वारीतली माऊली

कोंडमारा करणाऱ्या बंधनांपासून आणि संसाराच्या धबडग्यातून सुटका म्हणून
स्त्रिया वारीकडे पाहतात का? त्यांच्यासाठी वारी म्हणजे काय?

पदर असे किती फाटून गेले बघा डोक्यावर घेऊन घेऊन. इकडे आस्सं करायले बघा आता.

डोईवरचा पदर दिमाखात मागे सारून कंबरेला खोचत कुसुमबाई कपाटे मनापासून हे बोलतात, तेव्हा स्त्री म्हणून समाजानं लादलेली ओझीच त्या जणू झुगारून देतात. त्यांचा तो उत्साह पाहून आजूबाजूला बसलेल्या बाकीच्या बायका खळखळून हसतात आणि जमलेल्या पुरुषांच्या चेहर्‍यावरही हसू उमटतं.

सगळं घरदार महिनाभरासाठी मागे ठेवून कुसुमबाई वारीला आल्या आहेत. जवळपास पन्नास वर्षं संसार केल्यावरही नवरा कुठं पाठवायला तयार नव्हता, पण आपण वारीला येण्याचा हट्टच धरला, असं त्या आवर्जून सांगतात.

“आता आम्ही रजेवर. तिथं दाब होता म्हणून दबून राहायचो. आता मोठ्यानं भजनं म्हणते, भारुडं करते. इथं माझ्या मालकाच्या ओळखीचं कुणीच नाही, त्याला फोनही लावणार नाहीत, कारण त्याच्याकडे फोनच नाही.”

कुसुमबाईंच्या या बोलण्यावर टाळ्याच पडतात.

नांदेडच्या माधवगिरी महाराज दिंडीसोबत त्या वारीला निघाल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत आळंदीहून पंढरपूरला निघालेली ही सगळी मंडळी सासवडच्या मुक्कामी पालावर थांबली होती, तेव्हा कुणी आवराआवर करत होतं, कुणी पोथीची तयारी करत होतं तर कुणी संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीत होतं.

दिंडीतल्या बहुतेक सगळ्या बायका मात्र आराम करत होत्या. एरवी घर, संसार, मुलं सांभाळणं, नवऱ्याच्या मर्जीनुसार वागणं, सासरच्यांचा मान राखणं आणि वर शेतातही राबणं, हेच त्यातल्या बहुतेकींचं जगणं.

कोंडमारा करणाऱ्या बंधनांपासून आणि संसाराच्या धबडग्यातून सुटका म्हणूनही या स्त्रिया वारीकडे पाहात असाव्यात का? त्यांच्यासाठी वारी म्हणजे काय, असा प्रश्न पडतो.

‘वारी म्हणजेच स्वातंत्र्य’

अगदी नेमक्या शब्दांत कुसुमबाई आपल्या भावना व्यक्त करतात आणि वारीला माहेराची उपमाही देऊन टाकतात. “लेकीला माहेरी गेल्यासारखं वाटतं तसंच वाटतंय. कुणाचं बंधन नाही, आता मी एकटीच राजा झालेय.”

कुसुमबाईंसोबत चालणाऱ्या अंजनाबाईंनाही वारीला आलं की आपल्या घरी परतल्यासारखं वाटतं. त्या कधीपासून पायवारी करतात, हे नेमकं त्यांनाही सांगता येत नाही.

वयाबरोबर अंजनाबाईंची दृष्टी काहीशी अधू झाली आहे, पण पाय थकलेले नाहीत. वारीला आल्या की त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांच्या जाळ्यातून सतत हसू सांडत राहतं, असं सोबतचे गावकरी सांगतात.

चालता चालता एका कोपऱ्यात स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली पुरुषमंडळी पाहून अंजनाबाई हळूच बोलतात, “पुरुषांना पण वारीमंदी माऊली म्हणतात नव्हं? मग हितं सगळेच माऊलीसारखी कामंही करतात. घरी पण करावीत की जरा.”

मग सोबतच्या बायकांमध्येही हसू फुटतं.

गावाकडच्या असो वा शहरात राहणाऱ्या, बायकांना संसाराची जबाबदारी आणि स्वतःची मर्जी यांत कसरत करावी लागते, असं आशा वांजळे सांगतात.

पुण्याच्या धायरीत राहणाऱ्या आशाताईंसाठी दरवर्षी आळंदी ते पंढरपूर हा प्रवास म्हणजे स्वतःचा शोध घेण्याचा काळ आहे.

