पीरो : जातिवाद आणि पितृसत्तेच्या विरोधात बंड करणारी कवयित्री

पीरो : जातिवाद आणि पितृसत्तेच्या विरोधात बंड करणारी कवयित्री

'ना मी मुसलमान आहे ना हिंदू. ना मी ब्राम्हण, क्षत्रिय वैश्य शुद्र या चातुर्वर्ण्याला मानते आणि ना एका विशिष्ट प्रकारचा वेश धारण करण्यावर माझा विश्वास आहे.'

हे शब्द जवळपास 200 वर्षांपूर्वी एका दलित देहविक्रय करणाऱ्या महिलेने लिहिले होते यावर तुमचा विश्वास बसेल? जिने मोठ्या ताकदीने त्यावेळेच्या पितृसत्ताक, जातिवादी आणि धार्मिक रूढीप्रियतेला खुलं आव्हान दिलं होतं. आश्चर्य वाटलं की दोनशे वर्षांपूर्वी असलं धाडसं, हो धाडसच म्हणावं लागेल याला. हे धाडस करणारी कोण होती पीरो प्रेमण?

बीबीसी पुन्हा घेऊन आलंय इतिहासातल्या काही शूरवीर, धैर्यवान महिलांच्या कथा. सावित्रीच्या सोबतिणी ही खास सीरिज त्या दलित आणि मुस्लीम महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकते ज्यांना उपेक्षितांचं जीणं मंजूर नव्हतं.

अनेक तज्ज्ञ त्यांना पंजाबीतली पहिली कवयित्री मानतात. काहींच्या मते पीरोंचं खरं नाव आयेशा होतं. पीरोवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकात त्यांचा जन्म साधारण 1810 च्या आसपास झाला असं म्हटलंय.

लाहोरच्या हीरामंडीतून पळून धार्मिक गुरू गुलाबदास यांच्या आश्रमात त्या आल्या. इथे कविता लिहायला लागल्या. असं म्हणतात की इथूनच त्यांचं नाव पीरो प्रेमण पडलं.'

पंजाबा विद्यापीठात प्राध्यापक असणारे जसबीर सिंग त्यांच्याविषयी आणखी माहिती देतात. ते म्हणतात, "पीरोच्या सुरुवातीच्या आयुष्यात अनंत अडचणी आल्या. लग्नानंतर त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. कमी वयातच त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलं. त्यांना लाहोरच्या हिरामंडीत विकलं. पण कशाबशा त्या तिथून पळल्या आणि साधू गुलाबदास यांच्या आश्रमात पोहचल्या. त्यावरूनही वाद झाला पण शेवटी वाद शमला आणि त्या तिथेच राहायला लागल्या."

फोटो कॅप्शन,

पीरो

राजकुमार हंस प्राध्यापक आणि इतिहासकार आहेत. ते म्हणतात, "त्यांचं खरं नाव पीरो नव्हतं तर आयेशा होतं. त्या गुलाबदास यांच्या संपर्कात आल्या आणि डेऱ्यात येऊन राहायला लागल्या. त्या इतक्या गुणी आणि ज्ञानी होत्या की त्यांना पीराचा दर्जा दिला गेला. पण त्या स्त्री होत्या म्हणून पीर नाही तर पीरो नाव पडलं. त्यांना पीरो प्रेमण म्हटलं जायचं कारण त्या प्रेम करायच्या. प्रेम कोणावर तर गुलाबदासांवर आणि भगवंतावर. याच पीरो बंडात्मक कविताही लिहायच्या."

हा एकोणिसाव्या शतकाचा काळ होता. पंजाबात राजकीय उलथापालथ होत होती. महाराजा रणजितसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संस्थानात ब्रिटिश हातपाय पसरत होते.

या काळात पीरो आपल्या बंडखोर लेखणीने सामाजिक रूढींना आव्हान देत होत्या. पीरोंना वाटायचं की समाजाला भेदभावाच्या बंधनात जखडणं निसर्गाच्या नियमांच्या विपरीत आहे.

"त्या आपल्या कवितेने भेदभावाला आव्हान द्यायच्या. म्हणायच्या तुम्ही सुंता केली आणि मिशी काढली तर तुम्ही तुर्क झालात. शेंडी ठेवली तर ब्राम्हण झालात. त्यांनी शिख धर्मावरही अशीच टिप्पणी केली. मग त्या म्हणायच्या की बाईकडे असं काय आहे ज्यावरून ती आपला धर्म दाखवू शकेल? याचाच अर्थ असा की हा एका खास तऱ्हेचा धार्मिक कट्टरतावाद आहे जो प्रतिकांच्या बळावर टिकलाय. त्या म्हणायचा हा खरा धर्मच नाही. धर्म या पेक्षा फार वेगळा आहे," जसबीर सिंग म्हणतात.

पीरो स्वतःच वर्णन आपल्या कवितेत कसं करायच्या याबद्दल ते सांगतात, "त्या स्वतःचा उल्लेख वेसवा म्हणून करतात, गणिका म्हणून करतात. मी वेश्या आहे किंवा होते हे सांगण्यात त्यांना कोणतीही लाज वाटत नाही. बाईवर जी प्रतिमा लादली जाते त्याला त्या मुळापासून आव्हान देतात. त्यांना हेही सांगायला लाज वाटत नाही की दलित आहे. म्हणजे धर्माच्या, जातीच्या, लिंगाच्या सगळ्या चौकटी भेदून त्या खऱ्या अर्थाने बंड करतात."

पीरोविषयी जी माहिती मिळते त्यानुसार त्यांनी साधारण 160 कविता लिहिल्या. पीरो आपल्या अनुभवांना लेखणीव्दारे कवितेचं स्वरूप द्यायच्या. कशाचीही तमा न बाळगता समाजात राहून त्याच समाजाला प्रश्न विचारण त्या काळात नक्कीच क्रांतीकारी होतं.

पीरोंच्या कविता वाचणारे लोक त्यांना एकोणिसाव्या शतकातली पुरुषप्रधान संस्कृती, जातिवाद आणि धार्मिक रूढीवादाच्या विरोधातल्या बंडाचं एक प्रतिक मानतात.

तर इतिहासकार मानतात की पंजाबात पीरोंच्या प्रेरणेने अनेक महिलांनी निडर होऊन आपल्या लेखणीव्दारे बंडा झेंडा फडकवला. आजही महिला त्यांच्या प्रेरणेने आपला आवाज बुलंद करतायत.

लेखन, कथा - नवदीप कौर, सुशीला सिंह

शूट - राजिंदर सिंग राजन, मनजीत सिंग

एडिट - दिपक जसरोटिया

निर्माती - सुशीला सिंह

एलूस्ट्रेशन - गोपालशून्य

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)