्था कोसळणार, अर्थव्यवस्था बुडणार अशा बातम्यांचं वावटळ येऊ लागलंय.

“अख्ख्या आयुष्यात आम्ही असं संकट पाहिलं नव्हतं. हे एक मोठं संकट आहे,” असं गुंतवणूकदार रे डॅलियो यांनी CNBCशी बोलताना सांगितलं.

रे डॅलियो यांच्या अंदाजानुसार, कोरोन व्हायरसमुळे अमेरिकेला 4 ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसणार आहे. त्यामुळे अनेकजण घायकुतीला येणारे आहेत.

एका नोकरी विषयक माहिती गोळा करणाऱ्या संस्थेनुसार अमेरिकेत चारपैकी तीन कामगारांवर कर्ज आहे. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अनेक कामगारांना एकापेक्षा जास्त नोकऱ्या कराव्या लागत आहेत.

तसंच अंदाज बांधणाऱ्या आणखी संस्थांनी तर यापेक्षा मोठी धोक्याची घंटा वाजवली आहे.

Goldman Sachsच्या तज्ज्ञांनी आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मंदी सावट उभं राहण्याची शक्यता वर्तवली आहे. जीडीपीचा दर 24 टक्क्यांनी घसरेल असंही त्यांचा अंदाज आहे.

हे भयावह आकडे आहेत. “येत्या काही आठवड्याचं अमेरिकेत 4 लाख लोकांच्या हाती काही काम नसेल,” असं जे. पी. मॉर्गन चे अर्थतज्ज्ञ मायकेल फेरोली यांनी म्हटलं आहे.

“अमेरिकेची अर्थव्यवस्थेत मंदी आलेली आहे असं आम्ही तरी अधिकृतरित्या जाहीर करतो,” असं बँक ऑफ अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ मायकेल मेयेर यांनी एका लेखात लिहिलं आहे. नोकऱ्या संपतील, उत्पन्न घटेल आणि अर्थव्यवस्थेची उमेद ढासळेल, असंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.

कोरोनाचा काळ संपल्यावर अर्थव्यवस्था परत उभारेल असं काही अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. पण मुळात कोरोना संकट कधी संपेल याविषयी कुणाकडे काहीच कल्पना नाहीये.

स्विस गुंतवणूक बँक आणि आर्थिक सेवा कंपनी UBSच्या मते कोरोना व्हायरसमुळे 2020 च्या उत्तरार्धात अमेरिकची अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाणार आहे. अमेरिकेचा आर्थिक दर पहिल्या तिमाहीतला उणे 2.1 टक्के असणार आहे.

या सगळ्या गोष्टींमुळे नोकऱ्या घटणार आहेत.

बँक ऑफ अमेरिकेच्या मते बेरोजगारीचा दर दुप्पट होईल. दुसऱ्या तिमाहीनंतर दर महिन्याला 10 लाख नोकऱ्या जाणार आहेत. हा आकडा जवळ जवळ 35 लाख असू शकतो, असाही अंदाज बांधला आहे.

दळणवळण थांबल्यामुळे 2020 मध्ये 46 लाख नोकऱ्यांवर गदा येईल असं Oxford Economicsच्या रिपोर्टमध्ये दिसून आलं आहे.

यावर्षी प्रवास खर्च अमेरिकेचा वाहतूकक्षेत्रातला खर्च 355 बिलियनने कमी होणार आहे. त्यामुळे यातून मिळणाऱ्या जवळजवळ 809 बिलियन डॉलर्स नफ्यावर पाणी सोडावं लागणार आहे. 9/11 हल्ल्यात जेवढ नुकसान झालं त्यापेक्षा 6 पटीनं हे नुकसान जास्त आहे, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

केवळ वाहतुकीतल्या क्षेत्रातला कमी झालेला खर्च पाहता अमेरिकेची अर्थव्यवस्था एका प्रदीर्घ मंदीच्या सावटाखाली जाईल, असं त्यांनी भाकीत केलं आहे.

अमेरिकेच्या Airlines for America संस्थेनं या क्षेत्रातल्या 7 लाख 50 हजार नोकऱ्या टिकवण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करण्याचं आवाहन केलं आहे.

तर अमेरिकन सरकारनं 2 ट्रिलियन डॉलर्सचं तात्काळ आर्थिक सेवा पॅकेज जाहीर केलं आहे. हे देशाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं आर्थिक पॅकेज आहे.

पण दरम्यान, गरीब, बेरोजगार आणि बेघर लोकांना या आर्थिक मंदीचा सगळ्यात जास्त फटका बसणार आहे. कारण, त्यांना पगारी सुटी, विमा, आरोग्यसेवेचा लाभ मिळत नाहीये.

वंश, लिंग, आणि स्थलांतरित या मुद्द्यांवरून लोकांची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.

“अमेरिकेतल्या 4.6 कोटी गरीब लोकांकडं कोणतीही बचत शिल्लक नाहीये. तर दोन वेळेच्या जेवणासाठी अन्नधान्य साठवून ठेवण्याचीही क्षमता नसणार आहे,” असं Human Rights Watchच्या रिपोर्टमध्ये दिसून आलं आहे. हा सगळा आर्थिक फटका कोरोना व्हायरसमुळे होणार आहे.

वाढता आर्थिक फटका आणि बुडणाऱ्या नोकऱ्या पाहता तरुणांना नोकरी जाऊ द्यावं असाही एक सूर येत आहे. कारण कोरोनामुळे बहुतांश वृद्ध लोकांचा मृत्यू होत आहे, असं काहींचं म्हणणं आहे.

पण कोरोनामुळे मृत्यूचं चक्र वाढू लागलं आहे. त्यामुळं सध्यातरी असा निर्णय घेणं कठीण आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)