“आम्ही वाट बघतो वर्षभर या पंधरा-वीस दिवसांची. सगळ्या वारकऱ्यांसोबत एकत्र चालायला चांगलं वाटतं. पांडुरंगाच्या भेटीला निघालं की मागे नाही पाहायचं, मागचं तो सांभाळेल, आपण पुढे निघायचं. जगण्याचं असंच आहे.”

फक्त वारी पाहायला, एक दिवस वारी सोबत चालायला आलेल्या बायकांवरही या वातावरणाचा प्रभाव पडतो.

कुसुमबाई या वातावरणाचंही नेमकं वर्णन करतात, “ज्वारी कशी वाळू घातल्यानं आपली चांगली होते बघा... तसं आम्हाला अकरा महिने चेपल्यासारखं वाटतं. आता एक महिना आमचं वाळवण बाहेर. कुणाची भीतीच नाही.”

या महिला इतक्या मोकळेपणानं वागतात, घाट चढूनही थकत नाहीत, डोक्यावर तुळस किंवा सामानाचं गाठोडं असतानाही झपझप चालत राहतात, कुठे भान हरपून नाचतात, भजनं-भारुडं गातात, टाळ्या वाजवतात, हसतात आणि सगळी दुःख विसरून जातात. त्यांचे डोळेही मग वेगळ्या आनंदानं लकाकू लागतात.

आणि हे सारं कडेला उभं राहूनपाहणाऱ्यांच्या मनात प्रश्न पडतो की, कित्येक वर्षं आत दाबून ठेवलेलं सारं काही वारीमध्ये आल्यावर फसफसूनबाहेर पडतं का?

वारीमधल्या महिला

लेखिका आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक तारा भवाळकर सांगतात, “वारीला नेमानं पायी जाणाऱ्या स्त्रियाच नाही तर पुरुष मंडळीही प्रामुख्यानं ग्रामीण भागात राहणारी, शेती-पशुपालन करणारी आहेत. वर्षभर ते शेतीच्या कामात अडकलेले असतात."

"पण आषाढ आणि कार्तिकात जेव्हा वारी येते तेव्हा देवाच्या निमित्तानं दैनंदिन कष्टांपासून त्यांना सुटका मिळू शकते. घराबाहेर जायला मिळतं, मोकळेपणानं राहायला मिळतं. समवयस्क स्त्री-पुरुषांना एकत्र यायला मिळतं. विठ्ठल हे दैवत सर्व जातीधर्मांना सामावून घेणारं आहे. त्यामुळं वारीत सगळ्या बंधनांमधून मोकळं होण्याचा अनुभव त्यांना घेता येतो.”

भक्तीच्या नावावर मिळणारी ही मोकळीक स्त्रियांसाठी मानसिकदृष्ट्या महत्त्वाची आणि दडपणं दूर करण्याच्या दृष्टीनं, मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं सर्वांनाच आवश्यक असल्याचं मतही तारा भवाळकर यांनी मांडलंय.

एरवी पुण्या-मुंबईत बायकांना स्टेजवर बोलावून पाहा, नाही येत. वारी हा वेगळा माहौल आहे!

सुषमा देशपांडे, अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ता

अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ता सुषमा देशपांडे यांनीही वारीमधल्या महिलांचं भावविश्व जवळून पाहिलंय आणि ‘बया दार उघड’ या नाटकाच्या माध्यमातून ते रंगमंचावर उलगडून दाखवलं आहे.

“वारीमध्ये बायका जशा वावरतात, तशा इतर ठिकाणी नाही दिसणार. वारीमध्ये स्त्रीपुरुष भेद नसतात. एखादी बाई सहज वडाच्या पारंब्या धरते आणि पुरुष तिला झोके देतो."

"ती कोणत्याही पुरुषाचा हात हातात धरून फुगडी घालते. गावात ती अशी कुणाही सोबत फुगडी घालणार नाही. पण इथं तिच्या मनात काही प्रश्नही येत नाहीत. दुसरी एखादी बाई सहज पुढे येऊन अभंग, भारूड म्हणू लागेल. एरवी पुण्या-मुंबईत बायकांना स्टेजवर बोलावून पाहा, नाही येत. वारी हा वेगळा माहौल आहे. ती वेगळ्या पद्धतीची झिंग आहे.”

संत साहित्यातल्या स्त्रिया

वारीमधला हा मोकळेपणा कुठून आला असावा?

वारकरी संप्रदाय आणि संत साहित्यात स्त्रियांचं स्थान खूप मोठं असल्याचं तारा भवाळकर सांगतात. “बाराव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत अनेक वारकरी संत झाले. त्यात सगळ्या जाती-धर्मांच्या स्त्रियाही मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, सर्वांना विठ्ठल आपला सखा वाटतो."

"एरवी कुठल्याही पुरुषाला मित्र किंवा सखा म्हणून स्वीकारण्याची आपल्या समाजात सोय नव्हती. पण विठ्ठलाशी मैत्री केली जाते, सगळी नाती जोडली जातात. कधी तो बाप, कधी भाऊ, कधी सखा, कधी पती आणि कधी प्रियकर मानला जातो. वारकरी संतांच्या मनातली विठ्ठलाची ओढ म्हणजे त्यांच्या मनातल्या अशाच एका मुक्त प्रतिमेची ओढ असावी. ती स्वप्नादर्श प्रतिमा विठ्ठलाच्या रूपानं मुखर होते आणि त्या विठ्ठलाविषयी मोकळेपणानं बोलतात. अशा नात्याची स्त्रियांनाही गरज असते आणि त्यांच्या रचनांमधून ती व्यक्त होते.”

विठ्ठलाशी मैत्री केली जाते, सगळी नाती जोडली जातात. कधी तो बाप, कधी भाऊ, कधी सखा, कधी पती आणि कधी प्रियकर मानला जातो.

संत स्त्रियांनी काय म्हटलंय, कुठला विचार मांडलाय ते तात्विक दृष्ट्या सर्वसामान्य बाईंना माहीत नसेल, पण त्यांनाही ते भावतं, याकडे तारा भवाळकर लक्ष वेधतात.

“कष्ट करणाऱ्या बायांना जनाबाई आपलीशी वाटते, याचं कारण ती दळणकांडण करणारी, सर्वसामान्य बाईची प्रतिनिधी असते.”

सुषमा देशपांडे यांच्या मते विठ्ठल हे व्यक्त होण्याचं माध्यम बनलं आहे. “त्या काळात बायकांनी असे स्वतःचे मार्ग शोधले. या सर्व स्त्रिया भिन्न-भिन्न जातींच्या आहेत. पण हातात एक विठ्ठल घेतला की त्यांचं आयुष्य सुकर होतं. बायकांनी व्यक्त होताना आध्यात्म ज्या पद्धतीनं वापरलं आहे, ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं.”

स्त्री संतांनी अभंगांमधून मांडलेल्या मुक्ततेच्या कल्पनांविषयी सुषमा देशपांडे सांगतात, “जनासारखी बाई ‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी’ असं म्हणते. ‘स्त्रियेचे शरीर, पराधीन देह न चाल उपाव, विरक्तीचा’ असं सुरुवातीला म्हणणारी बहिणा पुढे जाऊन, ‘सोडूनी लाज झाले, निर्लज्ज डौर हेच हाती’ म्हणू लागते, ही ताकद तिला मिळते."

"१८व्या शतकातली विठा तर नवऱ्याच्या जाचामुळं घर सोडून गेलेली, विठ्ठलाचा आधार मिळाल्यावर मात्र नवऱ्यालाही सुनावते, ‘तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझेवरी तुझी किंचित नाही’. संतसाहित्यात स्त्रियांनी असं अफाट लिहिलेलं आहे.”

वारीतून घरी परतल्यावर...

वारीचे तीन आठवडे मुक्त वातावरणात घालवल्यावर या महिला घरी परततात, तेव्हा पुन्हा आपलं नेहमीचं आयुष्य जगू लागतात.

सुषमा यांच्या मते “ते जगणं त्यांनी स्वीकारलेलं असतं. घरी सगळं करायचंच आहे, पण वारीला जायला मिळतंय ना, असा विचार ती बाई करते.”

“वारीत काम करणारे पुरुष घरी जाऊन कामं करतात का, या विषयी माझ्या मनात शंका आहे. पण वारीमधले तीन आठवडे सगळे जण जात, पात, धर्म, स्त्री-पुरुष या सगळ्याच्या पल्याड पोहोचलेले असतात. म्हणून असं मला वाटतं की लोकांनी वारीतलं जगणं अनुभवायला पाहिजे, पण ते जगणं रोजच्या समाजात, सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे.”

👣 👣 👣

लेखिका - जान्हवी मुळे
व्हीडिओ रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
शूटिंग आणि एडिटिंग - शरद बढे
छायाचित्रं - राहुल रणसुभे आणि शरद बढे
शॉर्टहँड निर्मिती - गुलशनकुमार वनकर